डॉ. प्रदीप आवटे

करोना विषाणूचा ब्रिटनमधील नवा अवतार तिथे पुन्हा टाळेबंदी लागू करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. एखाद्या विषाणूचा नवा अवतार, नवीन स्ट्रेन म्हणजे काय हा आपल्या सर्वासमोरील प्रश्न आहे. ब्रिटनमधील नव्या विषाणूने अनेकांची झोप उडवलेली असली तरी एवढी भीती बाळगण्याची खरोखरच आवश्यकता आहे का, हेही आपण समजावून घेतले पाहिजे.

विषाणूला खरे म्हणजे सजीव मानणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ  शकतो ना श्वास घेऊ  शकतो. विषाणू सजीव आणि निर्जीवाच्या सीमारेषेवर रेंगाळणारा सूक्ष्मजीव आहे. विषाणू म्हणजे काय तर प्रोटिनने बनलेल्या पिशवीत कोंबलेला जनुकीय मटेरिअलचा गोळा. हे जनुकीय मटेरिअल हे आरएनए किंवा डीएनए स्वरूपात असते. एखाद्या जिवंत पेशीत प्रवेश केल्याशिवाय विषाणू तगून राहू शकत नाही किंवा वाढू शकत नाही. विषाणू एखाद्या सजीव पेशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याची वाढ होते म्हणजे तो स्वत:च्याच अनेक कॉपी तयार करतो. विषाणू बदलतात म्हणजे काय आणि विषाणू का बदलतो, हे दोन प्रश्न आपल्या सर्वाच्याच मनामध्ये आहेत.

विषाणू एखाद्या सजीव पेशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याची वाढ होते म्हणजे तो स्वत:च्याच अनेक कॉपी तयार करतो. एका अर्थाने एखाद्या झेरॉक्स मशीनवर आपण मूळ कागदपत्राच्या अनेक प्रती कराव्यात, अशा पद्धतीने एका विषाणू कणाचे अनेक विषाणू कण पेशीमध्ये तयार होतात. मात्र या कॉपी तयार करताना आपल्याकडून जसे टायपो होतात, स्पेलिंग मिस्टेक होतात त्या पद्धतीने विषाणूंच्या कॉपी करतानाही घडते आणि त्यातून विषाणूच्या रचनेमध्ये बदल होऊन विषाणू म्युटेट होतो.

विषाणूमध्ये होणारे हे बदल अनेकदा नजरचुकीने होणारे बदल असतात तर काही वेळा यजमानाच्या प्रतिकारशक्तीला फसविण्यासाठी, तिच्यावर मात करण्यासाठी विषाणूविरोधी औषधांचा मारा चुकवण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक बदलही असतात. कोणत्याही सजीवाच्या उत्क्रांतीमधील नैसर्गिक निवड हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे विषाणूमध्ये हे जे बदल सातत्याने होत असतात, त्यातील जो बदल विषाणूला तगून राहण्यासाठी मदत करतो, ते बदल अधिक काळ टिकतात. ज्या शरीरामध्ये विषाणूने प्रवेश केला आहे, त्याला मारण्यामध्ये विषाणूचेही नुकसान असते. कारण मग त्याला नवीन जिवंत पेशी शोधावी लागते म्हणूनच अत्यंत घातक स्वरूपाचे बर्ड फ्लूसारखे विषाणू अधिक वेगाने पसरताना दिसत नाहीत, तर वेगाने पसरणारे फ्लूसारखे विषाणू तेवढे प्राणघातक नसतात. हे संतुलन एका अर्थाने निसर्गानेच जपले आहे.

जनुकीय रचना बदलल्यामुळे विषाणूला काही वेळा नवे गुणधर्म प्राप्त होऊ  शकतात. काही वेळा हे बदल विषाणू प्रसारास सहाय्यभूत ठरतात किंवा काही वेळा प्रसाराचा वेग मंदावतोदेखील. काही विशिष्ट बदलांमुळे विषाणू मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर हल्ला करेल, याचे स्वरूपही बदलू शकते. तसेच विषाणूच्या घातकतेमध्येही बदल होऊ  शकतात. सध्या इंग्लंडमध्ये करोनाचा जो नवा विषाणू आढळून आला आहे त्यामुळे या विषाणूच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. तसेच हा विषाणू मुख्यत्वे तरुण लोकसंख्येला प्रादुर्भाव करताना दिसत आहे. तथापि या विषाणू बदलामुळे त्याच्या घातकतेमध्ये कोणताही बदल झालेला नाही, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. म्हणजेच या नव्या रूपामुळे कोविड आजारातील गुंतागुंत वाढलेली नाही किंवा मृत्यूचे प्रमाणही वाढलेले नाही. तथापि हा नवीन विषाणू प्रकार मूळ विषाणूपेक्षा अधिक घातक नसल्याने तसेच त्याच्या प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल झाला नसल्याने त्याबद्दल भीती बाळगण्याचे कारण नाही. हा विषाणू प्रसार रोखण्याचे उपाय तेच आहेत- शारीरिक अंतर राखणे, समूहात मास्क वापरणे आणि हातांची स्वच्छता जपणे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे पँडेमिक सुरू झाल्यापासून हा विषाणू आताच बदलला आहे, अशातला भाग नाही. आतापर्यंत त्याच्यामध्ये जवळपास एक हजारपेक्षाही अधिक वेळा जनुकीय बदल झाले आहेत. सतत जनुकीय बदल करत राहणे, हा विषाणूच्या जीवनक्रमातील एक नेहमीचा भाग आहे. विशेषत: इन्फ्लुएंझा, करोना असे आरएनए प्रकारचे विषाणू सातत्याने बदलत असतात.

आपल्याकडे करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ८० टक्क्यांहून अधिक मृत्यू ५० वर्षांवरील वयोगटातील आहेत, तर ७० टक्कय़ांहूनही अधिक मृत्यू हे ज्यांना अतिजोखमीचे आजार आहेत, अशा व्यक्तींचे आहेत. या पार्श्वभूमीवर करोना उद्रेक रोखण्याच्या दृष्टीने आणि या आजारातील गुंतागुंत आणि मृत्यू टाळण्यासाठी या अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींसाठी ही लस घेणे अधिक उपयुक्त ठरणार आहे.

लशीच्या परिणामकारकतेवर विपरीत परिणाम नाही

विषाणूमध्ये झालेल्या या नव्या बदलामुळे करोनाविरोधी जी लस आता उपलब्ध होते आहे, तिच्या परिणामकारकतेवर काही विपरीत परिणाम होईल का, अशी एक भीती अनेकांच्या मनात आहे. करोना विषाणूमध्ये आतापर्यंत झालेली म्युटेशन लक्षात घेता तो आजही ९९.९३ टक्केमूळ वुहान विषाणूसारखा आहे. याचाच अर्थ त्याच्या रचनेत झालेले बदल हे अगदी अत्यल्प आहेत, त्यामुळे या नवीन लशीच्या परिणामकारकतेवर फारसा परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात नक्की काय होईल, हे येणारा काळच सांगेल.

(लेखक राज्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे सर्वेक्षण अधिकारी आहेत.)