ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताला कुस्तीत पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची, आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी हुकलेली आहे. याआधीही २०१६ साली रिओ ऑलिम्पिक दरम्यान जॉर्जियात होणाऱ्या राष्ट्रीय शिबीरासाठी उपस्थित न राहिल्यामुळे राहुल आवारेवर कुस्ती महासंघाने कारवाई केली होती. दोन वर्षांच्या कालावधीनंतर आशियाई खेळांसाठी घेतलेल्या निवड चाचणीत अनुपस्थित राहिल्यामुळे राहुल आवारेची आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी हुकलेली आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवणारा सुशील कुमार तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता बजरंग पुनिया यांना आशियाई स्पर्धेच्या निवड चाचणीस उपस्थित न राहण्यास परवानगी देण्यात आली आहे व त्यांना जकार्ता येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे.

या घटनेनंतर कुस्ती महासंघाच्या निर्णयावर राहुल आवारेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत इतरांप्रमाणेच सर्वोत्तम कामगिरी करुनही मला निवड चाचणीसाठी हजर रहावं लागणार आहे, हे कळताच मी कुस्ती महासंघाला पत्र लिहीलं. ऑस्ट्रेलियात भारताला कुस्तीमध्ये सर्वात पहिलं सुवर्णपदक मी मिळवून दिलं होतं. या कामगिरीनंतर आशियाई खेळांसाठी होणाऱ्या निवड चाचणीसाठी मला हजर रहावं लागणार नाही, असं आश्वासनही कुस्ती महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिल्याचं राहुलने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं. “याच कारणासाठी मी निवड चाचणीसाठी माझं वजन कमी करण्याच्या भानगडीत न पडता सराव करत राहिलो. यानंतर ज्यावेळी मला निवड चाचणीसाठी हजर राहावं लागणार असं समजलं, त्यावेळी वजन कमी करणं मला शक्य नव्हतं. तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली होती.”

४ जूनला कुस्ती महासंघाकडून राहुल आवारेला ५ दिवसांनी निवड चाचणी होणार असल्याचं कळवण्यात आलं. या दिवसांत राहुलला ५ किलो पेक्षा जास्त वजन कमी करायचं होतं. मात्र यासाठी किमान १५ दिवसांची गरज असून त्यासाठी योग्य तो आहार व सरावाची गरज असल्याचं, राहुलचे प्रशिक्षक काका पवार यांनी सांगितलं. इतक्या कमी वेळेत वजन कमी करता येणं शक्य नसल्यामुळेच राहुल या निवड चाचणीसाठी हजर राहिला नसल्याचं काका पवार म्हणाले. याचवेळी राहुल निवड चाचणीसाठी हजर राहिला असता तर नियोजीत वजनापेक्षा जास्त वजन भरल्यामुळे त्याला निवड चाचणीत खेळू दिलं नसतं. महाराष्ट्राच्या खेळाडूंसोबत नेहमी असाच प्रकार केला जातो, यामागे मोठं षडयंत्र असल्याचंही काका पवार म्हणाले. पहिली संधी गमावली असली तरीही राहुल आवारेकडे दुसऱ्या निवड चाचणीसाठी हजर राहण्याची संधी आहे, मात्र तोपर्यंत राहुल अपेक्षित नियमांप्रमाणे वजन कमी करतो का हे पाहणं आवश्यक ठरणार आहे.