सबंध जग एक कोडं अनेक वर्ष सोडवत होतं तरी त्याचं उत्तर सापडत नव्हतं. सगळीकडे शाळा, कॉलेज, विद्यापीठं याच्यात पहिले येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, पोत्याने गुण मिळवणारे पुढच्या आयुष्याच्या परीक्षेत नापास होत होते. काहींची लग्नं फिसकटत होती, काही नोकरीधंद्यात मार खात होते. बुद्धय़ांक म्हणजे ‘आय.क्यू.’ चांगला असून असं होण्याचं कारण डॅनियल गोलमन याने प्रथम मांडलं. अशा लोकांचा ‘इमोशनल कोशंट’ म्हणजे ‘ई.क्यू.’ वा भावनांक कमी पडतो. साध्या शब्दांत दुसऱ्याविषयी विचार करण्याची क्षमता कमी पडते. लहानपणी शिकलेला नागरिकशास्त्र हा विषय खरा म्हणजे याबद्दलच होता, असं मला वाटलं. विवाहाचा अर्थ लावतानाही हाच भावनांक महत्त्वाचा ठरतो. ज्याचा कोणी फार विचार करत नाही असे वाटते.

भावनांक ऊर्फ ‘ई.क्यू.’ याचा अर्थ स्वत:चं मत बाजूला ठेवून दुसऱ्याच्या मनाप्रमाणे करणं असा नाही. त्याचा अर्थ असा की, स्वत:चं महत्त्व तसंच ठेवून दुसऱ्याच्या मताचा विचार केला आहे हे योग्य शब्दांत व्यक्त करता आलं पाहिजे. जो चालू विषय असेल तो विचार समजण्याची बौद्धिक कुवतही पाहिजे आणि भावनिक कुवतही पाहिजे. या बाबतीत आपल्या समाजाची परिस्थिती बघू या. सरासरी स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या भावनांकात फरक असतो, असं मला नक्की वाटतं. मी स्वत:ही त्याला अपवाद नाही.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

त्यासाठी काही उदाहरणं घेऊ. शब्द न वापरता तान्हं बाळ आणि आई यांच्यात जो काही संवाद असतो ती म्हणजे भावनांकाची परिसीमा असते. बाळ काही बोलूच शकत नाही, त्यामुळे शब्द हा प्रश्नच येत नाही. रडण्याच्या प्रकारावरून बाळाला नेमकं काय म्हणायचं आहे हे आई ओळखायला सुरुवात करते आणि जेव्हा तिला ते बरोबर कळतं तेव्हा तिचा दिसतो तो ‘ई.क्यू.’ हीच गोष्ट बाबांना करता येणार नाही, असं अजिबात नाही, पण सुरुवात आई आणि बाळ यांच्यापासून होते. बऱ्याच वेळेला सबंध कुटुंबात सर्वात कच्चा गडी म्हणजे बाबा अशी परिस्थिती निर्माण होते.

आपल्या समाजातला स्त्रियांचा भावनांक संस्कारांमुळे, पुरुषप्रधान परंपरेमुळे जास्त असायलाच लागतो आणि ती शिकवण त्यांना आयुष्यभर पुरते. प्रयत्न केला तर पुरुषालाही हे अशक्य नाही. प्रश्न आहे तो हे पुरुषाला पटण्याचा. दुसऱ्याचा विचार करणारा पुरुष किंवा दुसऱ्याच्या भावनांची कदर करणारा पुरुष हे सर्वसाधारण पुरुषाचं वर्णन होऊ  शकत नाही. एवढंच काय, कुटुंबात फार गुंतलेला, बायकोची कदर करणारा असा पुरुष असला तर त्याला बायल्या म्हणून हिणवतातदेखील. परदेशी मुली भारतीय मुलांना ‘ममाज बॉय’ म्हणून ओळखतात.

बहुतेक भारतीय पुरुष शेकडो वर्षांच्या पिढय़ान्पिढय़ांच्या परिणामामुळे आत्मकेंद्री असतात, बायको त्यामुळे अस्वस्थ असते, वैवाहिक जीवन अस्वस्थ असतं. तरीदेखील मी म्हणतोच आहे की, ‘‘विवाहाचं बिघडलेलं यंत्र कुठच्याही अवस्थेत दुरुस्त करता येतं.’’ कुठच्या तरी पद्धतीने अभ्यास करून, विचार करून किंवा उपजत बुद्धीनेसुद्धा लग्न झालेल्या पुरुषाचा भावनांक बायकोच्या तोडीने वाढला तर लोक क्वचित त्यांना एकमेकांच्या प्रेमात असलेलं जोडपं म्हणून ओळखतात किंवा बऱ्याच वेळा बायकोच्या धाकात आहे, असं म्हणतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याखेरीज दुसरा मार्ग नाही.

आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल असलेली कदर, व्यक्त केलेली काळजी याला भावनांक म्हटलं काय किंवा सरळसरळ प्रेम म्हटलं काय, वैवाहिक जीवनातली ती खरं म्हणजे प्राथमिक अटच आहे.

ज्यांचा भावनांक कमी असेल त्यांच्यामध्ये सुधारणा शक्य आहे. शाळा-कॉलेजच्या औपचारिक शिक्षणाने खरं म्हणजे भावनांकामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे; पण भारतामधल्या शिक्षणाने ते होत नाही, हा शिक्षणपद्धतीचा दोष आहे. त्यात मुळापासून बदल करण्याची गरज आहे. बहुतेक घरांमधला ‘घर’पणा टिकवून ठेवण्याचं श्रेय अजूनही घरच्या बाईलाच असतं. घरी आलेल्या पाहुण्यांची जबाबदारीसुद्धा तिची असते असं बरेचदा आढळतं.

भावनांक हा विषय घरालाच नाही तर कामाच्या ठिकाणी कसा लागू होतो ते जरा सांगतो.

मी अनेक टॅक्स कन्सल्टंट्स, वकील, डॉक्टर्स यांच्या ‘ऑफिसेस’मध्ये अगणित वेळा गेलेलो आहे. ९९ टक्के ठिकाणी आलेल्या लोकांनी चपला दाराबाहेर काढायची सूचना असते. बहुतेक ठिकाणी चपला-बूट ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्थाही नसते. आपण ‘वेटिंग रूम’मध्ये बसलेलो असताना ‘ऑफिस’चा स्टाफ किंवा मालक, ‘पार्टनर’ आपल्यादेखत चपला, बूट घालून ‘केबिन’मध्ये जातात. मला हे वागणं सर्वच दृष्टिकोनातून चुकीचं वाटतं. ‘जो नियम दुसऱ्याला तोच स्वत:ला’ या तत्त्वात हे वागणं बसत नाहीच, स्वच्छतेच्या कल्पनेमध्येही बसत नाही. स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी दुसऱ्याला दिलेली अन्यायकारक वागणूक या एकच वर्णनात हे बसतं. अशा सगळ्या ‘कन्सल्टंट्स’चा प्रश्न भावनांकाचाच असला पाहिजे.

सरासरी शहरी माणूस ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ काढून बसलेला असतो. त्याचं घर म्हणजे ‘प्रायव्हेट’ आणि अगदी जवळची थोडी माणसं ‘लिमिटेड’. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही अगदी ‘लिमिटेड’. या अर्थाने सहज शंभर-दोनशे ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यां’ची उदाहरणं मला आसपास दिसतात.

जसा आपल्याला व्यक्तीचा भावनांक वागणुकीतून कळतो तसा संस्थेचाही कळतो. पुण्याच्या गरवारे बालभवनची शोभा संचालक असल्यामुळे तिच्या भावनांकाचा परिणाम संस्थेतल्या सगळ्यांवर होतो आणि सर्वसाधारणपणे सगळे तसे वागायला लागले की, तो संस्थेचा भावनांक होतो. सामाजिक गटाचा, राजकीय पक्षाचा, देशाचा भावनांकही लक्षात येण्याजोगा असतो.भावनांक आणि समाजकार्य यांचा संबंध मला नक्की दिसतो.

या विषयाकडे जरा निराळ्या दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे. दुसऱ्याविषयी विचार करणं यामध्ये आपण स्वत:, आपलं कुटुंब याच्या किती पलीकडे बघायचं हा निर्णयाचा भाग आहे. कोणी म्हणेल की, मी स्वत:, माझे जवळचे नातेवाईक, दूरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचा विचार करीन. दुसरा एखादा असं म्हणेल की, माझ्या आसपासच्या विभागांचा विचार मी करीन, तेवढय़ा भागाच्या जनतेच्या फायद्यासाठी काही काम करीन. कोणाची क्षमता आणि पोच सबंध शहराचा विचार करण्याएवढी असेल. काहींच्या डोळ्यांसमोर संपूर्ण भारताची परिस्थिती येऊ शकेल, तर काही लोक पृथ्वीचा विचार करण्याच्या टोकापर्यंत जाऊ शकतील. मूळ एकच गोष्ट आहे ज्याला इंग्लिशमध्ये ‘अल्ट्रुइस्टिक अ‍ॅटिटय़ूड्स’ म्हणतात.

एक शेवटची गोष्ट सांगतो. एखाद्याचा बुद्धय़ांक आणि भावनांक दोन्ही चांगले असूनदेखील वय, आरोग्य यांचा परिणाम त्यावर होऊ  शकतोच ना! इच्छा असते तेवढी दुसऱ्याची कदर करणं तब्येतीला परवडत नाही. प्रत्यक्ष वागणुकीत निरनिराळ्या तपशिलांकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि त्या व्यक्तीचा मुळात भावनांक वरच्या पातळीचा असला तरी नंतर दिसणारं रूप त्याच्याशी जुळत नाही हे ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगावं लागतं. शारीरिक चपळपणा आणि बुद्धीचा तल्लखपणा कमी झाला की खरा माणूस निराळ्या प्रकारचा असून बघणाऱ्याच्या नजरेला तो निराळा वाटू शकतो.

आपण सगळा भावनांचा विचार करतो आहोत ते माणसांबद्दल. जनावरांच्या विचाराचा यात समावेश नाही. मी शहरी माणूस असल्यामुळे मला मुळात जनावरांचा विचार सुचलाही नव्हता. काही लोकांशी बोलल्यावर कळलं की, खेडय़ामध्ये गोठय़ातले गाई-बैल यांना कुटुंबामधले सदस्य असल्यासारखं स्थान असतं. दुष्काळामुळे जनावरं विकावी लागली तर घरातली माणसं ढसाढसा रडतात.

एक पुरुष असल्यामुळे भावानंकाबाबतीतली कच्ची बाजू मुळात मला मान्य आहे; पण मी हा विषय शिकायचा ठरवला. त्यात अनेक गुरू भेटले. एक निर्णय लग्न करण्याचा. दुसरा टप्पा मुलं होण्याचा. तिसरी महत्त्वाची गोष्ट स्वत:चा बांधकाम व्यवस्थापनाचा व्यवसाय. त्यानंतर गेली अनेक वर्ष समुपदेशनाच्या कामामुळे मी रोज शिकतो. मला हे सगळं शिकताना छान वाटतं आणि भावनांकातील वेगवेगळ्या बाजू समजावून घेता येतात.

– अनिल भागवत

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com