आयपीएलचा चौदावा हंगाम करोना विषाणूमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. आता या हंगामाचे उर्वरित सामने यंदाच्या टी-२० विश्वचषकानंतर घेण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. हे सामने यूएईत होतील, अशा चर्चाही रंगल्या आहेत. आता श्रीलंकेनेही आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी पुढाकार दर्शवल्याचे वृत्त समोर आले आहे.

ESPN क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, श्रीलंकेने गेल्या वर्षी आयपीएल आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला प्रस्ताव दिला होता. मात्र, बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) निवड केली. सूत्रांच्या माहितीनुसार, यूएई पुन्हा एकदा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी पसंतीचे स्थळ म्हणून समोर येत आहे, मात्र श्रीलंकादेखील या शर्यतीत सहभागी होऊ शकतो.

श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला त्यांच्या मैदानांच्या उपलब्धतेबद्दल अधिकृतपणे माहिती दिली आहे, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रोफेसर अर्जुन डी सिल्वा यांनी आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

श्रीलंकेकडे कोलंबो, पॅलेकेल, सूर्यावेवा आणि डम्बुला अशी चार मैदाने आहेत. पहिल्या तीन ठिकाणी आयसीसीच्या पुरुष गटातील स्पर्धा खेळवल्या गेल्या आहेत. श्रीलंकेने गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच संघांची लंका प्रीमियर लीग स्पर्धा घेतली होती. श्रीलंकेत गेल्या आठवड्यापासून करोना प्रकरणात वाढ झाली आहे. सध्या दररोज २००० प्रकरणे नोंदवली जात आहेत. श्रीलंकेने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.