आपल्यापैकी बहुतेक जण खोकला झाल्यानंतर बेनाड्रील कफ सिरप, चेस्टन कफ सिरप, हनीटस कफ सिरप, अॅस्कोरिल कफ सिरप अशा वेगवेगळ्या सिरपचं सेवन करतात. यावेळी एकदा-दोनदा सिरप घेतल्यानंतर ते पुन्हा तसेच ठेवून, पुढच्या वेळी आजारी पडल्यावर त्याचेच सेवन करतात. तुम्हीही असंच करीत असाल, तर थांबा! कारण- याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ कपूर यांनी अलीकडेच एका महिन्यापेक्षा जास्त काळ उघडलेले कफ सिरप पुन्हा वापरण्याविरुद्ध इशारा दिला आहे. “एकदा उघडल्यानंतर, कोणतेही कफ सिरप एका महिन्यापेक्षा जास्त काळ ठेवू नका. एका महिन्यानंतर ते टाकून द्यावे लागते. कारण- त्याची क्षमता कमी झालेली असते. या प्रकरणात एकदा उघडल्यानंतर एक्सपायरी डेटवर जाऊ नका,” असे त्यांनी हरमन हार्डी यांच्या पॉडकास्टवर सांगितले आणि हा सल्ला मुलांना आणि प्रौढांनाही लागू होतो.
हे पडताळण्यासाठी, आम्ही इतर तज्ज्ञांशी संपर्क साधला. यावेळी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फोर्टिस असोसिएट – एस. एल. रहेजा हॉस्पिटलचे अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. परितोष यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. बघेल म्हणाले की, खोकला आणि सर्दीपासून बद्धकोष्ठता आणि इतर आजारांपर्यंत अनेक वैद्यकीय आजारांवर उपचार करण्यासाठी विविध प्रकारचे सिरप वापरले जातात. “डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शननुसार सिरपमध्ये येणारी औषधे घेणे उचित आहे. रुग्ण अनेकदा या बाटल्या संपवत नाहीत आणि जर पुन्हा त्रास झालाच, तर पुन्हा त्याचे सेवन करतात. कारण या बाटल्यांची एक्स्पायरी डेट जास्त असते. मात्र, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, पूर्वी उघडलेल्या औषधांच्या बाटल्या नंतर वापरल्याने अनेक धोके उद्भवू शकतात,” असे डॉ. बघेल म्हणाले.
ग्रेटर नोएडा येथील शारदा हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन, एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी याबाबत सहमती दर्शवली आणि सांगितले की, उघडलेले सिरप एकमहिन्यापेक्षा जास्त काळ वापरू नये. कारण- ते दूषित होण्याचा धोका असतो. कारण- हवा आणि जीवाणूंच्या संपर्कात आल्याने सूक्ष्म जीवांची त्यात वाढ होऊ शकते. “त्यातील सक्रिय घटक खराब होऊ शकतात, ज्यामुळे सिरपचा प्रभाव कमी होतो,” असे पुढे डॉ. श्रीवास्तव अधिकत्वाने स्पष्ट केले.
असे सिरप वापरल्यास काय होते?
डॉ. बघेल म्हणाले की, या सिरपची प्रभावीता कमी झालेली असू शकते. नंतरच्या काळात ते शरीरावर त्याचा अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. तुम्हाला त्याचे जास्त प्रमाणात सेवन करावे लागू शकते. कारण- ते लिहून दिल्याप्रमाणे काम करणार नाही. डॉ. बघेल यांच्या मते, “ते जीवाणू किंवा बुरशी यांनी दूषित झालेले असू शकते. कारण- यापैकी बहुतेक सिरप साखरेवर आधारित असतात आणि त्यामुळे ते हवाबंद बाटलीत साठवले नसल्यास ते दूषित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नवीन संसर्ग होण्याचा किंवा पोट खराब होण्याचा धोका संभवतो”.
जर तुम्हाला बाटलीच्या आत चव, रंग, बुरशी किंवा असामान्य वाढ दिसून आली, तर संभाव्य आरोग्य धोके टाळण्यासाठी ती ताबडतोब टाकून द्या. “शेवटी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःहून औषधोपचार करणे टाळा, विशेषतः सिरप किंवा इतर प्रीस्क्रिप्शन औषधांसह. कारण- त्यामुळे अनपेक्षित दुष्परिणाम, गैरवापर किंवा इतर औषधांसह हानिकारक परिणाम होऊ शकतात. नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधे घ्या,” असेही डॉ. बघेल यांनी स्पष्ट केले.