Do Sunscreens and Perfumes Cause Cancer : जर तुम्ही सनस्क्रीन किंवा परफ्यूम वापरत असाल, तर आता वापरण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? अनेक इन्फ्लूएन्सर्स सोशल मीडियावर बोलताना दिसतात की, या दोन्ही त्वचेवर वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये कर्करोग निर्माण करणारे पदार्थ आणि रसायने असू शकतात ज्यांना एंडोक्राइन डिसप्टर्स म्हणून ओळखले जाते, जे शरीराच्या हार्मोन्समध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित रसायन जे शरीरच्या हार्मोनल प्रक्रियेमध्ये अडथळा आणतात आणि त्यामुळे काही विशिष्ट कर्करोगांचा विशेषतः स्तन, गर्भाशय व प्रोस्टेट यांसारखे हार्मोन-संवेदनशील कर्करोगाचा धोका वाढतो. शरीराच्या नैसर्गिक हार्मोन्स प्रक्रियेमध्ये अडथळा आणून, ते पेशींच्या आणि ट्युमरच्या असामान्य वाढीला प्रोत्साहन देतात. पण हे खरंय का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
सध्याचे वैज्ञानिक पुरावे हार्मोन्समध्ये अडथळा किंवा कर्करोग यांच्यातील संबंधांना स्पष्टता देत नाही, असे दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. डी. एम. महाजन सांगतात.
सनस्क्रीन किंवा परफ्यूममुळे कर्करोग होऊ शकतो का?
सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये सनस्क्रीन आणि परफ्यूममधील घटकामुळे एंडोक्राइन डिस-ऑर्डर होत असल्याबद्दल बोलले जाते. ऑक्सिबेंझोन आणि ऑक्टिनॉक्सेट यांसारखी काही सनस्क्रीन रसायने शरीराद्वारे शोषली जातात, ज्यामुळे हार्मोन्स आणि कर्करोग यासंबंधित त्याचा परिणाम होतो का, यावर संशोधन सुरू आहे. तसेच सध्याचे वैज्ञानिक पुरावे या घटकांचा आणि हार्मोन्स डिस-ऑर्डर किंवा कर्करोग यांच्यातील स्पष्ट संबंधांना दुजोरा देत नाही.
सनस्क्रीन आणि परफ्यूमबाबत लोकांमध्ये कोणते गैरमसज आहेत?
सोशल मीडिया अनेकदा सनस्क्रीन आणि परफ्यूमशी संबंधित गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने दाखवतात. काही उत्पादनांमध्ये हानिकारक रसायनांचे प्रमाण कमी असते. पण, तरी निर्देशकाने सांगितल्यानुसार हे उत्पादन वापरल्यास ग्राहकांना आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात. अनेक वैज्ञानिक रिव्ह्यू आणि आरोग्य अधिकारी सहमती दर्शवतात की, सनस्क्रीन वापरणे त्वचेच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करण्यासाठी त्यातील रसायनांपासून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे, जे हानिकारक असल्याचे सिद्ध झालेले नाही.
परफ्यूममध्ये अनेक रसायने असतात आणि त्यापैकी काही अति हानिकारक असू शकतात; पण दैनंदिन जीवनात कमी प्रमाणात वापरले जाणारे परफ्यूम धोकादायक मानले जात नाहीत.
तुम्ही तुमचे सनस्क्रीन कसे निवडता आणि लेबलवर तुम्ही काय तपासता?
सनस्क्रीन निवडताना, ब्रॉड-स्पेक्ट्रम प्रोटेक्शन पाहा, जे UVA आणि UVB अशा दोन्ही किरणांपासून संरक्षण करते आणि तुम्हाला सोईस्कर SPF रेटिंग देते. जर तुम्हाला केमिकल फिल्टर युक्त सनस्क्रीन नको असेल, तर झिंक ऑक्साइड किंवा टायटॅनियम डाय-ऑक्साइड असलेले मिनरल आधारित सनस्क्रीन वापरा. हे सहसा सुरक्षित आणि प्रभावी म्हणून ओळखले जाते. बाजारामध्ये बंद झालेली किंवा असुरक्षित असलेली उत्पादने वापरू नका. नेहमी उत्पादनावरील मुदतीची तारीख तपासा आणि लेबलवर ते वॉटर रेझिस्टन्स असल्याचे लिहिले आहे का, हे तपासा. जेणेकरून तुमच्याकडून सुरक्षित उत्पादनाचा वापर होईल.
तुम्ही परफ्यूम कसा निवडला पाहिजे?
परफ्यूमपासून निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी असे उत्पादन बघा. ज्यामध्ये त्यांनी त्यातील घटकांची पूर्ण माहिती सांगितली आहे. नैसर्गिक आवश्यक तेल वापरणाऱ्या ब्रॅण्डची निवड करा. जर तुम्हाला हार्मोन्सवर परिणाम करणाऱ्या रसायनाविषयी भीती वाटत असेल, तर सुगंधमुक्त किंवा हायपोअलर्जेनिक पर्याय निवडा आणि तुमच्या त्वचेवर थेट परफ्यूम लावणे टाळा. परफ्यूम वापरण्याचा एकूण धोका कमी असला तरी निवडक आणि योग्य परफ्यूम वापरल्याने हानिकारक पदार्थांचा संबंध येत नाही आणि संबंधित धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.