भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. १५ ऑगस्टच्या रात्री धोनीनं इन्स्टाग्राम पोस्टवर निवृत्तीची घोषणा केली. धोनीने अचानक घेतलेली निवृत्ती अनेकांचं मन हेलावणाली होती. धोनीची पत्नी साक्षीनं त्याच्या निवृत्तीवर भावनिक पोस्ट केली आहे.
साक्षीने आपल्या इन्स्टाग्रामवर धोनीचा एक फोटो शेअर करुन भावनिक मेसेज लिहिला आहे. तुम्ही जे काही मिळवलेय त्याचा तुम्हाला गर्व असायला हवा, असं साक्षीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. २०१९ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामन्यानंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. दुबईत होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या सत्रासाठी चेन्नईच्या संघासोबत जोडलं गेल्यानंतर धोनीनं दुसऱ्या दिवशी लगेच निवृत्तीची घोषणा केली.
साक्षीने इन्स्टाग्रामवर लिहलेय की, ‘ जे काही मिळवलं आहे त्याचा तुम्हाला गर्व असला पाहिजे. क्रिकेटमध्ये आपलं सर्वस्व आणि बेस्ट दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल आणि तुमच्याबद्दल मला गर्व आहे. मला माहित आहे की, जीव की प्राण असणाऱ्या क्रिकेटला रामराम करताना तुम्ही डोळ्यातून आश्रूंना थांबवलं असेल. भविष्यातील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. #thankyoumsd #proud’
याशिवाय साक्षीनं अमेरिकेतील कवी माया एंजेलोचा एक वाक्य धोनीसाठी पोस्ट केलं आहे. ‘ तुम्ही काय म्हणालात हे लोक विसरतील. तुम्ही काय म्हणालात हे लोक विसरतील, पण लोक त्यांना जाणीव करुन दिलेली विसरणार नाहीत. – माया एंजेलो’
भारतच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीचं नाव घेतलं जातं. धोनी जगातील असा एकमेव कर्णधार आहे ज्यानं आयसीसीच्या तिन्ही चषकावर नाव कोरलं आहे. धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये भारतानं टी २० चा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ चा एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलेलं नाव. हा पराक्रम कराणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला आहे.