बँकॉक : भारताच्या ऐतिहासिक थॉमस चषक विजयात मोलाची भूमिका पार पाडणारा किदम्बी श्रीकांत आणि दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांनी थायलंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली, परंतु सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांचे आव्हान संपुष्टात आले.

आठव्या मानांकित श्रीकांतने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राइस लेव्हरडेजला १८-२१, २१-१०, २१-१६ असे नमवले. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना पात्रता फेरीतून पुढे वाटचाल करणाऱ्या आर्यलडच्या एनहाट एनगुएनशी होणार आहे.

महिला एकेरीत सहाव्या मानांकित सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लॅमवर २१-१९, १९-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. पुढच्या फेरीत तिची गाठ कोरियाच्या सिम यु जिनशी पडणार आहे. याच गटात मालविका बनसोडने युक्रेनच्या मारिया उल्टिनावर १७-२१, २१-१५, २१-११ असा विजय मिळवत आगेकूच केली. पुढील फेरीत तिचा सामना डेन्मार्कच्या लाइन ख्रिस्तोफरसेनशी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयचा मलेशियाच्या लिव डॅरेनकडून २१-१७, १५-२१, २१-१५ अशा फरकाने पराभव झाला. तर, महिला एकेरीच्या लढतीत लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने पहिल्या फेरीत कोरियाच्या की किम गा युनकडून २१-११, १५-२१, १७-२१ असा पराभव पत्करला.