Benefits of walking 10k steps daily for 21 days: चालणे हा अतिशय सोपा; पण आरोग्यासाठी फायदेशीर व्यायाम आहे. अनेक आरोग्य अहवालांत असे दिसून आले आहे की, केवळ चालण्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि त्यामुळे तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे झालेलेदेखील दिसतात. अशा परिस्थितीत २१ दिवस रोज १० हजार पावले चालून शरीरात होणारे बदल वाचून तुम्हीही थक्क व्हाल. दररोज २१ दिवस रोज १० हजार पावले चालण्याचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊ…

ब्लॉगर माधुरीने हा प्रयोग केला आणि तिला तिचे वजन झपाट्याने कमी झाल्याचे जाणवले. माधुरी सांगते, “मी ७२.०५ किलो असताना रोज चालायला सुरुवात केली आणि २१ व्या दिवशी माझं वजन ७०.१० होतं. माझं वजन दोन किलो कमी झालं.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एखाद्याने किती पावले चालावीत याची निश्चित संख्या नसली तरी शारीरिक हालचालींसाठी १०,००० पावले ही एक आदर्श संख्या मानली जाते. ग्लेनिगल्स हॉस्पिटल -परळ मुंबई येथील अंतर्गत औषध क्षेत्रातील वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात की, चालण्याच्या व्यायामाला अनेकदा कमी लेखले जाते; परंतु त्याचे अनेक प्रमाणात आरोग्य फायदे आहेत.

२१ दिवस रोज १० हजार पावलं चालल्यानं शरिरावर काय परिणाम होतो?

“२१ दिवस दररोज १०,००० पावले चालल्याने वजन कमी होण्यासह आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. नियमित चालण्यामुळे चयापचय क्षमता वाढते, कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारते. त्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास आणि एकूण शरीराची रचना सुधारण्यासही मदत होते. चालण्यामुळे हृदय मजबूत होते, रक्तदाब नियंत्रित होतो आणि फुप्फुसांची क्षमता सुधारते, शिवाय वजन कमी होते”, असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंघला यांनी असेही नमूद केले की, चालणे हा कमी परिणाम करणारा व्यायाम आहे, जो कॅलरी बर्न करण्यास आणि एकूण वजन कमी करण्यास हातभार लावू शकतो. डॉ. अग्रवाल यांनी असेही नमूद केले की, चालणे पचन सुलभ करते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि मधुमेह व लठ्ठपणाची शक्यता कमी करते. चालणे तणाव कमी करून, मूड सुधारून व चांगली झोप घेऊन मानसिक आरोग्य राखण्यासही मदत करते. तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत आहेत की, दररोज १०,००० पावले याप्रमाणे सातत्य ठेवून चालल्याने लक्षणीय फरक पडू शकतो. परंतु, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, “फक्त चालणे हा जादूचा उपाय नाही. प्रभावीपणे वजन कमी करण्यासाठी आहाराद्वारे कॅलरीजचे प्रमाण कमी करणे आणि शाश्वत जीवनशैलीत बदल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे”, असे डॉ. सिंघला म्हणाले.

दररोज १०,००० पावले चालणे ही एक उत्तम सुरुवात असली तरी काही तज्ज्ञ वजन कमी करण्याच्या अधिक स्पष्ट फायद्यांसाठी १५,००० पावलांपर्यंत लक्ष्य वाढविण्याचा सल्ला देतात. “त्याव्यतिरिक्त दिनचर्येत जलद चालण्याचा समावेश केल्याने जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होऊ शकते. चालण्याला तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचा शाश्वत भाग बनविण्यासाठी दररोज ५,००० पावले चालणे आणि हळूहळू चालण्यामध्ये तुमच्या पावलांची संख्या वाढवणे यांसारखी व्यवस्थापित करण्यायोग्य ध्येये ठेवून हळूहळू सुरुवात करा”, असा सल्ला डॉ. सिंघला यांनी दिला. चालणे ही रोजची सवय बनवल्याने, जसे की जेवणाच्या सुटीत वेगाने चालणे किंवा गाडी चालविण्याऐवजी चालत जाणे अशा रीतीने चालण्यात सातत्य राखण्यास मदत मिळू शकते. त्याशिवाय तुमच्या चालण्यात टेकड्या, पायऱ्या किंवा उतारावर चालणे यांचा समावेश करा. अशा रीतीने तुमच्या चालण्याच्या दिनक्रमात वैविध्यता आणून बदल केल्याने तुम्ही वजन झटपट कमी करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी वजन कमी करण्यासाठी चालणे हे एक प्रभावी साधन ठरू शकते; परंतु कॅलरीजचे कमी प्रमाण असलेल्या आहारासोबत निरोगी जीवनशैलीसाठी व्यायामही केला पाहिजे. “वजन कमी करण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपल्या उपयुक्त अशा दिनक्रमात सातत्य ठेवणे. वजन कमी करण्यासाठी दररोज न चुकता चालणे आणि संतुलित आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी चालणे हा एक प्रभावी मार्ग आहे, असे डॉ. अग्रवाल यांनी निक्षून बजावले. डॉ. सिंघला म्हणाले की, तुमच्या जीवनशैलीत नियमित चालण्याचा समावेश करून आणि आहारासंबंधित खाद्यपदार्थ अन् पेयांची काळजीपूर्वक निवड करून, तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करू शकता आणि त्याचबरोबर चालण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदेदेखील मिळवू शकता.