Virat Kohli Retirement: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असला तरी त्याने खूप आधी निवृत्तीचे मन बनविले असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा उभारी घेण्याची गरज असून कसोटी चॅम्पियनशीपच्या नव्या पर्वाच्या सुरुवातीपासून काहीतरी नवे करावे लागणार असल्याची कल्पना विराट कोहली आणि आणि संघाला होती. नव्या अहवालानुसार, विराट कोहलीला कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविण्याची इच्छा होती. पण बीसीसीआयच्या इतर योजना असल्यामुळे हा पर्याय बारगळला.

क्रिकबझने दिलेल्या बातमीनुसार, कसोटी संघाचे कर्णधारपद नवोदित खेळाडूकडे देणार असल्याचे समजल्यानंतर विराट कोहलीने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीला स्वतःच्या खेळात बदल करण्यासाठी नव्या आव्हानांची गरज होती. यासाठी त्याने कर्णधारपदाची मागणी केल्याचे म्हटले जाते. मात्र विद्यमान व्यवस्थापनाकडून त्याला हवे तसे स्वातंत्र्य, वातावरण न मिळाल्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. मागच्या काळातील ड्रेसिंग रुमपेक्षा सध्याच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण वेगळे असल्याचे बोलले जाते.

मागच्या तीन वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची बॅट तळपलेली नाही. या काळात त्याने ३२ च्या सरासरीने धावा ओढल्या आहेत. ३६ वर्षीय विराट कोहलीला एका नव्या आव्हानाची गरज होती. ही जबाबदारी न मिळाल्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटला सोडण्याचा निर्णय घेतला, असे क्रिकबझच्या वृत्तात म्हटले आहे.

निवृत्तीचा अंतिम निर्णय घेण्याआधी विराटने भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि त्याचे जवळचे मित्र रवी शास्त्री यांना फोन केला होता, असेही सांगितले जात आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशीही तो बोलला, मात्र या संभाषणातील माहिती बाहेर कळू शकलेली नाही. बीसीसीआयवर प्रभाव असलेल्या राजीव शुक्ला यांचीही भेट घेण्याचा विारटचा प्रयत्न होता. मात्र भारत-पाकिस्तान तणाव निर्माण झाल्यामुळे या बैठकीसाठी वेळ मिळाली नाही.

विराटने बीसीसीआयचे प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांच्याशी दोन वेळा संपर्क साधल्याचे सांगितले जाते. मात्र दोन वेळा बोलूनही ते विराट कोहलीचा निर्णय बदलू शकले नाहीत.

कसोटी कारकिर्द कशी होती?

विराट कोहलीने २०११ साली वेस्टइंडिज दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण केले होते. त्याने एकूण १२३ कसोटी सामने खेळले असून २१० डावात फलंदाजी करताना त्याने ४६.९ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. कसोटी कारकिर्दीत ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकवली आहेत. नाबाद २५४ धावा ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.