जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना रंगत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी केलेला फलंदाज व्यंकटेश अय्यर आज भारतासाठी पदार्पणाचा टी-२० सामना खेळत आहे. कप्तान रोहित शर्माकडून अय्यरला पदार्पणाची कॅप मिळाली.

भारतासाठीच्या पहिल्या सामन्याबाबत अय्यरने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण देशासाठी खेळण्याची आकांक्षा बाळगतो, त्यामुळे ही संधी मिळाल्याने मी खूश आहे. राहुल (द्रविड) सरांच्या हाताखाली खेळायला मिळणार असल्याने चांगले वाटते, मी खूप उत्साहित आहे. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही लवचिक असायला हवे आणि मला मिळालेल्या भूमिकेचा फायदा घेण्याचा मी प्रयत्न करेन. मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे किंवा जेव्हा मला सांगितले जाईल, तेव्हा गोलंदाजी करण्यास तयार आहे. भारतीय प्रेक्षकांसमोर खेळणे खूप छान आहे.”

आयपीएलमध्ये पाडली छाप

२६ वर्षीय व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी केली. केकेआरकडून खेळताना त्याने १० सामन्यांत ४१ च्या सरासरीने ३७० धावा केल्या. लीगदरम्यान तो ओपनिंग करताना दिसला. पण सध्याच्या मालिकेत टीम इंडियाकडे रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रूपाने चांगले सलामीवीर आहेत. अशा स्थितीत त्याला शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीची संधी मिळेल. गोलंदाजीमध्ये २९ धावांत २ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

हेही वाचा – राहुल द्रविडचा ‘मिडास टच’, पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितली टीम इंडियाच्या यशासाठीची ७ सूत्र!

न्यूझीलंडचे कर्णधारपद टिम साऊदीकडे आहे. भारतीय संघ नुकताच टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध खेळला, तेव्हा केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील किवी संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. आता भारतीय संघ त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरला आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम साऊदी ( कर्णधार), टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.