scorecardresearch

Virat Kohli: मी इतका दबावाखाली होतो की राहुल द्रविडने…”, विराट कोहलीने मेलबर्नमधील जादूई खेळीची काढली आठवली, जाणून घ्या

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ८२ धावांची धडाकेबाज खेळी करत टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला.

I was under so much pressure that Rahul Dravid Virat Kohli recalls his magical innings in Melbourne
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

आपल्या कारकिर्दीतील वाईट टप्प्याची आठवण करून देताना, विराट कोहलीने नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यात त्याने गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या जादुई खेळीची आठवण करून दिली. ज्याने क्रिकेट चाहत्यांना शतकानुशतके लक्षात ठेवण्याचे क्षण दिले आहेत. आशिया चषकात त्याचे पहिले टी२० शतक झळकावून कोहली फॉर्ममध्ये परतला असला तरी, २०२२ टी२० विश्वचषकातील MCG येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयी खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास परत आला.

प्यूमा ब्रँडच्या कार्यक्रमादरम्यान त्या ऐतिहासिक खेळीबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, “मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान काय घडले ते मलाही समजले नाही.” सप्टेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने टीम इंडियाला आशिया कपमधून बाहेर पडावे लागले. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकादरम्यानही टीम इंडियाची अशीच परिस्थिती आली जेव्हा भारताने पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना ६.१ षटकात ४ गडी गमावून ३१ धावा केल्या होत्या.

पाकिस्तानच्या शिस्तबद्ध आक्रमणासमोर कोहली आणि हार्दिक पांड्याची जोडी उभी राहिली आणि त्यांनी ११३ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान कोहलीने हरिस रौफविरुद्ध दोन शानदार षटकार मारून सामन्याचा मार्ग पूर्णपणे बदलून टाकला. ३३ वर्षीय कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी करत भारताला पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवून दिला.

हेही वाचा: Salim Durani Died: भारतीय क्रिकेट संघाचा रोमँटिक हिरो सलीम दुर्रानी यांचे निधन, क्रिकेट क्षेत्रात पसरली शोककळा

कोहलीने सांगितले की त्याच्यावर इतका दबाव होता की त्याने ब्रेक दरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. तो म्हणाला, “मला अजूनही ते समजू शकत नाही. मी हे प्रामाणिकपणे सांगत आहे आणि अनेकांनी मला विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही काय विचार करत आहात, तुम्ही कसे नियोजन केले आणि माझ्याकडे उत्तर नाही. खरे तर माझ्यावर इतका दबाव होता की १२व्या किंवा १३व्या षटकापर्यंत माझे विचार करणे पूर्णपणे बंद झाले होते.”

विराट पुढे म्हणाला, “मी ज्या वाईट फॉर्ममधून जात होतो, त्यानंतर मी आशिया कपमध्ये पुन्हा परत आलो आणि चांगला खेळ करून दाखवला. मला वाटले की मी या विश्वचषकात खेळण्यासाठी तयार आहे. आम्ही १०व्या षटकात ३१ धावा केल्या होत्या पण ४ विकेट्स पडल्या होत्या त्याचवेळी अक्षरही धावबाद झाला होता.” माजी कर्णधार म्हणाला, “मी १२ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. मला आठवते की राहुल भाई माझ्याकडे ब्रेकच्या वेळी आले होते आणि त्यांनी काय सांगितले ते मला अजूनही आठवत नाही. मी शपथ घेऊन सांगतो की त्यावेळेस माझे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. मी त्यांना म्हणालो, “तुम्ही मला त्या ब्रेकमध्ये काय सांगितले ते मला माहीत नाही कारण मी वेगळ्याच झोनमध्ये आलो होते.”

भारताच्या या अनुभवी फलंदाजाने कबूल केले की त्यावेळी त्याची विचार करण्याची शक्ती पूर्णपणे बंद झाली होती. कोहलीच्या म्हणण्यानुसार हा त्याच्यासाठी आयुष्यातला वेगळाच अनुभव होता. कारण, त्याच्या कारकिर्दीत पुन्हा परतणार की नाही याचा त्यावेळी निकाल लागणार होता. तो म्हणाला, “माझे मन खूप वेगाने फिरत होते… मला असे वाटत होते की हे नेहमीपेक्षा वाईट फलंदाजी करत आहे. मी इतका दबावाखाली वाकलो होतो की मागे वळून पाहूच शकत नव्हतो आणि ही माझी प्रामाणिक भावना होती. तेव्हा माझ्या अंतःप्रेरणेने ताबा घेतला, जेव्हा मी विचार करणे आणि नियोजन करणे थांबवले, तेव्हा माझ्याकडे जी काही देवाने दिलेली प्रतिभा होती ती समोर आली आणि मग मला वाटले की कोणीतरी देव मला मार्गदर्शन करत आहे.”

हेही वाचा: IPL 2023: आता IPL ची कॉमेंट्री भोजपुरीत! धोनीच्या हंगामातील पहिला षटकाराचे कौतुक करताना भाजप नेता म्हणतो, “जियो रे भोजपुरीया…”

कोहली पुढे म्हणाला, “मी यावर कोणताही दावा करू शकत नाही. मी पूर्वीही ते करण्याचा प्रयत्न केला नाही पण एक गोष्ट सांगतो की संकटकाळी देव मदतीला नक्कीच धावून येतो. माझ्यासाठी धडा हा होता की अशा बिकट प्रसंगी तुमच्या मनात वाईट विचार येऊ देणे थांबवा कारण ते तुम्हाला वास्तविकते पासून दूर घेऊन जातात. त्या रात्री काय घडले हे मी कधीच सांगू शकत नाही आणि कारण अशी घटना पुन्हा कधीच होणार नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 13:45 IST

संबंधित बातम्या