हे बैठक स्थितील एक आसन आहे. हे आसन करताना प्रथम दंडस्थिती घ्यावी. मग सावकाश गुडघ्यातून वाकत बसल्यासारखी स्थिती घ्यावी. यावेळी श्वास सोडत खाली जावे. बैठक स्थितीत गुडघे दुमडून बसावे. आपण शौचाला जसे बसतो त्या पद्धतीने बसावे. त्यावेळी गुडघ्यांवर ताण येतो. ज्यांना असा ताण सहन होत नाही त्यांनी ही पूर्वस्थिती लगेच सोडावी म्हणजेच श्वास घेत घेत वर दंडस्थितीत यावे. काही दिवस पूर्वस्थितीचा सराव करावा. एकदा गुडघे दुमडून खाली टाचांवर बसता येऊ लागले की आसनातील पुढच्या स्थितीचा अभ्यास करता येतो. या आसनाचे नाव आहे उत्कटासन.

आता टाचा जमिनीवरून वर उचलाव्यात. फक्त पावलांवरती बसावे. नितंब दोन्ही पायांच्या हाडांजवळ सावधपणे शरीर स्थिर करून ठेवावे. दोन्ही हातांचे पंजे एकमेकात गुंफावे आणि गुडघ्यावरती सहजपणे ठेवावेत. दृष्टी समोर ठेवावी. हे एक तोलात्मक आसन आहे. हे करताना आपण पंजावर उभे राहून पायाच्या टाचा जमिनीपासून वेगळ्या ठेवत असल्यामुळे तोल जाण्याची शक्यता असते. या आसनस्थितीत डाव्या पायाची अर्धी मांडी उजव्या पायावर घालता येते. डावा पाय गुडघ्यात दुमडून उचलून डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावी. एकदा डाव्या पायाची व एकदा उजव्या पायाची असे अनुक्रमे करता येते. मात्र हे करत असताना योगशिक्षकाचे मार्गदर्शन हवे कारण तोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आसन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

या आसनामुळे गॅसेसचा त्रास कमी होतो. हात-पाय मजबूत होतात. शौचास साफ होते. शरीरात स्फूर्ती येते. जर काही योनीरोग असतील तर ते दूर होतात. पुरूषांची वीर्य शक्ती वाढते. वीर्यवाहिन्या शक्तीशाली बनतात. पोटाचे विकार दूर होतात. हे आसन साधारण एक मिनिटापर्यंत टिकवता येते. नियमित सरावाने ते जमू शकते. सुरूवातीला १५ ते ३० सेकंद टिकते. नंतर मात्र एक ते दिड मिनिटे टिकू शकते. मुख्यत्वे पुरूषांनी हे आसन नियमित करावे. नियमित केल्यामुळे शुक्राणूंची वाढ होते तर स्त्रियांमध्येही बिजांडांची वाढ होण्यास मदत होते. वारंवार गॅस होत असतील तर या आसनामुळे गॅसेसचे प्रमाण कमी होते. शरीरातील उत्सर्जन संस्था वेगाने व योग्य पद्धतीने कार्य करते.

सुजाता गानू-टिकेकर

योगतज्ज्ञ