देवेश गोंडाणे

तांत्रिक शिक्षणाच्या गोंडस नावाखाली शालेय विद्यार्थ्यांचे जीवन यांत्रिक स्वरूपाचे झाले असून तो मूळ संस्कारक्षम, मूल्याधिष्ठित शिक्षणापासून भरकटत आहे. विद्यार्थिदशेतील या संवेदनशील जीवनाला सर्वागीण विकासाचे संस्कार संक्रमणाचे काम उपराजधानीतील सचिन आणि भाग्यश्री देशपांडे हे दोन युवा अभियंते पाच वर्षांपासून करीत आहेत. विद्यार्थ्यांची ग्रामीण जीवनाशी नाळ जोडावी आणि त्यांना शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि मानसिक अशा चार अंगांनी शिक्षण देण्याचे काम ‘अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल’च्या माध्यमातून करत हे युवा अभियंत्यांनी असंख्य युवकांसमोर आदर्श उभा केला आहे.

शिक्षण हे जीवनाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणे या विचाराने अनेक संस्थांनी कामही सुरू केले. मात्र, ६० टक्के कृषिप्रधान असणाऱ्या देशात वर्तमान पिढीची ग्रामीण आणि कृषीशी नाळ तुटत चालली आहे. यावर सचिन आणि भाग्यश्री देशपांडे यांनी अभ्युदय शाळेच्या माध्यमातून हा विचार मोडीत काढत विद्यार्थ्यांची कृषीशी नाळ जोडली जात आहे.

नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या सावनेर तालुक्यातील एका खेडय़ात सचिन आणि भाग्यश्री देशपांडे यांनी हा प्रयोग सुरू केला. सचिन आणि भाग्यश्री हे दोघेही मुळात अभियंते. अभियंता पदाची नोकरी सोडून त्यांनी ग्रामोद्धाराचा वसा उचलला. अकरा एकरच्या शेतामधील काही भागात शाळा तर इतर शेतात प्रयोगशाळा उभारली. परिसरातील १८ गावांतील ३१७ मुल-मुली आज येथे शिक्षण घेत आहेत. नर्सरी ते आठव्या वर्गापर्यंत त्यांना शिक्षण दिले जाते. वर्तमान काळात सिमेंटच्या जंगलात वाढणाऱ्या आणि आपल्या संस्कृतीशी दुरावत चाललेल्या या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासावर येथे काम केले जाते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र, सततची नापिकी, वाढत्या आत्महत्या आणि शेती हा तोटय़ाचा धंदा अशी धारणा झाल्याने आजचा युवक यापासून लांब पळत शहरात कामधंदा शोधत असतो. मात्र, सचिन आणि भाग्यश्री देशपांडे यांनी कृषी हा आपल्या संस्कृतीचा कणा माणून येणाऱ्या पिढीला या क्षेत्रात आवड निर्माण करण्यासाठी अन्य शिक्षणासह कृषी शिक्षण देण्याचा निर्धार केला. शाळेच्या परिसरात असणारी शेती ही मुलांची प्रयोगशाळा आहे. आमचा विद्यार्थी हा नोकरी मागणारा नाही तर नौकरी देणारा बनावा या दिशेने दोन युवा अभियंते या अभ्युदय ग्लोबल शाळेतून यंत्र नव्हे तर उद्याच्या सक्षम भारताला पुढे नेणारे युवक घडवण्याचा यशस्वी प्रयोग करीत आहेत.

खासगी शिक्षण घेणे ही जिथे सामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट झाली. तिथे हे अभ्युदय शाळेत अत्यंत वाजवी दरात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. एका विद्यार्थ्यांवर वार्षिक २२ ते २५ हजारांचा खर्च शाळा करते. शाळेमध्ये आज २८ शिक्षक कार्यरत आहेत. २० मुलांच्या मागे एक शिक्षक असावा या भूमिकेतून अधिकाधिक शिक्षक नेमण्यात आल्याचे सचिन देशपांडे यांनी सांगितले. यासाठी दानदाते देणग्या आणि सामाजिक दायित्व करारातून काही निधी उपलब्ध होत असतो. मुलांना इंग्रजी शिक्षण देताना त्यांच्या बोलीभाषा जपण्यावरही विशेष लक्ष दिले जाते. त्यांच्या गावबोली बोलण्याची मुभाही दिली जाते. ही भाषा श्रेष्ठ ती कनिष्ठ असा कुठलाही भेद या शाळेत केला जात नाही. आपली भाषा म्हणून मराठी तर दुसरी भाषा म्हणून हिंदी आणि ग्लोबल भाषा म्हणून इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. या सर्व माध्यमातून व प्रयोगशील शिक्षणातून उद्याच्या नवा भारत घडवण्याचा प्रयत्न देशपांडे दाम्पत्य करत आहेत आणि असंख्य युवकांसमोर आदर्श उभा केला आहे. या कामात प्रकाश गांधी, माधुरी गांधी हेही सचिन आणि भाग्यश्री देशपांडे यांच्या कार्यात साथ देत आहेत.

शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि मानसिक अशा चार अंगांनी मुलांच्या विकासावर भर दिला जातो. हे आंतरिक ज्ञान विद्यार्थ्यांना देताना त्याच्या बाह्य़ ज्ञानावरही भर असतो. परिवार, समाज, देश आणि निसर्ग या चारहीकडे लक्ष द्यावे यावर भर असतो. आपण पर्यावरणाकडून सर्व काही घेतो मग आपलही काही देणे लागते. या भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून त्यांना सन्मानपूर्ण जीवन जगण्याचे धडे आमच्या शाळेत दिले जातात, असे शाळेचे संचालक सचिन देशपांडे यांनी सांगितले.

व्यवस्थापनाचे धडे

शाळेमध्ये प्रयोगशील शिक्षण देताना वेळ कमी पडत असल्याने सातवी आणि आठवीसाठी निवासी शाळेची सोय करण्यात आली आहे. शाळेच्या परिसरात एक तेलाची घाणी पल्वारायजर मशीन आहे. गिरणीही लावण्यात आली आहे. शेतात विविध प्रकारची भाजी, फळे पीकवली जातात. या सर्व माध्यमातून याचे मार्केटिंग कसे करायचे याचे शिक्षणही विद्यार्थ्यांना दिले जाते. ५० देशी गायींची गोशाळाही आहे. यातून विद्यार्थ्यांना सर्वागानी ज्ञान देण्यावर भर दिला जातो.

शेतीसह मैदानी खेळही

आपल्याकडील खो-खो, कबड्डी या कमी खर्च लागणाऱ्या मैदानी खेळ आहेत. पण याचा आज विसर पडला आहे. त्यामुळे या मैदानी खेळ शिकवून मुलांना मातीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना कुठलाही विषय शिकवताना तो प्रयोगातून शिकवला तर सहज समजतो. आणि लक्षात ठेवण्यासही सोपा जातो. त्यामुळे मुलांना सर्व शिक्षण हे प्रयोगातून शिकवले जाते. क्षेत्रफळ शिकवताना विद्यार्थ्यांना थेट शेतात नेऊन क्षेत्रफळ कसे काढता येते, हे सांगितले जाते. यातून मुलांमध्ये शेतीविषयक एक आस्था, आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्नही येथे होतो.