मुलाखतीला जाताना मनात चलबीचल होणं स्वाभाविक आहे. हे फक्त तुमच्याच बाबतीत होतं असं नाही. पण याच तणावात जर तुम्ही मुलाखतीला गेलात तर तो तणाव तुमच्या चेहऱ्यावरही दिसेल. मुलाखतीची १० ते १५ मिनिटं तुमची गुणवत्ता ठरवू शकत नसली तरी मुलाखतीला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर मुलाखतीचं कधी टेन्शनच येणार नाही…
अभिवादन करा
मुलाखतीच्या खोलीत गेल्यावर सगळ्यात आधी कोणती गोष्ट कराल तर ती म्हणजे सगळ्यांना प्रसन्न चेहऱ्याने नमस्कार अथवा हस्तांदोलन करुन अभिवादन करा. तुम्ही इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकत नसाल तर मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्याबद्दल मुलाखतकाराला सांगा. तुम्ही तुमची भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात हेही सांगा. प्रामाणिकपणापेक्षा मोठं असं काहीच नसतं हे नेहमी लक्षात ठेवा.
तुम्हाला आमच्या बरोबर का काम करायचं आहे?
ज्या कंपनीत मुलाखती जात आहात, तिथे काम करणं तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ते पटवून द्या. त्या कंपनीच्या चांगल्या गोष्टी सांगा. चांगल्या कंपन्यांपैकी ती एक आहे, हे सांगणं विसरु नका.
तुम्हाला ही नोकरी का मिळावी?
कंपनी किंवा संस्थेची तत्व आणि तुमची व्यावसायिक तत्व यात साम्य दाखवून द्या. तुम्ही ज्या पदासाठी जात आहात ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे सांभाळू शकता हे आत्मविश्वासाने पटवून द्या. स्वतःबाबातदेखील तोन आत्मविश्वासात बाळगा.
तुमच्यातली सगळ्यात मोठी नकारात्मक गोष्ट कोणती?
याचं उत्तर नीट विचार करून प्रामाणिक उत्तर द्या. पण, नेमकी काय उत्तर द्यायचं असा प्रश्न नेहमी पडतो. अशावेळी तुमच्या व्यक्तिमत्वाचा थोडा परिचय होईल असे उत्तर द्या. कामाच्यावेळी चिडचिड होते, राग पटकन येतो, मनासारखे झाले नाही तर राग येतो अशी उत्तर देणं शक्यतो टाळाच.
तुम्हाला किती पगाराची अपेक्षा आहे?
यावेळी आधीच्या कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगाराचा आकडा तुम्ही सांगू शकता. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जायचं असतं, मी ही आधीपेक्षा चांगलंच मिळेल अशी अपेक्षा करत आहे असं सांगू शकता. पण, जर तुमची ही पहिलीच नोकरी असेल तर इतर उमेद्वारांनी जो पगाराचा आकडा सांगितला असेल, किंवा त्या पदाला जो पगार साजेसा असेल असं उत्तर द्या.
पाच वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहाल?
यात फक्त स्वतःच्या फायद्याचंच बोलू नका. तुमच्यामुळे कंपनीला पुढील पाच वर्षात किती फायदा होईल आणि त्यातून कंपनीची प्रगतीही होईल याबद्दलही बोला.
तुमच्याकडे नवनवीन संकल्पना आहेत, पण तुमच्या सहकाऱ्यांना ते आवडत नसेल तर तुम्ही काय कराल?
कोणतंही काम टीमशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुमची संकल्पना त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा पण त्यात कोणतीही जबरदस्ती नको. जर सहकाऱ्यांना तुमची संकल्पना पटत नसेल तर तुम्हाला ती कल्पना सोडून टीमबरोबर जावं लागेल.
शेवटी…
मुलाखत संपल्यानंतर मुलाखत घेणाऱ्यांचे आभार मानायला विसरु नका. जर त्यांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिली तर तुम्ही त्यांच्याकडे प्रतिक्रिया मागू शकता. त्यांच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला खूप शिकता येईल, असंही तुम्ही सांगू शकता.