Shahid Afridi said that in 2005 our bus was pelted with stones in India: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताबाबत अतिशय वादग्रस्त विधान केले आहे. आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, २००५ मध्ये जेव्हा त्याची टीम भारत दौऱ्यावर होती, तेव्हा बंगळुरू कसोटी जिंकल्यानंतर टीम बसवर दगडफेक करण्यात आली होती. गेल्या १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही, त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही देशांमधील परस्पर संबंध आहेत.
२००५ मध्ये पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा तीन कसोटी आणि सहा एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली होती. यामध्ये कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. त्याचबरोबर पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ४-२ ने जिंकली होती. या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. यामध्ये पाकिस्तानने १६८ धावांनी विजय मिळवला आणि मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
या दौऱ्याबद्दल शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ‘तिथे आमच्यावर खूप दबाव होता. आम्ही चौकार, षटकार मारायचो तेव्हा आमच्यासाठी कोणी टाळ्या वाजवत नसे. रज्जाकला आठवत असेल तर, जेव्हा आम्ही बेंगळुरूमध्ये कसोटी सामना जिंकलो तेव्हा आमच्या टीम बसवर दगडफेक करण्यात आली होती.’
पाकिस्तान संघाने विश्वचषक खेळायला जायला हवे –
विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात येण्याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. याबाबत शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला की, ‘तुम्ही लोक म्हणताय की पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठी भारतात जाऊ नये आणि या वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकावा. मात्र, मला हे अजिबात पटत नाही. मला वाटतं आपण तिथे जाऊन विजयी होऊन परत यावं.’
बीसीसीआयने आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. प्रथमच एकट्या भारताने या मेगा इव्हेंटचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा देशातील १२ वेगवेगळ्या ठिकाणी खेळवली जाणार आहे.