आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा चुकीचा वापर करण्याची शक्यता जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी कंपनी गुगलने फेटाळली आहे. गुगलने स्पष्ट केलं आहे की, आम्ही कधीही असं कोणतंही तंत्र विकसित करणार नाही आहोत जे मनुष्याची हत्या करण्यासाठी किंवा हत्यार म्हणून उपयोगाला येईल. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका ब्लॉगमधून हे स्पष्ट केलं आहे.

सुंदर पिचाई यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कंपनी हत्यार किंवा अन्य कोणत्या तंत्रासाठी ना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स डिझाईन करणार आहे, ना असं कोणतं काम करणार आहे ज्यामुळे लोक जखमी होतील. याशिवाय त्यांनी लिहिलं आहे की, आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारं कोणतंही तंत्र विकसित केलं जाणार नाहीये.

सुदंर पिचाई यांनी लिहिलं आहे की, ‘आम्ही स्पष्ट करु इच्छितो की हत्यारांच्या वापरासाठी आम्ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विकसित करत नाही आहोत. पण आम्ही दुसऱ्या क्षेत्रांमध्ये सरकार आणि लष्कराला मदत करत राहू’. गुगल अमेरिकेसाठी अशा एका प्रोजेक्टवर काम करत आहे, ज्यामध्ये ड्रोन हल्ल्यांना एकदम अचूक करता येईल अशी चर्चा आहे. मात्र होणारा विरोध पाहता सध्या ते माघार घेण्याचा प्रयत्न करत आहेत.