एपी, मेलबर्न : संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या कार्लोस अल्कराझ आणि यानिक सिन्नेर यांच्यासमोर आव्हान उभे करू शकणारा दुसरा मानांकित अॅलेक्झांडर झ्वेरेव आणि सलग तिसऱ्या ऑस्ट्रेलिया विजेतेपदासाठी उत्सुक असणारी अरिना सबालेन्का यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या मोहिमेस थाटात सुरुवात केली.

पहिल्या फेरीच्या लढतीत झ्वेरेवने थेट प्रवेश मिळालेल्या फ्रान्सच्या लुकास पौलीचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला. झ्वेरेवने अगदी सहज २ तास २० मिनिटांत विजय मिळवला. सलग नवव्यांदा झ्वेरेवने या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. बोरिस बेकरनंतर ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा पहिला जर्मनीचा खेळाडू बनण्यासाठी झ्वेरेव गेली काही वर्षे प्रतीक्षेत आहे. पण, त्याचे हे स्वप्न अद्याप साकार झालेले नाही. त्याची गाठ आता स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझशी पडेल. अर्थात, या वेळी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला अल्कराझ किंवा नोव्हाक जोकोविच यांच्यापैकी एकावर मात करावी लागेल. पुरुष एकेरीत जिरी लेहेका, हुगो गस्टन यांनीही पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. सहाव्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडने स्पेनच्या जाउमे मुनारचा चुरशीच्या पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत ६-३, १-६, ७-५, २-६, ६-१ असा पराभव केला.

हेही वाचा >>> वानखेडे स्टेडियमचे योगदान महत्वाचे! सुनील गावस्कर यांची भावना; तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने क्रिकेट पंढरी दुमदुमली

महिला एकेरीत सबालेन्काने तितक्याच सहज विजय मिळवताना स्लोआनी स्टिफन्सचा ६-३, ६-२ असा पराभव केला. सबालेन्का या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकसाठी उत्सुक आहे. अशी कामगिरी यापूर्वी सात टेनिसपटूंनी केली असून, सर्वात प्रथम अशी कामगिरी १९९९ मध्ये मार्टिना हिंगीसने केली होती. सबालेन्काने २०२३ च्या हंगामापासून आतापर्यंत हार्ड कोर्टवर खेळलेल्या एकूण २९ सामन्यांपैकी २८ सामने जिंकले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सलग १५ विजयांचा समावेश आहे. ऑलिम्पिक विजेती झेंग किन्वेनने देखील अपेक्षित कामगिरी केली. पहिल्या सेटमध्ये पात्रता फेरीतून आलेल्या रोमानियाच्या अँका टोडोनीकडून प्रतिकार झाला खरा, पण झेंगने नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेतली. झेंगने लढत ७-६(७-३), ६-१ अशी जिंकली. झेंग गतउपविजेती देखील आहे. अन्य लढतीत लिंडा नोस्कोवा, पॉला बडोसा, मिरा अॅण्ड्रीवा, डोना वेकिच, लेला फर्नांडिझ यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमित नागलचा पराभव

भारताच्या सुमित नागलला पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. २६व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचॅकने सरळ सेटमध्ये नागलचा ६-३, ६-१, ७-५ असा पराभव केला.