सर्वसामान्य मुंबईकरांना अखेर लोकल प्रवासाची परवानगी मिळाली आहे. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आता लोकलने प्रवास करता येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून हा निर्णय लागू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (८ ऑगस्ट) याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर, करोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करत आपण हा प्रवास सुखकर कसा होईल यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरीही प्रवाशांनी आपली काळजी घेणं महत्वाचंच असेल. कारण, करोनाचा धोका अद्याप पूर्ण टळलेला नाही. त्यात मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे ‘गर्दी’ आलीच. त्यामुळे, या संपूर्ण लोकल प्रवासादरम्यान कोणकोणती काळजी घ्याल? जाणून घ्या

लोकल प्रवासादरम्यान ‘ही’ काळजी घ्या

  • फिझिकल डिस्टन्सिंग आणि पूर्णवेळ मास्क वापरणं सर्वात महत्त्वाचं आहे.
  • रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये कमी गर्दीच्या ठिकाणी उभे रहा.
  • ट्रेनमध्ये चढताना शक्यतो रांगेत चढा, गर्दी किंवा धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घ्या
  • ट्रेनमध्ये चढताना हॅन्डल किंवा डोअरला स्पर्श होतोच. त्यामुळे त्यानंतर काळजीपूर्वक हात सॅनिटायझर करा.
  • सिटवर बसण्यापूर्वी तिथे सॅनिटायझर स्प्रे करा.
  • एकमेकांमध्ये शक्य तितकं शारीरिक अंतर ठेवा.
  • चेहऱ्याला, नाक- तोंडाला सतत हात लावणं टाळा.
  • ट्रेनमध्ये शक्यतो कुठेही टेकून उभं राहणं टाळा.
  • मास्क नाकावरून खाली सरकवणं टाळा आणि बॅगमध्ये एक्सट्रा मास्क ठेवणं उत्तम.
  • प्रवासात शक्यतो डिस्पोजेबल मास्क वापरणं चांगलं.
  • प्रवासात काही वस्तूंशी आपला सतत संपर्क येत असतो. उदा. मोबाईल, हेडफोन्स, पर्स, बॅग, छत्री. त्यामुळे या वस्तू सॅनिटाईझ करा.
  • घरी गेल्यावर या सर्व वस्तू, बॅग, पर्स स्वच्छ करा.
  • मोबाईल शक्यतो झिप लॉक पिशवीत ठेवा. म्हणजे तो स्वच्छ करायला बरा पडेल. कारण मोबाईलला थेट सॅनिटायझर लावणं घातक ठरतं.
  • आपली छत्री किंवा झिपर, बॅग किंवा इतर कोणतीही वस्तू इतरत्र ठेवणं टाळा. घरी गेल्यावर या सर्व वस्तू स्वच्छ करा.
  • खिडकी, हॅन्डल्स, डोअर, सीट किंवा अन्य कोणत्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर लगेच सॅनिटाझर लावा.
  • प्रवासात सतत चेहरा पुसत राहणं शक्य नाही. त्यामुळे मास्कबरोबरच फेशशिल्डही वापरा.
  • फेसशिल्डमुळे विषाणू हवेमधून थेट तुमच्या चेहऱ्यावर येणार नाहीत.
  • तुमच्या सहप्रवाशाला अस्वस्थ वाटत असल्याचं तुमच्या लक्षात आल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळवून द्या.
  • दररोज घरी आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा, कपडे किंवा तसेच चप्पल देखील लगेच धुवून टाका. (शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा)

आपण प्रवास करणार आहोत. त्यामुळे आपण योग्य काळजी घेतली नाही तर आपल्या कुटुंबापर्यंत त्याची झळ पोहोचू शकते. आपण विषाणूचे वाहक ठरू शकतो, हे तुम्हाला माहित आहेच. त्यामुळे, विशेष काळजी घ्या. त्याचसोबत आपल्या या संपूर्ण प्रवासादरम्यान आपण आणखी काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे आपली लढाई करोनाशी आहे, एकमेकांशी नाही. तसेच आपल्याला शारीरिक अंतर राखायचं आहे, सामाजिक नाही. त्यामुळे, स्वतःची काळजी घेण्यासोबतच आपल्या सहप्रवाशांनाही योग्य ते सहकार्य करावं.