केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा काल(दि.३१) जाहीर झाल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास तारखांची घोषणा केली. पोखरियाल यांनी पत्रकार परिषदेला सुरूवात करताच लगेचच सीबीएसईची मुख्य वेबसाइट क्रॅश झाली. नव्या तारखांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात युजर्सनी सीबीएसईच्या मुख्य वेबासाइटवर लॉग-इन केल्याने वेबसाइट क्रॅश झाल्याचं समजतंय. दरम्यान, सध्या वेबसाइट पूर्ववत सुरू झाली आहे. पण युजर्सनी मात्र सीबीएसईची वेबसाइट क्रॅश झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘यात नवीन काहीच नाहीये.. निकालाच्या दिवशी आणि परीक्षेच्या घोषणेच्या दिवशी वेबसाइट क्रॅश होण्याचे प्रकार नेहमीच होत असतात’, अशा आशयाच्या पोस्ट अनेकांनी सोशल मीडियावर केल्या आणि आपली नाराजी व्यक्त केली.


दरम्यान, दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालणार आहेत. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. परीक्षांनंतर निकालही लगेच जाहीर करण्यात येणार असून १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जाहीर करण्यात आल्याचे, रमेश पोखरियाल यांनी सांगितले. दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र, यंदा जानेवारी उजाडेपर्यंत वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ होते. अखेर सीबीएसईच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष लांबणार..
जुलैमध्ये निकाल जाहीर झाल्यावर पुढील वर्षीच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. दरवर्षी मे अखेरीपर्यंत निकाल आणि जूनपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचे पुढील शैक्षणिक वर्षही लांबणार आहे.

प्रवेश परीक्षाही एकाच वेळी..
जेईई यंदा चार वेळा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते मे या कालावधीत चार संधी देण्यात येतील. मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा आणि सीबीएसईच्या परीक्षा एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात चार संधीचा लाभ घेता येणार का याबाबत साशंकता आहे.

राज्यातील परीक्षा कधी?
सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राज्य मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. सध्या राज्य मंडळाचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात परीक्षा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.