स्मार्टफोन क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केल्यानंतर चिनी कंपनी शाओमीने आता LED स्मार्ट बल्ब लाँच केला आहे. हा LED स्मार्ट बल्ब Mi स्टोअरमधून ऑर्डर करता येईल. दिल्लीमध्ये कंपनीने Redmi Y3 आणि Redmi 7 हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्याचवेळी कंपनीने बल्ब देखील लाँच केला. तब्बल 11 वर्षांपर्यंत हा बल्ब खराब होणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.


या स्मार्ट बल्बमध्ये Google Assistant आणि Amazon Alexa इनबिल्ट आहे. हा बल्ब सुरू किंवा बंद करण्यासाठी तुम्ही व्हॉइस कमांड देऊ शकतात किंवा अॅपद्वारेही कंट्रोल करु शकतात. हा स्मार्ट बल्ब इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) डिव्हाइसच्या आधारावर लाँच करण्यात आला आहे. या बल्बचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे  हा 1.6 कोटी रंगांना सपोर्ट करतो आणि हवा तो रंग  अॅपद्वारे बदलता येतो. तसेच तुम्ही या बल्बचा उजेड (ब्राइटनेस) किंवा तापमान देखील अॅपद्वारे कंट्रोल करु शकतात. भारतात यावर्षी अखेरपर्यंत 10 हजार Mi स्टोअर सुरू करण्याचा विचार असल्याचं शाओमीकडून सांगण्यात आलं आहे.

पहिल्या 4000 युनिट्ससाठी या स्मार्ट बल्बची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली  असल्याचं समजतंय , तर 4 हजार युनिट्सच्या विक्रीनंतर स्मार्ट बल्बची किंमत वाढून 1 हजार 299 रुपयांना मिळेल. 20 मे पासून हा बल्ब ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल अशी माहिती आहे. 10W क्षमतेचा हा बल्ब सहजतेने Wi-Fi शी देखील कनेक्ट होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे.