Shreyas Iyer Winning Knock in Mi vs PBKS: रविवारी झालेल्या हाय व्होल्टेज आयपीएल सामन्यात यंदाच्या आयपीएलमध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी मुंबई इंडियन्सची टीम पराभूत झाली. पण त्यांना पराभूत करणारी टीम अर्थात किंग्ज इलेव्हन पंजाब खऱ्या अर्थानं रविवारी ‘किंग’ ठरली! या सामन्यातील अनेक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातलाच एक मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना वेदना देणारा क्षण म्हणजे पराभूत झाल्यानंतर निराश होऊन खाली बसलेला हार्दिक पंड्या.

श्रेयस अय्यरनं शेवटचा षटकार खेचल्यानंतर कोणताही आक्रमक जल्लोष न करता शांतपणे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करायला सुरुवात केली असताना दुसरीकडे मार्कस स्टॉयनिस निराश होऊन खाली बसलेल्या हार्दिक पंड्याला धीर देण्यासाठी सरसावला. हा क्षण मुंबई इंडियन्ससोबतच किंग्ज इलेव्हन पंजाबच्या चाहत्यांच्याही मनात कायमचा घर करून गेला!

१९व्या षटकात अश्वनी कुमार गोलंदाजीसाठी आला तेव्हा पंजाबला विजयासाठी आणखी २३ धावा आवश्यक होत्या. श्रेयस अय्यरनं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत पंजाबच्या विजयाचा मार्ग सहजसुलभ केला. दुसरा चेंडू निर्धाव गेल्यानं काहीशी धाकधुक वाढली खरी. पण तो नो बॉल झाला आणि MI साठी आयतीच संधी मिळाली. त्यापुढच्या चेंडूवर श्रेयस अय्यरनं पुन्हा एक उत्तुंग षटकार खेचला आणि संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलं. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा अश्वनीनं केलेलं बादचं अपील पंचांनी फेटाळून लावलं. त्यापुढच्याच चेंडूवर श्रेयस अय्यरनं षटकातला तिसरा षटकार खेचला आणि एमआयच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या.

मार्कस स्टॉयनिसची खिलाडू वृत्ती!

विजयासाठी अवघ्या ३ धावा शिल्लक असताना श्रेयस अय्यरनं १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आणखी एक षटकार खेचक पंजाबचा विजय ‘किंग्ज स्टाईल’ साजरा केला! यानंतर MI चा कर्णधार हार्दिक पंड्या निराश होऊन खाली बसल्याचं मैदानावर उपस्थित हजारो चाहत्यांनी पाहिलं. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक चाहत्याला हार्दिकची निराशा जाणवत होती. पण तेवढीच ती विरोधी संघातल्या मार्कस स्टॉयनिसलाही जाणवत होती. स्टॉयनिस खाली बसलेल्या हार्दिककडे आला आणि त्यानं हार्दिकच्या पाठीवर हात ठेवून त्याला धीर दिला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन केलं.

पहिल्यांदाच २०० धावा करूनही MI अपयशी!

दरम्यान, याआधी मुंबई इंडियन्सनं जॉनी बेअरस्टो (३८), तिलक वर्मा (४४) आणि सूर्यकुमार यादव (४४) यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर PBKS समोर IPL Final मध्ये जाण्यासाठी तब्बल २०४ धावांचं आव्हान ठेवलं. तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी हे आव्हान कठीण ठरेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. कारण मुंबई इंडियन्स आजतागायत २०० धावा केल्यानंतर पराभूत झालेली नव्हती. पण रविवारी किंग्ज इलेव्हननं कर्णधार श्रेयस अय्यरच्या तुफानी खेळीच्या जोरावर हेही करून दाखवलं!

Shreyas Iyer नं पुन्हा करून दाखवलं!

२००८ पासून आयपीएलला सुरुवात झाली. पण अगदी रविवारी संध्याकाळपर्यंत पंजाबला आयपीएलच्या विजेतेपदानं हुलकावणीच दिलेली होती. पण रविवारी मध्यरात्री पंजाबला आयपीएल विजयाचं गुलाबी स्वप्न पडलं आणि ते दाखवलं पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं! आधी KKR ला श्रेयस अय्यरनं आपल्या कर्णधारपदाच्या काळात आयपीएल जिंकवून दिल्यानंतर आता पंजाबसाठीही श्रेयस अय्यरचं कर्णधारपद यशाची चावी ठरताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी झालेल्या क्वालिफायरमध्ये श्रेयस अय्यरनं ४१ चेंडूंत ८७ धावा कुटल्या. यात ५ चौकार आणि तब्बल ८ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यरसह जॉश इंग्लिस (३८) आणि नेहाल वढेरा (४८) यांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसं काढली. २०४ धावांचं आव्हान पंजाबनं एक षटक राखून फक्त ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. उलट त्याच्या ४ षटकांमध्ये पंजाबनं तब्बल ४० धावा कुटल्या!