Ben Stokes Celebration After Yashasvi Jaiswal Wicket: बर्मिंघममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने दमदार शतकी खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यातही त्याला चांगली सुरूवात मिळाली होती. तो शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण, एका चुकीमुळे त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.
या सामन्यातही भारतीय संघाला पहिल्या डावात फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. त्यामुळे यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या जोडीकडून या डावातही चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. केएल राहुल अवघ्या २ धावांवर माघारी परतला आणि अवघ्या १५ धावांवर भारतीय संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर जैस्वाल आणि करूण नायरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. करूण नायर बाद झाल्यानंतर कर्णधार गिल आणि जैस्वालने मिळून अर्धशतकी भागीदारी केली.
एक चूक जैस्वालला महागात पडली
यशस्वी जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली होती. कारण तो बाहेर जाणारे चेंडू सोडत होता. तर ज्या चेंडूवर धावा गोळा करण्याची संधी मिळत होती, त्या चेंडूवर तो धावा करत होता. त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं. या डावातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण स्टोक्सच्या गोलंदाजीवर तो ८७ धावा करत माघारी परतला.
तर झाले असे की, इंग्लंडकडून ४६ वे षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्स गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू स्टोक्सने ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. हा चेंडू टप्पा पडून आणखी बाहेर गेला. या चेंडूवर जैस्वालने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटचा कडा घेत यष्टीरक्षक जेमी स्मिथच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. जैस्वालचं शतक अवघ्या १३ धावांनी हुकलं. दरम्यान तो बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सने जोरदार सेलिब्रेशन केलं.