स्वप्निल घंगाळे

सध्या सगळीकडे चर्चा आहे पबजी या गेमची. अर्थात या गेमचे अनेक मुलांना जणू व्यसन लागल्यासारखे तो खेळताना दिसतात. मात्र या पबजीमुळे पुन्हा एकदा वेडय़ासारखी गेम खेळणारी ही मुले नवनवीन धोक्यांना आमंत्रण देताना दिसत आहेत. या गेमचे व्यसन लागते कसे, त्याचे परिणाम काय, यावर टाकलेली नजर..

‘हो रे हो.. जेवणानंतर भेटूयात रात्री साडेदहाला..’ असं म्हणत त्याने फोन ठेवला आणि तो मात्र त्या दिवशी घरातून बाहेर गेलाच नाही. उलट रात्री दोन वाजेपर्यंत कॉलेजचे प्रोजेक्ट करत बसलेला आईला दिसला. असं रात्री भेटू.. बोलून मागील अनेक दिवसांपासून तो कुठेच जात नाही हे पाहिल्यावर आईनेच विचारले, त्याला हा काय प्रकार आहे? त्या वेळेस आईची ओळख ‘पबजी’ या शब्दाशी झाली. ‘अगं आई, आम्ही भेटतो म्हणजे या गेममध्ये एकाच वेळी ऑनलाइन येतो.’ ‘आणि रात्री दोन-दोन वाजेपर्यंत गेमच खेळता,’ त्याचे वाक्य मध्येच तोडत आईने त्याला ऐकवले. ‘आई, तू जा रूमबाहेर. तुला काही समजावण्यात अर्थ नाही. यातली मज्जा तुला नाही कळणार,’ असं म्हणत तोच रूमबाहेर गेला.

सध्या थोडय़ाफार फरकाने असं वातावरण अनेक घरांमध्ये दिसतं आहे आणि यामागील कारण आहे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर सध्या ‘इन ट्रेण्ड’ असलेला ‘पबजी’ हा व्हिडीओ गेम. अर्थात ८० टक्क्य़ांहून अधिक अ‍ॅक्शन गेम्सप्रमाणे हा गेमही हिंसक असा म्हणजेच मारामारी आणि शस्त्रं घेऊन व्हर्च्युअल (आभासी) जगामध्ये वावरण्यासंदर्भातच आहे. हा गेम रीलीज होऊन पाच-सहा महिने लोटले आहेत. मात्र भारतामध्ये हा गेम मागील महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक जण सध्या त्यांच्या मोबाइलवर रात्री जागरण करून हा गेम खेळताना दिसत आहेत आणि नेहमीप्रमाणे अनेक पालकांना या गेमबद्दल पुरेशी माहितीही नाही.

हिंसेबरोबरच हा धोका मोठा..

या गेममध्ये हिंसकपणा आहे यात आता काही नवल नाही. कारण अनेक व्हिडीओ गेम्समध्ये हिंसा असतेच. मात्र पबजीमुळे एक नवीनच समस्या उभी राहिली असल्याचे ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेच्या समुपदेशक असणाऱ्या सोनाली पाटणकर सांगतात. या गेममुळे अनेक मुले अनोळखी लोकांशी संवाद साधतात आणि त्यामधूनच पुढे अशाच अनोळखी लोकांकडून धमकावणे आणि माहिती चोरण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. अनेकदा मुलांना अशा अनोळखी व्यक्तींकडून धमकावले जाते. काही प्रकरणांमध्ये तर घरी गेम खेळण्यासाठी बोलवलेली व्यक्ती भलतीच कोणी तरी असल्याचे प्रकारही घडले आहेत. या गेममध्ये लाइव्ह चॅट या पर्यायामुळे मुलं अनोळखी लोकांशी संवाद साधतात हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे हा गेम खेळणाऱ्यांनी आपण कोणाशी संवाद साधतोय, आपली माहिती कोणाला देतोय याबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.

शाळकरी मुलांना अनोळखी व्यक्तींनी धमकावल्याचे, त्यांची खासगी माहिती चोरल्याचे प्रकार या गेमच्या माध्यमातून घडले आहे. पालकांनी आपला मुलगा काय करतो याबद्दल सतर्क राहणे आणि सुजाण मुलांनी माहिती देताना किंवा गेम खेळताना सतर्क राहणे हे दोनच उपाय सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत असल्याचे सोनाली यांनी सांगितले. या गेमबद्दल तीन महत्त्वाच्या गोष्टींची काळजी करण्याची गरज असल्याचे सोनाली सांगतात. पहिले एकलकोंडेपणा, या गेममुळे मुलांनी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रमाण कमी झाले असून ती एकलकोंडी झाली आहेत.

अनेक मुले आपल्या पालकांशीही संवाद साधत नसल्याचे दिसते. दुसरी गोष्ट अपुरी झोप. सर्वच वयोगटांतील मुले रात्री दोन दोन वाजेपर्यंत किंवा त्याहून अधिक उशिरापर्यंत हा गेम खेळत असल्याने झोप कमी होते. त्याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवसाच्या दिनक्रमावर तर होतोच, शिवाय त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांनाही आमंत्रणच मिळते आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनोळखी लोकांबरोबर शेअर केली जाणारी माहिती आणि धमकावण्याचे वाढते प्रकार.

सध्या चौथी-पाचवीत शिकणारी मुलंही पबजीसारखे गेम खेळताना दिसत असल्याचे सोनाली पाटणकर यांनी सांगितले. मुलांना करू नका, असे सांगितल्यास ते ती गोष्ट करायला जातातच. म्हणूनच आम्ही मुलांशी या गेमसंदर्भात बोलताना तुम्ही हा गेम नाही खेळलात तर काय होईल याबद्दल बोलतो. सगळे करतात म्हणून तुम्ही करण्याची गरज नाही, असं आम्ही त्यांना संवादाच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा गेम न खेळणाऱ्या मुलांना ग्रुपमध्ये न घेण्यासारखे प्रकार घडतात. यामुळे पीअर प्रेशर वाढते म्हणजेच समवयस्कर मुलांकडून डावलले जात असल्याने येणारा मानसिक ताण. अशा वेळेस तुम्ही त्या मुलांकडून चॅलेंज स्वीकारण्याऐवजी त्यांचे चॅलेंज नाकारून त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम असल्याचे दाखवून द्यावे, असं आम्ही मुलांना सांगत असल्याचे त्या म्हणाल्या. याचा सध्या सकारात्मक परिणाम दिसून येत असून अनेक मुलांकडून याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

गेम व्हायरल होण्याची पहिलीच वेळ नाही..

अशा प्रकारे एखादा गेम व्हायरल होऊ न केवळ त्याची अन् त्याचीच चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील दोन-तीन वर्षांच्या कालावधीमध्ये असे अनेकदा झाले आहे. यात मुख्यपणे सांगायचे तर सर्वात आधी अँग्री बर्ड्स प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर ‘कॅण्डीक्रश’ खेळून खेळून लोकांचे अंगठे दुखायला लागले इतका तो लोकप्रिय झाला. त्यानंतर आलेल्या ‘सबवे सर्फर’नेही लोकांना खूप पळवले. मग पहिल्यांदाच ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटी बेस असणारा ‘पोकीमॉन गो’ हा गेम आला. या गेमने तर खरं आणि व्हर्च्युअल जग एकत्र करत अनेकांना वेड लावलं. म्हणजे गेम्समुळे मुलांवर मानसिक परिणाम होतो हे सर्वाना ठाऊ क आहे. मात्र ‘पोकीमॉन गो’ या भटकत खेळायच्या गेममुळे अनेक मुलांना धडपडल्याने शारीरिक इजा झाल्याचीही खूप सारी उदाहरणे आहेत. लोकल ट्रेनमध्ये खेळला जाणारा लूडो हा गेम आता तरुणाईत लोकप्रिय नसला तरीही तो सध्याच्या ट्रेण्डिंग गेम्सपैकी एक आहे. याशिवाय ब्लू व्हेल आणि मोमोसारख्या जीवघेण्या गेम्सने अनेकांचे प्राण घेतले आहेच हेही सर्वाना माहिती झालं आहे. आजही यापैकी बरेच गेम्स खेळले जात असून त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांचा प्रश्न दिवसोंदिवस मोठा होतो आहे.

स्मार्टफोन आजारांचे माहेरघर

बोटे आणि कोपराचे आजार : टचस्क्रीनवरील सतत स्क्रोल केल्याने, टेक्स्टिंग आणि गेम्स खेळण्याने स्नायू सुजणे तसेच बोटांची हाडे दुखल्याने स्मार्टफोन थम्ब यांसारखे आजार होतात. कोपरांची स्थिती एकाच प्रकारची असल्याने सेलफोन इल्बोसारखे आजार होतात. याशिवाय करंगळी, अंगठा आणि रिंग फिंगरला मुंग्या येण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत.

पाठ आणि मानेचा त्रास: सतत मोबाइलमध्ये डोके खुपसून बसल्याने पाठीच्या कण्याला आणि मानेच्या हाडांना कायमची इजा होऊ  शकते. ब्रिटनमध्ये ८४ टक्के स्मार्टफोन युजर्सना पाठ आणि मानेच्या दुखीचा त्रास आहे.

दृष्टीचा त्रास: अनेकदा आपण स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे पाहताना डोळ्यांच्या पापण्याच मिटत नाही. त्यामुळेच डोळ्यांवर ताण येणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अंधूक दिसणे तसेच अनेकदा डोके दुखण्यापर्यंतचा त्रास अति स्मार्टफोन वापरामुळे होतो.

नोमोफोबिया: फोन नजरेआड गेल्यास अस्वस्थ वाटणे किंवा मोबाइलशिवाय राहण्याची भीती वाटणे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार मोठय़ा प्रमाणात दिसून येतो.

व्हायब्रेशन सिन्ड्रोम: फोन व्हायब्रेट झाल्यासारखे किंवा ब्लिंक झाल्यासारखे वाटत राहणे.

काय आहे या गेममध्ये?

पबजी (PUBG) हा शब्द ‘पब्लिक अननोन बॅटल फिल्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे. अर्थात गेमच्या नावावरूनच अनोळखी लोकांशी मारामारी करणे हा या गेमचा मूळ उद्देश असतो हे समजते. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीममध्ये एकटय़ाने किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो. एका बॅटलफिल्टमध्ये १०० अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके ४७, मशीनगन्स, तलवारीच्या साहाय्याने समोरच्या गेमरला ठार मारले जाते. फेसबुक लॉगइनच्या मदतीने गेम खेळल्यास आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो. म्हणूनच अनेक जण वेळ ठरवून भेटतात ते या गेमच्या प्लॅटफॉर्मवर. या गेमचे वैशिष्टय़ म्हणजे हा गेम खेळताना आपल्या पार्टनरशी लाइव्ह चॅटिंगही करता येतं. म्हणजे आधी एका सायबर कॅ फेमध्ये जमून आरडाओरड करत काऊ ण्टर स्ट्राइक खेळला जायचा तसंच फक्त आता या गेममुळे कुठूनही एकाच वेळेस ऑनलाइन बसून प्लॅनिंग करून हाणामारी करत हा गेम जिंकता येतो इतकाच काय तो वेगळेपणा; पण याच लाइव्ह चॅटिंगमुळे हा गेम इतका लोकप्रिय झाला आहे. आता यात हिंसा असल्याने हा गेम केवळ अठरा वर्षांवरील मुलांसाठीच आहे. मात्र आता स्मार्टफोन वापरणारी सर्वच वयोगटांतील मुले हा गेम स्वत:च्या किंवा आईबाबांच्या मोबाइलवरून खेळताना दिसतात. या गेममुळे मुलांमधील हिंसक वृत्ती वाढण्याची शक्यता असून त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ  शकतो, असं मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.