अन्नाचा प्रत्येक घास ३२ वेळा चावून खावा, असं अनेकदा आपणाला सांगितलं जातं. अन्नाचा घास ३२ वेळा चावल्यामुळे केवळ दातांचा व्यायामच नव्हे, तर पाचक एन्झाइम्सचाही योग्य रीतीनं वापर केला जातो; ज्यामुळे पोषक घटकांचं चांगल्या प्रकारे पचन होतं. उषाकिरण सिसोदिया (आहार व पोषण विभागप्रमुख, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) या सांगतात की, आधुनिक विज्ञानदेखील सावकाश खाण्याच्या फायद्यांबाबत विश्वासार्हता व्यक्त करते.

जलद गतीने जेवण्याचा स्पष्ट परिणाम वजन वाढण्यात दिसून येतो. अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जलद गतीनं अन्न खाल्ल्यानं कॅलरीजचं प्रमाण वाढू शकतं. कारण- यावेळी शरीराला परिपूर्णतेची भावना लक्षात घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिवाय अशा परिस्थितीत जेवल्यानंतरही समाधानाची भावना जाणवत नाही किंवा पोट भरल्यासारखं वाटत नाही. अनेकदा जास्त वजन असलेले रुग्ण आपणाला जेवणानंतर तृप्ततेची भावना निर्माण होत नाही, अशा तक्रारी करतात. कारण- हे त्यांच्या जलद खाण्याच्या सवयींशी संबंधित असते, असंही उषाकिरण सिसोदिया यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा- 30-30-30 नियम हा पोट, मांड्या व वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय! तज्ज्ञांनी सांगितलं कसा असावा दिवस?

तर डॉक्टर सिसोदिया यांच्या मतांशी सहमत असलेल्या वैशाली येथील मॅक्स हॉस्पिटलच्या एंडोक्रायनोलॉजी आणि मधुमेह विभागाचे सल्लागार डॉ. जिमी पाठक यांनी सांगितलं, “अन्न जलद गतीनं खाल्ल्यानं जेवणानंतर ग्लुकोजची पातळी वाढते; जी टाईप-२ मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका वाढवण्याशी संबंधित असते.” ते पुढे म्हणाले, “अन्नाचं जलद सेवन केल्यानं IL-1 IL-6 सारख्या सायटोकिन्सची पातळीही वाढू शकते; जी इन्सुलिनला (इन्सुलिन हा एक असा हार्मोन आहे; जो तुमच्या शरीरात आणि अवयवांच्या पेशींमध्ये ग्लुकोजला प्रवेश करण्यासाठी मदत करतो.) प्रतिरोध करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे भविष्यात टाईप-२ मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो.

दुसरीकडे सावकाश जेवणाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कारण- जेव्हा आपण अन्न पूर्णपणे चघळतो, तेव्हा पाचक एन्झाइम्स अधिक चांगल्या पद्धतीनं कार्य करतात; ज्यामुळे अन्नाचं चांगल्या रीतीनं पचन होतं आणि आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात.

हेही वाचा- फॅट बर्न करण्यासाठी ‘या’ पाच स्टेप्स नक्की फॉलो करा; डाॅक्टर सांगतात, झपाट्याने होऊ शकते वजन कमी 

शिवाय, मधुमेहासारख्या परिस्थितीत अन्नाचं सावकाश सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, असंही सिसोदिया यांनी सांगितलं. तर डॉ. पाठक यांनी सांगितलं की, अन्न सावकाश खाल्ल्यानं गॅस्ट्रोइंटेस्टायनल तृप्ती संप्रेरकांवर परिणाम होऊ शकतो; जे भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. परंतु, प्रत्येक गोष्टीप्रमाणे सावकाश अन्न खाण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. कारण- जाणूनबुजून अन्न खूपच सावकाश खाल्ल्यानं जास्त हवा गिळण्याचा धोका असतो; ज्यामुळे जेवणानंतर गॅसची समस्या वाढू शकते, असंही सिसोदिया म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैद्यकीयदृष्ट्या खाण्याच्या गतीचे फायदे किंवा तोटे अनेकदा खाल्लेला अन्नाचा प्रकार आणि विशिष्ट आरोग्य स्थिती यांवर अवलंबून असतात. तरीही अन्नातील पूर्ण पौष्टिकता मिळावी यासाठी सामान्य नियम हा आहे की, पचनादरम्यान त्यात पाचक रस चांगल्या रीतीनं मिसळले जायला हवेत. त्यासाठी अन्न योग्य प्रकारे चावून खाल्ले पाहिजे. आधुनिक जीवनशैलीत जलद जेवणाच्या पद्धतीला प्रोत्साहन दिलं जात असलं तरी जेवताना गतीमध्ये समतोल राखणं महत्त्वाचं आहे. विचारपूर्वक आणि मध्यम गतीनं अन्नघटकांचं सेवन करणं हे वजन नियंत्रण, तसेच पचनसंस्था सुधारण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं, असंही सिसोदिया यांनी सांगितलं.