भटसाहेब यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे आणि सोज्वळ. त्यांच्या नावाचा मात्र घोटाळा. पूर्ण नाव.. शुक्ल चंद्रशेखर रामचंद्र भट. त्यांचे वडील कर्नाटकातील नॉर्थ कॅनरा जिल्ह्य़ातील शिराली गावातील चित्रापूर मठात भटजीकाम करत. म्हणून वडील रामचंद्र भट. त्यांना तेव्हाचे मठाधिपती स्वामीजी यांनी ‘शुक्ल’ ही पदवी दिली म्हणून शुक्ल. मुलाचे पाळण्यातले नाव चंद्रशेखर. पण त्या नावाने त्यांना कोणीच हाक मारताना ऐकले नाही. परिचित त्यांना ‘नंदू’ या नावाने हाक मारत. मी कोंकणीत ‘नंदमाम’ म्हणत असे. कानडीत नानू म्हणजे लहान किंवा सान. त्यांना मोठे भाऊ  होते म्हणून हे नानू. त्याचा अपभ्रंश नंदू. हे सर्व टाळण्यासाठी सर्व मुले ‘शिराली’ हेच आडनाव लावतात. जे त्यांना ओळखत, ते त्यांना आदरपूर्वक ‘भटसाहेब’ म्हणून हाक मारत आणि न चुकता ‘देवमाणूस’ असा त्यांचा उल्लेख करत.

नंदू शिरालीला राहत असताना घरातल्या तान्ह्य़ा भाचरांना अंगाई म्हणून झोपवायचे काम त्याच्याकडे असायचे. एकदा मुंबईहून कृष्णभट नावाचे बुजुर्ग संगीतकार तिथे गुरुगृही आले असता त्यांनी या मुलाचा आवाज ऐकला. त्याच्यावर खूश होऊन त्यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतले. काही दिवसांनी मुंबईला परतताना त्यांनी नंदूला आपल्यासोबत नेण्याचे ठरवले. मठात वैदिक कामे करून किती मुले सांभाळणार, असा विचार करून नंदूला घरातून परवानगी मिळाली. गुरुजींकडे तालीम घ्यायची आणि त्यांना शिकवण्यात मदत करायची यात दोघांची कशीबशी गुजराण होत असे. नंदूला गवई करायचे तर त्याला एखाद्या उस्तादाची तालीम हवी, म्हणून कृष्णभटांनी आग्रेवाल्यांकडे प्रयत्न केला, पण काही जमेना.

एकदा कृष्णभटांची रातंजनकरांशी भेट झाली. कृष्णभटांनी पूर्वी त्यांना शिकवले होते. त्यानंतर श्रीकृष्ण रातंजनकर हे विष्णू नारायण भातखंडे आणि फैय्याज खां यांच्याकडे तालीम घेऊन मोठे गवई झाले होते. ते लखनौला मॅरिस कॉलेजमध्ये प्राचार्य होते. त्यांनी नंदूची परीक्षा घेतली आणि त्याला लखनौला न्यायचे कबूल केले. प्रश्न खर्चाचा होता. नंदूला एक शिष्यवृत्ती मिळाली. १९३५ च्या सुमारास दरमहा दहा रुपयांत तो लखनौला राहू शकला.

या तरुण विद्यार्थ्यांची संगीतनिष्ठा पाहून प्राचार्यानी त्याला खालच्या वर्गाना शिकवायची संधी दिली. तेव्हा उलट यानेच त्यांना एक अट घातली. अट काय, तर गुरुजींनी दर आठवडय़ाला एकदा तरी वर्गात येऊन तो नीट शिकवतो की नाही, ते तपासले पाहिजे. या हट्टापायी एका अद्वितीय शिक्षकाची जडणघडण झाली. आपल्या विद्यार्थिदशेतच भटसाहेबांनी पुढे के. जी. गिंडे, दिनकर कायकिणी यांसारखे नावाजलेले संगीतकार आणि तलत मेहमूद यांच्यासारख्या लोकप्रिय गायकांना तालीम दिली.

लखनौला तेव्हापासून रेडिओ स्टेशन होते. त्यानिमित्ताने लखनौला आलेले सगळे थोर गवय्ये कॉलेजात येत. त्यांना साथ करायची संधी या विद्यार्थ्यांना मिळे. त्यांत ओंकारनाथ ठाकूर, फैय्याज खां यांसारखेही असायचे. कुमार गंधर्व तर गिंडे यांचे बेळगावपासूनचे सोबती. ते त्यांना आपले बहिश्चर प्राण मानत. मॅरिस कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यावर उदरनिर्वाहासाठी भट यांनी काही काळ वनस्थळी येथे मास्तरकी केली. पण तिथे आपले संगीत खुरटेल या भीतीने ते मुंबईला आले. नाही तरी लग्नाचे वय झाले होते. मुंबईत ते शिकवू लागले. काही काळ खासगीरीत्या आणि मग जवळजवळ पन्नास वर्षे भारतीय संगीत शिक्षापीठ आणि नंतर स्वामी वल्लभ संगीतालय येथे त्यांनी शिक्षणाचे कार्य केले. गुरूंच्या परवानगीने शिक्षण हेच आपले ध्येय त्यांनी ठरवले. हे व्रत सांभाळायचे तर इतर प्रलोभने टाळून फक्त आपला विषय आणि आपले विद्यार्थी यांचाच विचार त्यांनी आवश्यक मानला. दिवस-रात्र आणि आठवडय़ाचे सातही दिवस आणि वयाची नव्वदी जवळ येईपर्यंत ते वल्लभ संगीतालयात ठाण मांडून असायचे. प्रस्थापित गायकही सल्ला घेण्यासाठी आणि आशीर्वाद मागण्यासाठी तिथे येत.

स्वरज्ञान आणि लय कशी शिकवावी यात त्यांचा हातखंडा होता. त्या तंत्राची तयारी भातखंडे, रातंजनकर यांनी केली होती. भट तसे शिक्षण देण्यात वाकबगार होते. शिष्याने चूक केली तर तसे आधी चुकीचे गाऊन मग त्याच्याकडून योग्य ते स्वर निघेपर्यंत ते तयारी करून घेत. ते दगडालाही सुरात आणतात, अशी त्यांची कीर्ती होती. धीर न सोडता त्यांनी २७ वर्षे मला तालीम दिली. भरपूर बिदागी देऊन थोडक्यात शिकू पाहणारे परदेशी विद्यार्थी त्यांनी नाकारले. रागज्ञान ते नोमतोम आलापीतून देत असत. त्यानंतर ख्यालगायकीतून रागाची आणि बंदिशीची उकल कशी करायची ते समजावत. वर्गात जरी त्यांच्यावर कोर्सचे बंधन असले तरी खासगी विद्यार्थी आणि त्यांच्याकडे जाणीवपूर्वक शिकायला आलेले गायक-वादक यांना ते विस्ताराने सांगत. वल्लभ संगीतालयाने त्यांना सर्वश्रेष्ठ संगीत शिक्षक म्हणून ‘संगीताचार्य’ ही पदवी दिली होती. मध्य प्रदेश शासनाचा तानसेन पुरस्कार त्यांना मिळाला, तसाच संगीत नाटक अकादमीचाही. इतरही अनेक पुरस्कार त्यांच्याकडे चालून आले. लखनौच्या भातखंडे विद्यापीठाने गुरुवंदनाची प्रथा सुरू केली तेव्हा पहिले गुरू होते- पंडित एस. सी. आर. भट!

भटसाहेब हे भातखंडे परंपरेचे पाईक. बालपणातच त्यांनी भातखंडे यांच्या क्रमिक पुस्तकांवरून काही बंदिशी शिकून घेतल्या होत्या. भातखंडे नोटेशन पद्धतीची ‘तिळा उघड’सारखी जादू त्यांनी अवगत करून घेतली होती. या जादूगिरीमुळे अनेक संगीतकार आपल्या बंदिशींचे नोटेशन भट-गिंडेंकडून करून घेत.

मैफलीचे गायक व्हायला स्वतंत्र रियाझ आवश्यक असतो अशी त्यांची धारणा होती. मन:पूर्वक शिकवायचे तर वेगळा रियाझ शक्य नाही म्हणून ते मैफलींच्या मागे फारसे लागायचे नाहीत. आपल्यातील गिंडे हे पंडित, कायकिणी हे उस्ताद आणि आपण गुरुजी हे त्यांच्या मनाने पक्के ठरवले होते. तरीही गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी गिंडेंसोबत धृपद धमार गायकी आत्मसात केली आणि अनेक मैफली गाजवल्या. एकत्र गाणारे अनेक जण प्रत्यक्षात भाऊच असतात किंवा बहिणी. या दोघांचे बंधुप्रेम विलक्षण असले तरी ते मानलेलेच होते. तरीही ते अत्यंत तन्मयतेने एकत्र गायचे.

भट-गिंडे यांच्या धृपद धमारवर भाळून मी त्यांच्याकडे शिकायला गेलो होतो. त्यांना नोमतोम आलापीबद्दल प्रेम होते. किंबहुना, राग समजावून द्यायला ते त्या आलापीचाच उपयोग करत. परंतु नंतर ते ख्यालच शिकवत. राग, बंदिश आणि भाव यांच्या प्रस्तुतीला तेच पोषक मानत. कुमार मुखर्जी भटसाहेबांच्या ८० व्या वाढदिवसासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी सांगितले की, ते कधी गाताना अडले की भटसाहेबांना विचारायचे. भटसाहेब त्यांना अनेक वाटा दाखवायचे.

त्यांच्याकडून राग बसवून घेण्यासाठी गायकांप्रमाणे वादकही यायचे. सरोदवादक झरीन दारूवाला- शर्मा, तिच्या शिष्या अपर्णा-अबोली असे कित्येक. आजची मशहूर सुफी संगीत आणि गझल गायिका पूजा चरण गायतोंडे आपल्या बालपणात त्यांच्याकडून मिळालेल्या तालमीचे अजूनही ऋण मानते. शांताप्रसाद उपासनी हा बरीच वर्षे तालीम घेतल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झाला. तो व्यवसायाने इंजिनीअर; पण त्याचे संगीताचे ज्ञान इतके परिपूर्ण झाले होते की त्याने तयार केलेले संगीताचे सॉफ्टवेअर आज जगभर वापरले जाते. माझी वयाची सत्तरी उलटली असली तरी गुरुजींच्या निधनानंतर मला पोरके वाटू लागले. माझे संगीत आता संपणारसे वाटले. आश्चर्य म्हणजे हळूहळू लक्षात आले की, त्यांनी इतके काही मला दिले होते, की मी न शिकलेले रागही गाऊ  शकलो. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारे मी इतरांना शिकवू शकलो आणि मी स्वतंत्रपणे बंदिशीदेखील करू लागलो.

भटसाहेबांच्या सत्तरीचा कार्यक्रम १९८९ मध्ये झाला. त्या दिवशी फक्त त्यांच्या शिष्यमंडळींची गाणी झाली. त्यांत नवोदित दीप्ती उपासनीपासून ते बुजुर्ग गिंडेंपर्यंत दहा जण होते. ही सारी मंडळी एकाच साच्यात गातील की काय, अशी भीती होती. पण तसे झाले नाही. प्रत्येकाने आपापली शैली दाखवली. त्यांच्या शिष्यांपैकी इंदूधर निरोडी, दिनकर कायकिणी, के. जी. गिंडे, झरीन शर्मा इत्यादिकांना राष्ट्रीय सन्मान मिळाले.

नम्रता हा त्यांचा एक विशेष. त्यांनी कधीही कोणाबद्दल अपशब्द काढले नाहीत. परंपरेचा त्यांना अभिमान होता. त्यांनी अनेक नवीन राग आणि बंदिशी जिवंत केल्या. फक्त स्वत:च्या मात्र दोनच बंदिशी लिहिल्या. त्याही आम्हाला शोधून काढाव्या लागल्या. ‘पूरिया’तील सरस्वती-वंदनेत त्यांनी वर मागितला तो आपल्या गुरुजनांसाठी. कौसी कानडात विलंबित बंदिश लिहिली, त्यात सुजान रातंजनकर आणि चतुर भातखंडे या गुरुजनांची माफी मागितली.. मन:पूत तालीम आणि रियाझ केला नाही म्हणून.

येत्या १२ मार्चला त्यांच्या वयाला ९९ वर्षे पुरी झाली असती. ते हयात असते तर अजून शिकवत बसले असते. त्यांची आठवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभर निरनिराळ्या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम योजले आहेत. त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षांची सुरुवात मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने होत आहे.

ramdasbhatkal@gmail.com