Shubman Gill Illness: देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना सुरूवात झाली आहे. तामिळनाडूत बुची बाबू क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. तर येत्या काही दिवसात दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत नॉर्थन झोन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेला येत्या २८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर युएईत आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे.या स्पर्धेसाठी गिलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान गिलबाबत मोठी अपडेत समोर आली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, शुबमन गिलची फिजिओद्वारे तपासणी करण्यात आली होती. त्याच्या आरोग्याबाबत बीसीसीआयला माहिती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्याहून परतल्यानंतर गिलची तब्येत बिघडली आहे. त्याला ताप आला आहे. त्यामुळे तो चंदीगडमध्ये आपल्या घरी विश्रांती करत आहे. गिलची आशिया चषकासाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आशिया चषकाला ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी गिल पूर्णपणे फिट होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. मात्र, आजारपणामुळे त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेची सुरूवात १५ सप्टेंबरपासून होणार आहे. त्यामुळे गिल दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामन्यांमध्ये खेळणार अशी चर्चा होती. मात्र, आता त्याने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे गिलच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
गिलच्या जागी कोणाला संधी?
नॉर्थ झोनच्या निवडकर्त्यांनी अशा परिस्थितीसाठी आधीपासूनच बॅकअप प्लॅन तयार ठेवला होता. गिलने स्पर्धेतून माघार घेताच शुभम रोहिल्लाचा संघात समावेश करण्यात आला आहे. गिलची कर्णधार आणि अंकित कुमारची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. आता गिलने माघार घेतल्यानंतर अंकित कुमार नॉर्थ झोन संघाचं नेतृत्व करताना दिसेल. तर गिल आशिया चषकात पुनरागमन करताना दिसू शकतो.
आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह.