Virat Kohli and KL Rahul out of Ranji Trophy : बीसीसीआयने नुकतेच भारतीय संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य केले होते. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी आपापल्या संघांसाठी रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी त्यांची उपलब्धता व्यक्त केली होती. आता विराट आणि केएल राहुल यांच्या रणजी क्रिकेट खेळण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की हे दोन्ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे पुढील फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाहीत.

विराट-राहुल रणजी ट्रॉफीतून बाहेर –

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी बीसीसीआय वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की त्यांना काही समस्या आहे, ज्यामुळे ते २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक सामन्यांच्या पुढील फेरीत खेळू शकणार नाहीत. सिडनीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी संपल्यानंतर तीन दिवसांनी कोहलीला मानदुखीचा त्रास होत होता आणि त्याने ९ जानेवारीला याबाबत इंजेक्शन घेतले होते. विराट कोहलीने बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्याला अजूनही वेदना होत आहेत, त्यामुळे तो राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

विराट-राहुलला दुखापत –

दुसरीकडे, केएल राहुलच्या कोपराला दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो बंगळुरूमध्ये पंजाबविरुद्ध कर्नाटकच्या सामन्यातून बाहेर असणार आहे. मात्र, कोहली आणि राहुलला रणजी करंडक खेळण्याची आणखी एक संधी आहे. रणजी २०२४-२५ च्या गट टप्प्यातील अंतिम फेरी ३० जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे सामने ६ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेपूर्वी संपतील. अशा स्थितीत दोन्ही खेळाडू रणजीमध्ये खेळताना दिसतील, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका यामुळे अद्याप काहीही ठरलेले नाही.

हेही वाचा – Virat Kohli : ‘विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी काऊंटी क्रिकेट खेळावे’, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाचे इतर खेळाडू ऋषभ पंत, शुबमन गिल आणि रोहित शर्मा सारखे स्टार फलंदाज रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत खेळताना दिसणार आहेत. रणजी करंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार फलंदाजांच्या नावांचा समावेश होताच याची पुष्टी झाली आहे.