बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke)च्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अटॅक अथवा लकवा, याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे; ज्यावर वेळीच उपचार केला नाही, तर मृत्यूही होऊ शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.  

एका संशोधनानुसार देशभरात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी वयाच्या ५० वर्षांनंतर ब्रेन स्ट्रोकचा धोका होता. आता वयाच्या ३५ व्या वर्षीही ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण आढळत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे, तर ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला आहे. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फाटली असता, हा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

नवीन लॅन्सेट आयोगाच्या अहवालानुसार, ब्रेन स्ट्रोकमुळे २०५० पर्यंत वर्षाला १० दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो. येत्या ३० वर्षांत ५० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे आयोगाने नोंदवले आहे. त्याहूनही वाईट म्हणजे अहवालात असे भाकीत करण्यात आले आहे की, यापैकी बहुतेक ९१ टक्के मृत्यू उत्पन्न कमी असलेल्या देशांमध्ये होऊ शकतात. तर दक्षिण आशियामध्ये २०२० मधील ०.९९ दशलक्ष वरून २०५० पर्यंत १.५६ दशलक्षापर्यंत मृतांची संख्या वाढेल, असाही अहवालाचा अंदाज आहे.

(हे ही वाचा : गोवर लसीकरण करूनही लहान मुलं आजारी का पडतायेत? समोर आला ‘हा’ घातक मेंदूचा विकार, डाॅक्टरांनी सांगितले की…)

स्ट्रोकचा धोका कोणाला जास्त?

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्ट्रोकमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ३६ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे; तर ६० वर्षांखालील लोकांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे. या वयोगटातील मधुमेह आणि लठ्ठपणाच्या वाढत्या पातळीमुळे तरुण मृत्यूमुखी पडू शकतात, असा अहवालाचा अंदाज आहे.

वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रोफेसर जयराज पांडियन यांनी २०२० मध्ये जागतिक स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये आशियाचा वाटा सर्वांत मोठा असल्याचे सांगितले आहे. भारतात ब्रेन स्ट्रोकच्या विळख्यात सर्वाधिक तरुण आणि मध्यमवयीन मुले अडकत आहेत. यासाठी उपचाराच्या सुविधांसोबतच लोकांमध्ये जागृतीही व्हायला हवी, असेही ते नमूद करतात.

ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते. दोन्ही प्रकरणांमध्ये पुरेसा ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही. याचा परिणाम असा होतो की, मेंदूची क्रिया कार्य करू शकत नाही आणि अर्धांगवायूचा धोकादेखील असतो. मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा रक्तप्रवाहात अडथळा आल्याने रक्तवाहिन्या फुटतात तेव्हा ब्रेन स्ट्रोकची समस्या होते. हा त्रास होणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर त्याचा जीव जाऊ शकतो किंवा कायमचे अपंगत्व येण्याची दाट शक्यता असते. अनेकांना स्ट्रोक येण्यापूर्वी काही दिवस अगोदर डोकेदुखी, तसेच शरीराचे काही भाग सुन्न होतात किंवा मुंग्या जाणवतात. अनेक जण हा त्रास अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे हा स्ट्रोक जीवावर बेततो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीत ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी धूम्रपान टाळणे, हिरव्या भाज्या, फळे, संतुलित आहार, निरोगी वजन, नियमित व्यायाम यांसारख्या घटकांकडे लक्ष देणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जीवनशैलीतील बदलांमुळे तुमचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.