भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी भारतीय संघाने केलेल्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. स्विंग होणाऱ्या चेंडूंचा गांभीर्याने अभ्यास न करणं भारताला महाग पडलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘बर्मिंगम कसोटीआधी भारतीय संघाने फार कमी सामने खेळले होते. एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला पाच दिवसांची सुट्टी मिळाली होती, जी त्यांनी युरोपमध्ये घालवली’, असं गावस्करांनी सांगितलं.

सुनील गावस्कर यांनी तीन दिवसांच्या अभ्यास सामन्यावर बोलताना सांगितलं की, ‘ती कोणतीही तयारी नव्हती. मालिका संपल्यानंतर आरामाची गरज असते हे मी समजू शकतो. मात्र एकाच वेळी पाच दिवसांची सुट्टी दिली जाऊ शकत नाही. दोन सामन्यांदरम्यान तीन-तीन दिवसांची सुट्टी देऊ शकतो’.

अभ्यास सामन्यात १८ खेळांडूसोबत मैदानात उतरण्याच्या निर्णयावरही गावस्करांनी टीका केली. ‘त्यांनी किमान दोन तीन दिवसीय सामने खेळायला हवं होतं. १८ खेळाडू नव्हे तर ११ खेळाडूंसोबत खेळायला हवं होतं. अभ्यास सामन्यालाही कसोटी सामन्याप्रमाणे खेळायला पाहिजे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील अभ्यास सामनाही संघाने रद्द केला होता, ज्यानंतर पहिल्या दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं’, असं गावस्करांनी म्हटलं आहे.

गावस्कर यांनी पुढील सामन्यात अतिरिक्त फलंदाजासोबत मैदानात उतरण्याचा सल्ला दिला आहे. ‘मला नेहमी वाटतं की परदेशात अतिरिक्त फलंदाजाला घेऊन खेळणं संघाच्या फायद्याचं आहे. मला संघावर पूर्ण विश्वास आहे’, असंही ते म्हणाले आहेत.