अनेक पालकांना सकाळी उठल्या-उठल्या आधी मोबाईल पाहायची किंवा सतत दर पाच- दहा मिनिटांनी मोबाईल पाहण्याची सवय असते. जरा रेंज मिळत नसेल; तर काही पालक अवस्थ होतात. काही पालक सतत सेल्फीज् काढत इन्स्टावर अपलोड करत असतात. काही पालक तिथे मिळणाऱ्या लाइक्सना आणि कमेंट्सना पाहून खूश होत असतात. त्यांच्या या आनंदी होण्यात व्यत्यय आला; तर ते चिडतात. काही पालक ऑफिसमधनं घरी आले की, मुलांशी बोलण्याआधी फोनमध्ये डोकं घालतात. काही पालक मुलांना जेवू घालताना त्यांना टीव्ही लावून देतात आणि स्वतः व्हॉट्सॲपमध्ये किंवा सोशल मीडियात डोकं घालून बसतात…
काही पालक मुलांना झोपवताना एका हातानं थोपटतात; तर दुसऱ्या हातानं मेसेजेस चेक करत असतात. काही पालक ट्रीपला गेल्यावर प्रवासात बहुतेक सगळा वेळ स्वतःच्या स्मार्टफोनवर काहीबाही बघत असतात. काही पालक सतत कुणाशी तरी गॉसिपिंग करत असतात… तर काही पालक ऑनलाईन जगात कुणाशीतरी वाद घालून त्या व्यक्तीला आपण कसं अपमानित केलं, हे मोठ्या अभिमानाने मुलांसमोर सांगत असतात यादी अजूनही बरीच मोठी होईल… मुलं हे सारं पाहात असतात. त्यांना जे-जे आणि जितकं समजतंय; त्यानुसार ती त्या सवयी उचलत असतात.
हेही वाचा : Health Special: मानसिक आघाताची लक्षणे कोणती? तो कसा ओळखावा?
प्रत्येक मुलासाठी त्याचे आईबाबा आदर्श असतात. अशा वेळी ते जे करतात; ते आपण केलं तर त्यात काही चुकीचं नाहीये हा विचार दृढ व्हायला वेळ लागत नाही. मात्र हे सगळं होत असताना मुलांचं वय अगदीच नाजूक असतं. एक उदाहरण बघूया. व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये झालेला वाद… आई किंवा बाबा मोठ्या अभिमानाने एकमेकांना किंवा घरातल्या इतर मोठ्या सदस्यांना आपण त्या वादात कसे जिंकलो, समोरच्याचे कसे काही ऐकून घेतले नाही, उलट त्यालाच कशा चार गोष्टी सुनावल्या वगैरे सांगत असतात. हे सांगताना ते अतिशय उत्तेजित असतात. काहीवेळा त्यांची शारीर भाषा आक्रमक झालेली असते. एखाद दोन शिव्याही हासडल्या जातात. बाकीचे जे झालं तर कसं बेस्ट झालं असं म्हणत घडलेल्या प्रसंगाचं कौतुक करत असतात, टाळ्या पिटत असतात.
…मोठ्यांच्या जगात हे सगळं सुरु असताना घरातली मुलं हे पाहात असतात, ऐकत असतात. आईबाबा किंवा घरातले इतर मोठे जे वागतायेत तसं वागायला काहीच हरकत नसते असं मुलं यातून घेऊ शकतात. किंवा आपला मुद्दा बरोबर आहे चूक हे पाहण्याची गरज नाही, समोरच्याच ऐकून घ्यायचं नसतं असाही संदेश मुलं यातून घेऊ शकतात आणि त्यांच्या वर्तनात आणू शकतात. ऑनलाईन जगातल्या कुठल्यातरी ग्रुपमध्ये झालेल्या फुटकळ वादातून आपण मुलांपर्यंत आपल्याही नकळत असहिष्णुता पोहोचवत असतो याचा आपण कधी विचार करतो का?
डिजिटल पालकत्व सोपं नाहीये. आपल्या हातांतलं तंत्रज्ञान हा आपला शत्रू नाहीये, आपलं त्याच्याशी भांडण नाहीये. पण त्याचबरोबर आपल्या मुलांना आणि आपल्यालाही इंटरनेट/ सोशल मिडिया/ गेमिंग यांचं व्यसन लागू नये, त्यांचं डिजिटल वर्तन चांगलं असलं पाहिजे असं वाटत असेल; तर आपलं जगणं इंटरेस्टिंग कसं होईल हे पाहायला हवं. मुलांनी स्मार्टफोनमध्ये अडकू नये असं वाटत असेल; तर मुलांना आपल्याशी सहज कनेक्ट कसं होता येईल हे पालकांनी बघायला हवं… म्हणजेच मुलांशी बोलायला हवं आणि हा संवाद म्हणजे मुलांचं बौद्धिक घेणं नाही. तर सहज मैत्रिपूर्ण संवाद. आपले आईबाबा, आजीआजोबा मोबाईल वापरतात पण ते मोबाइलशिवायही अनेक गोष्टी करतात हे मुलांना दिसलं पाहिजे. ते पुस्तकं वाचतात, व्यायाम करतात, गाणी ऐकतात, बागकाम करतात, फिरायला जातात, मित्रमैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटतात, गप्पा मारतात हे सगळं मुलांना दिसणं आज गरजेचं आहे.
हेही वाचा : Health Special: व्हिटामिन्समधून शरीराला ऊर्जा मिळते; समज की, गैरसमज?
बहुतेक घरांमध्ये एकत्र वेळ हा अभ्यास, मॉलमध्ये फिरणं किंवा आरडाओरडा यांसाठीच असतो. उगाचच गप्पा, कुठलाही अजेंडा न ठेवता मारलेल्या गप्पा, केलेली भटकंती या गोष्टी मुलांशी कनेक्ट होण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेच्या असतात. ऑफिसमधून आल्यावर दमलोय म्हणून फोनमध्ये डोकं खुपसण्यापेक्षा मुलांशी बोला. त्यांचा दिवस कसा गेला ते विचारा. टेन्शन काही फक्त पालकांच्या आयुष्यात नाहीये, ते मुलांनाही येतं. एकमेकांशी बोलून ते कमी होतं. गेमिंग करून टेन्शन जातं हा निवळ भ्रम आहे. गेमिंगनं ते वाढतं. एकत्र जेवा. जेवताना शक्यतो मोबाईल पाहात बसू नका. आठवड्यातनं एक दिवस ‘नो स्क्रीन डे’ ठेवा किंवा कमीत कमी फोन वापरायचा असं ठरवा. त्यांच्याशी खेळायला, बोलायला, दिवस कसा गेला हे विचारायला जर आईबाबांनाच वेळ नसेल, कंटाळा येत असेल; तर मुलं नेटमध्ये शिरणार हे गृहीत धरा. मुलांना दोष देण्याआधी आपण काय करतोय हे पालकांनी बघणं गरजेचं आहे.