वनप्लस कंपनी आज(दि.2) आपली नवीन टीव्ही सीरिज OnePlus TV 2020 लाँच करणार आहे. कंपनीने यापूर्वी लाँच केलेल्या टीव्हीपेक्षा नव्या सीरिजमधील टीव्ही स्वस्त असणार आहेत. लाँच होण्याआधीच अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर एक हजार रुपयांमध्ये या टीव्हीसाठी प्री-बुकिंगलाही सुरूवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने जारी केलेल्या एका टीझरद्वारे नवीन टीव्हीमध्ये 4K रिझोल्युशनसह डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञान असेल हे स्पष्ट झालं होतं. कंपनी ‘वनप्लस टीव्ही 2020’ आज संध्याकाळी सात वाजता एका लाँच इव्हेंटमध्ये लाँच करेल. वनप्लस इंडियाच्या युट्यूब आणि अधिकृत ट्विटर पेजवर इव्हेंटची लाइव्ह स्ट्रीमिंग केली जाईल. वनप्लस टीव्ही 2020 लाइनअपमध्ये 32 इंच एचडी, 43 इंच फुल एचडी आणि 55 इंच 4K मॉडेल असे तीन टीव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. टीव्हीमध्ये आधीपासूनच काही प्री-लोडेड व्हिडिओ अॅप्सही असतील. या टीव्हीला एकाचवेळी पाच डिव्हाइस कनेक्ट करता येतील.


किंमत किती :-
टीव्हीची किंमत किती असेल याची नेमकी माहिती लाँचिंग इव्हेंटमध्येच मिळेल. पण, काही दिवसांपूर्वी कंपनीने किंमतीबाबत थोडी माहिती दिली होती. नवीन वनप्लस टीव्हीच्या बेसिक मॉडेलची किंमत कंपनीने 1x,999 आणि सर्वात महागड्या टीव्हीची किंमत 4x,999 असेल असे सांगितले होते. आता यात x च्या जागी कोणता आकडा असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.