पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारताने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत आपलं आव्हान कायम राखलं. दुसऱ्या कसोटीत चुकीच्या संघनिवडीमुळे टीकेचा धनी बनलेल्या विराटने तिसऱ्या कसोटीत महत्वाचे बदल केले. यामध्ये दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या संघाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत ऋषभने यष्टींमागे उत्कृष्ठ कामगिरी केली.

पहिल्या डावामध्ये फलंदाजीदरम्यानही ऋषभने चांगल्या धावा केल्या. मात्र ब्रॉडच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यावेळी ब्रॉडने ऋषभला स्लेजिंग करत चांगलीच खुन्नस दिली. मात्र करावे तसे भरावे या म्हणीचा प्रत्यय ब्रॉडला आपल्या फलंदाजीदरम्यान आला. मोहम्म शमीच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू स्टुअर्ट ब्रॉडने खेळून काढला. यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने ब्रॉडला पंतसोबत झालेल्या प्रसंगाची आठवण करुन दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

सध्या इंग्लंड ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. या दोन्ही संघांमधली चौथी कसोटी गुरुवारपासून सुरु होणार आहे. चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाने मुरली विजय आणि कुलदीप यादवला विश्रांती देत मुंबईकर पृथ्वी शॉ आणि हैदराबादचा कर्णधार हनुमा विहारील भारतीय संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे उरलेले दोन कसोटी सामने भारतीय संघ कसा खेळतो आणि मालिकात जिंकण्यात यशस्वी होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.