Suryakumar Yadav Live Interview: ३६० डिग्री बॅट्समन, आशिया चषकात भारताचं यशस्वी नेतृत्व करणारा कर्णधार सूर्यकुमार यादव ‘एक्स्प्रेस अड्डा’मध्ये खास पाहुणा आहे. इंडियन एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि इंडियन एक्स्प्रेसचे डेप्युटी असोसिएट एडिटर देवेंद्र पांडे सूर्यकुमार यादवशी संवाद साधत आहेत.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने २९ पैकी २३ सामन्यात विजय मिळवला आहे. जिंकण्याचं प्रमाण ८२.७५ असं अफलातून आहे. या प्रकारात यशस्वी भारतीय कर्णधारांच्या मांदियाळीत त्याच्या नावाचा समावेश झाला आहे.

सूर्यकुमारच्या नेतृत्वाची झलक आशिया चषकादरम्यान पाहायला मिळाली. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत विजय मिळवला. तिन्ही सामन्यात टॉसवेळी सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यातील पाकिस्तानचा सहभाग आणि भारतीय सैन्याने केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने हा निर्णय घेतला. सामना संपल्यानंतरही सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केलं नाही. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने हा विजय भारतीय लष्कराला समर्पित करत आहोत असं सांगितलं. पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभाही आहोत असंही त्याने सांगितलं होतं.

या भूमिकेचे तीव्र पडसाद क्रिकेटवर्तुळात उमटले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी भारतीय संघाच्या वर्तनावर टीका करत उर्वरित सामन्यांवर बहिष्काराचा इशारा दिला. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषकाच्या जेतेपदावर नाव कोरलं. आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख या नात्याने नक्वी विजेत्या म्हणजेच भारतीय संघाला चषक देणार होते. मात्र भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते चषक घेण्यास नकार दिला. नक्वी यांनीही त्यांचा हट्ट सोडला नाही. दीड तासानंतर सुरू झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात भारतीय संघ जेतेपदाचा चषक स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झालं. भारतीय संघ आशिया चषकाविनाच मायदेशी परतला. आशिया चषकाचा करंडक दुबईस्थित आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयातच आहे.

पाहा व्हिडीओ

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ खेळल्यानंतर वयाच्या ३१व्या वर्षी सूर्यकुमारने भारतीय संघासाठी पदार्पण केलं. अद्भुत अशा फटकेबाजीच्या कौशल्याने सूर्यकुमारने अल्पावधीतच ट्वेन्टी२० प्रकारात जागतिक पटलावर स्थान निर्माण केलं. ‘सुपला’ हा त्याचा फटका अतिशय लोकप्रिय झाला. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमारने आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. आयपीएल स्पर्धेत सुरुवातीची काही वर्ष कोलकाता नाईट रायडर्स आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स संघांचा तो अविभाज्य घटक झाला. सूर्यकुमारच्या शैलीने जगभरातील क्रिकेटचाहत्यांना मंत्रमुग्ध केलं.

२०२४ मध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं. रोहित शर्मा तसंच विराट कोहली यांनी त्या सामन्यानंतर निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. संघबांधणीत महत्त्वाची भूमिका असलेल्या सूर्यकुमारकडे भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी उत्सुक आहे.

सूर्यकुमारने ९० टी२०, ३७ वनडे आणि एकमेव टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. टी२० प्रकारात भारतासाठी खेळताना त्याने ४ शतकं झळकावली आहेत.

‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत मान्यवरांशी अनौपचारिक संवादाचा कार्यक्रम आहे. आधीच्या एक्स्प्रेस अड्डा कार्यक्रमांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, दलाई लामा, उद्योगपती बिल गेट्स, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास हे सहभागी झाले होते. यांच्या बरोबरीने आधुनिक क्रिकेटचे शिलेदार विराट कोहली, रोहित शर्मा, बुद्धिबळ दिग्गज विश्वनाथन आनंद, ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा हेही एक्स्प्रेस अड्डामध्ये सहभागी झाले होते.