रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान लढतीत पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानचं बझूका सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं. फरहानने अर्धशतकी खेळी साकारत पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या फायरिंग सेलिब्रेशनवर जोरदार टीका झाली. काय आहे हा सेलिब्रेशनचा प्रकार आणि त्याची ऐतिहासिक पाळंमुळं काय आहेत याचा घेतलेला आढावा.

बझूका म्हणजे काय?

बझूका हे रॉकेट लॉन्चर आहे. शत्रूला जेरीस आणण्याच्या दृष्टीने अतिशय भेदक आणि उपयुक्त असं हे शस्त्र आहे. खांद्यावर ठेऊन हे रॉकेट लॉन्चर वापरलं जातं. हाताळण्यास आणि वाहतुकीस सोपी अशी याची रचना असते. अतिशय वेगाने प्रतिस्पर्ध्यांवर रॉकेट डागता येतात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या लष्कराने असे रॉकेट लॉन्चर वापरले होते. बझूका हा बझू शब्दाची सुधारित आवृत्ती. दर्पोक्ती किंवा वाचाळपणा असा काहीसा त्याचा अर्थ होतो. बझूइन या डच शब्दाशी बझूकाचं साधर्म्य आहे. अचूक लक्ष्यभेद करणारे रॉकेट सोडून प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणण्यासाठी बझूकांचा वापर केला गेला. अमेरिकेच्या अनेक यशस्वी मोहिमांमध्ये त्याचा वापर करण्यात आला.

भारत-पाकिस्तान लढतीत कोणी केलं बझूका सेलिब्रेशन?

साहिबजादा फरहानने पाकिस्तानला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरूवात करून दिली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ४५ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने वादग्रस्त सेलिब्रेशन करत मैदानात खळबळ उडवली. फरहाननं मैदानावरच आपल्या बॅटने बंदुकीने गोळीबार करण्यासारखी अ‍ॅक्शन केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. पाकिस्तानच्या लष्कराप्रमाणे फरहानने कृती केल्याने टीकेची झोड उठली. या सेलिब्रेशनमुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. आयसीसीने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.

या साामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवून भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करण्याची संधी निर्माण करून दिली होती. पण अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनी सोपे झेल सोडले. याचा पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. भारतीय संघाने हा सामना ६ विकेट्सनी जिंकला.

बझूका सेलिब्रेशनवर झाली टीका

भारत आणि पाकिस्तान या समान्यावरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. ‘पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच त्याने त्याच्या कृतीतून दाखवलं, हे बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी लज्जास्पद असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडलं, साहिबजादा फरहान याचं अर्ध शतक होताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची अक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहेलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे, अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह महान आहेत!”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला

एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांनी जीव गमावला होता. या हल्ल्याची पाळंमुळं पाकिस्तानमध्ये असल्याचं स्पष्ट झालं होतं. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेत पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्धव्स्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध बंद केले. पाणीपुरवठाही बंद केला. या पार्श्वभूमीवर आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणार का या विषयी साशंकता होती. मात्र केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. आयसीसी तसंच आशिया चषकसारख्या स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध खेळेल मात्र दोन देशांदरम्यान क्रिकेट मालिका होणार नाही असं केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं.

आशिया चषकाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर चाहत्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय बहिष्कारासारखा पर्याय धोक्याचा ठरू शकतो. ऑलिम्पिक तसंच कॉमनवेल्थ आयोजनासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. बहुराष्ट्र स्पर्धेत भारताने अशी भूमिका घेणं अडचणीचं ठरू शकतं असं मत बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया यांनी म्हटलं होतं.

आपण या स्पर्धेवर किंवा सामन्यावर बहिष्कार टाकू शकत नाही. तसं केल्यास त्याचे परिणाम नकारात्मक होतात. जेव्हा भविष्यात आपल्याला एखादी जागतिक स्तरावरच्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तेव्हा अशी भूमिका अडचणीत टाकू शकते. या स्पर्धेत आपण सहभागी होत आहोत कारण खेळणं, न खेळणं थेट आपल्या हातात नाही. दोन देशांदरम्यानची मालिका असती तर त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट आहे. २०१२-१३ नंतर पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळलेलो नाही, असं साईकिया यांनी सांगितलं.

बझूका सेलिब्रेशन आयपीएलमध्ये कधी पाहायला मिळालं होतं?

2024 आयपीएल हंगामात पंजाब किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या रायली रुसोने तडाखेबंद अर्धशतक झळकावल्यानंतर बझूका सेलिब्रेशन केलं होतं. रायलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध २१ चेंडूतच अर्धशतकाला गवसणी घातली. अर्धशतक पूर्ण होताच रुसोने पंजाबच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने बॅट रोखून बझूका सेलिब्रेशन केलं. रॉकेटमधून वेगाने मारा व्हावा तसं रुसोच्या बॅटमधून चौकार, षटकारांची लयलूट झाली. त्या सेलिब्रेशनचा अर्थ हा होता.

रुसो बाद झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या सेलिब्रेशनची नक्कल केली होती. विराटने या लढतीत ४७ चेंडूत ९२ धावांची वेगवान खेळी साकारली होती. पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी दोनदा त्याला जीवदान दिलं. याचा त्याने पुरेपूर फायदा उठवला.

बंगळुरूने २४१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाब किंग्जचा डाव १८१ धावांतच आटोपला. बंगळुरूचा हा चौथा सलग विजय होता.

विश्वविजेत्या संघाच्या कर्णधारानेही केलं होतं असं सेलिब्रेशन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमा यानेही बझूका सेलिब्रेशन केलं होतं. विजेत्या संघाला गदा देण्यात आली. तेंबाने ही गदा खांद्यावर ठेऊन गोळ्या झाडाव्यात असा अभिनय केला. तेंबाचं हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चोकर्स अर्थात मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ असं म्हटलं जातं. मात्र इतिहास बाजूला सारत दक्षिण आफ्रिकेला बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर नाव कोरलं. दमदार खेळासह जेतेपदावर नाव कोरत तेंबाच्या संघाने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

धोनीनेही केलं होतं बझूका सेलिब्रेशन

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या १८३ धावांच्या मॅरेथॉन खेळीदरम्यान बझूका सेलिब्रेशन केलं होतं. लष्करात मानद पदावर कार्यरत धोनीने त्या खेळीदरम्यान बंदुकीच्या फैरी झाडणारं हे अनोखं सेलिब्रेशन केलं होतं.