आजच्या काळात जुनी प्रतिजैविके म्हणजे अँटिबायोटिक्स निष्प्रभ ठरत आहेत, त्यामुळे नवीन प्रतिजैविके शोधण्याचे प्रयत्न सुरू असून त्यात संशोधकांना संगणक आज्ञावलीचा मोठा उपयोग होत आहे. संगणनात्मक पद्धतींनी जिवाणूच्या जिनोममधील जनुकांची ओळख पटवून मगच अँटिबायोटिक तयार केले जाते. या संयुगांचे विश्लेषण केले जाते, असे अमेरिकेतील रॉकफेलर विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले. एखाद्या जिवाणूचे कल्चर तयार न करताही प्रतिजैविके शोधणे त्यामुळे शक्य होत आहे. संशोधकांच्या मते मानवी शरीरात असणाऱ्या जिवाणूंचे डेटाबेस तयार आहेत. त्यांचा वापर यात करण्यात आला. विशिष्ट संगणकीय आज्ञावलीच्या मदतीने जिवाणूंच्या पुंजक्यांतील जिनोमचे स्कॅनिंग केले जाते त्यातून नॉन रायबोसोमल पेप्टाइड तयार केले जातात व त्याच्या आधारे अँटिबायोटिक्सची निर्मिती केली जाते. आज्ञावलीच्या मदतीने जनुकपुंजके जे रेणू तयार करतात त्यांची रचनाही समजते. त्यात ५७ टक्के उपयोगी रचना सापडल्या, त्यातील ३० रचनांचा वापर करण्यात आला. सॉलिड फेज पेप्टाइड अ‍ॅनलिसिसच्या मदतीने २५ रासायनिक संयुगांची निर्मिती करण्यात आली. या संयुगांची चाचणी मानवातील जिवाणूत घेतली असता ती यशस्वी ठरली. त्यात ह्य़ूमिमायसिन ए व ह्य़ूमिमायसिन बी ही दोन प्रतिजैविके म्हणजे अँटिबायोटिक्स तयार करण्यात आली. स्टॅफिलोकॉकस व स्ट्रेप्टोकॉकस जिवाणूंवर ही प्रतिजैविके उपयोगी आहेत. बेटालॅक्टमसमध्येही हीच पद्धत वापरून नवीन प्रतिजैविके तयार केली जात आहेत.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)