पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात चुकीचे वर्तन केले होते. त्याने गोलंदाजीदरम्यान बांगलादेशचा फलंदाज अफिफ हुसेनवर रागाच्या भरात चेंडू फेकला होता. यासाठी त्याला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या घटनेपूर्वी आधीच्या चेंडूवर हुसैनने षटकार मारला. त्यानंतर आफ्रिदीला राग अनावर झाला. पुढचा चेंडू टाकल्यानंतर आफ्रिदीने फॉलो थ्रोमध्ये चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला, पण अफिफ हुसेन त्यावेळी क्रीजमध्ये होता. चेंडू फलंदाजाला लागला आणि त्याला तपासण्यासाठी डॉक्टरांना मैदानात जावे लागले.

हेही वाचा – PHOTOS : धोनीच्या जुन्या शिलेदाराची नवी ‘इंनिंग’; मालदीवच्या समुद्रक्रिनारी गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये आफ्रिदी सामना संपल्यानंतर हुसेनकडे त्याच्या कृत्याबद्दल माफी मागताना दिसत आहे. त्याने हुसेनला ‘सो सॉरी ब्रो’ म्हणत मिठी मारली.

आयसीसीच्या आचारसंहितेनुसार हे ‘लेव्हल वन’चे उल्लंघन होते. २४ महिन्यांतील शाहीनचे हे पहिले उल्लंघन होते, ज्यामुळे त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, आफ्रिदीने मॅच रेफरीने प्रस्तावित उल्लंघन आणि दंड स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रकरणी अधिकृत सुनावणीची गरज नाही.