हेडफोन लावून रस्त्यावरुन किंवा रेल्वे ट्रॅकवरुन चालताना अपघात झाल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याच्या बातम्या अनेकदा वाचनामध्ये येतात. त्यामुळेच रस्त्याने चालताना हेडफोन न वापरणे शहापणाचे ठरते. मात्र अशाप्रकारे जीवावर धोका पत्कारुन अनेकदा हेडफोन लावून रस्त्याने चालणाऱ्यांची संख्या कमी नाही. काही देशांमध्ये तर सतत मोबाईलमध्ये डोकं घालून, हेडफोन लावून चालणाऱ्यांसाठी वेगळे पथमार्ग बनवण्यात आले आहेत. मात्र अशाप्रकारे पूर्णपणे वेगळे मार्ग तयार करण्याऐवजी हेडफोननेच धोक्याची सुचना दिली तर?

तुम्हाला हा प्रश्न आणि असे हेडफोन एखाद्या हॉलिवूड चित्रपटामधील हायफाय यंत्राची आठवण करुन देतील. मात्र खरोखरच अशाप्रकारे युझर्सला धोक्याची सुचना देणाऱ्या हेडफोनचा प्रोटोटाइप म्हणजेच प्राथमिक मॉडेल तयार करण्यात आला आहे. कोलंबियामधील डेटा सायन्स इन्स्टीट्यूटने हे प्रोटोटाइप मॉडेल तयार केलं आहे. गाणी ऐकताना एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका असल्यास त्याबद्दल त्या व्यक्तीला सतर्क करणाऱ्या हेडफोनमध्ये अगदी सुक्ष्म आकाराच्या मायक्रोफोनचा वापर करण्यात आला आहे. हे मायक्रोफोन हेडफोन वापरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या ट्रॅफिकचा आवाज रेकॉर्ड करुन इंटेलिजंट सिग्नल यंत्रणेद्वारे याबद्दलची माहिती थेट हेडफोनच्या माध्यमातून युझरला देण्यात येईल.

या हेडफोनमधील बिल्डइन सिस्टीम रहदारीच्या ठिकाणी अनेक सुक्ष्म आवाज सहज रेकॉर्ड करु शकते. मशीन लर्निंगच्या माध्यमातून हे हेडफोन गाड्यांचे आवाज रेकॉर्ड करते. मशीन लर्निंगचे मॉड्युअल युझरच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागते. हे तंत्रज्ञान सोपे वाटत असले तरी अशापद्धतीचे हेडफोन तयार करणे गुंतागुंतीचे काम आहे. यामध्ये लहान माईक, छोट्या आकाराच्या डेटा पाईपलाइन्स कनेक्शन अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. या हेडफोनमध्ये अल्ट्रा लो पॉवर आणि खास पद्धतीने तयार केलेले इलेक्ट्रीक सर्किट असतील. या हेडफोनमध्ये केवळ आजूबाजूचा कर्कश गोंगाट रेकॉर्ड होऊ नयेसाठी ही यंत्रणा आवश्यक असते.

या हेडफोनची चाचणी न्यू यॉर्कमध्ये घेण्यात येत आहे. या शहरामध्ये लोकांची वर्दळ अधिक आहे. येथे अशापद्धतीने हेडफोन लावून चालणारे अनेक तरुण दिसून येतात. तसेच या हेडफोनमध्ये गरजेप्रमाणे आवाज रेकॉर्ड होतात का हे तपासून पाहण्यासाठी आवश्यक असणारे लोकांची गर्दी, गाड्या आणि वाहतूककोंडी असे अनेक घटक न्यू यॉर्कमध्ये आहेत. याच सर्व कारणांमुळे संशोधकांनी या हेडफोनची चाचणी न्यू यॉर्कमध्ये घेतली जात आहे.

कोलंबियामधील इलेक्ट्रीक इंजिनियरिंगवर अभ्यास करणाऱ्या डेटा सायन्स इन्स्टीट्यूटमधील सदस्य आणि सहाय्यक प्राध्यापक असणाऱ्या प्रेड जीआंग यांनी या हेडफोनबद्दल अधिक माहिती दिली आहे. “आम्ही स्वस्तामध्ये कमीत कमी तांत्रिक गुंतागुंत असणारे आणि चलताना हेडफोन वापरण्याऱ्या युझर्सला त्यांच्या आजूबाजू्च्या परिस्थितीचा आंदाज घेऊन इशाराने तंत्रज्ञान विकसित करत आहोत. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरल्यास वेगवेगळ्या शहरांमध्ये पदचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी करता येईल,” अशी अपेक्षा प्रेड यांनी व्यक्त केली आहे. मात्र हे हेडफोन कधी बाजारामध्ये येणार याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हे हेडफोन बाजारात येईपर्यंत आपली आपणच काळजी घेतलेली बरी.