अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली मृत्यूने पुन्हा एकदा कॅन्सरचा गंभीर धोका चर्चेत आला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतात महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहे, तर पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण भयावह वेगाने वाढताना दिसत आहे. वेळेत तपासणी व काळजी घेतली तर या आजारावर मात करणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
देशातील कर्करोग रुग्णांमध्ये महिलांचा वाटा अधिक आहे. एकूण रुग्णांपैकी ५१.१% महिला असून, पुरुषांच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. मात्र, मृत्युदराच्या बाबतीत चित्र वेगळं आहे. महिलांचा कर्करोग मृत्युदर तुलनेने कमी असून, तो फक्त ४५ टक्के आहे..
पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग सर्वाधिक प्रमाणात आढळतो. आतापर्यंत फुप्फुसाचा कर्करोग आघाडीवर होता, पण ताज्या आकडेवारीनुसार तोंडाचा कर्करोग आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये कर्करोगचे प्रमाण सर्वाधिक नोंदवले गेले आहे. त्या भागात कर्करोग रुग्णसंख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
२०१५ ते २०१९ दरम्यान देशभरातील ४३ कर्करोग नोंदणी केंद्रांमधून गोळा केलेल्या माहितीवर प्रमुख संस्थांमधील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणातून हे काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत, ज्या काळात ७.०८ लाख कर्करोगाचे रुग्ण आणि २.०६ लाख मृत्यू नोंदवले गेले होते.
विश्लेषणाच्या आधारे res4.earchers ने मांडलेल्या अंदाजानुसार २०२४ मध्ये देशभरात एकूण १५.६ लाख कर्करोगाचे रुग्ण आणि ८.७४ लाख जण मृत्युमुखी गेले.
लोकसंख्या-आधारित कर्करोग नोंदणी केंद्रे निवडक भौगोलिक क्षेत्रांमधील नवीन कर्करोग प्रकरणे, मृत्यू आणि ट्रेंड्सबाबत माहिती गोळा करतात. भारतातील नोंदणी केंद्रे सध्या २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अंशतः किंवा पूर्णपणे व्यापू शकतात आणि त्या माध्यमातून देशाच्या सुमारे १०% ते १८% लोकसंख्येतील ट्रेंड्सवर लक्ष ठेवले जाते. नव्या नोंदणी काश्मीर, प्रयागराज व तिरुवनंतपुरमसारख्या भागांत सुरू झाल्या आहेत.
हे विश्लेषण देशभरातील संशोधकांच्या गटाने विविध रुग्णालयांतून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे केले. त्यामध्ये एम्स-दिल्ली, अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट-चेन्नई, पीडी हिंदुजा-मुंबई, टाटा मेमोरियल सेंटर-नवी मुंबई व आसाम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांचा समावेश आहे. मात्र, २०२० ची माहिती यात घेतलेली नाही. कारण- कोविड-१९ चा आरोग्य व्यवस्था आणि नोंदणीवर मोठा परिणाम झाला होता.”
कर्करोग उपचारासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत आणि काही नव्या योजना अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत. त्यात आरोग्य व वेलनेस सेंटर्सच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावर कर्करोग तपासणी, देशभरातील सर्व जिल्ह्यांत सुरू होणारी डे-केअर सेंटर्स आणि आयुष्मान भारत योजनेखाली तृतीयक (tertiary) केंद्रांमध्ये उपचाराची सुविधा यांचा समावेश आहे. तसेच, कर्करोगावरील नवनवीन औषधे स्वस्त करण्यासाठी सरकारने त्यावरील कर आणि शुल्क कमी करण्यावर काम सुरू केले आहे.”
नोंदणी माहितीच्या विश्लेषणातून समोर आलेल्या प्रमुख ट्रेंडमध्ये हे समाविष्ट आहे :
महिलांमध्ये कर्करोगाचे जास्त रुग्ण आढळतात
देशातील कर्करोग नोंदणीचे समन्वय साधणारे आयसीएमआर-नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चचे संचालक डॉ. प्रशांत माथूर सांगतात, “लिंगानुसार दिसून येणारी ही तफावत (gender disparity) प्रामुख्याने कर्करोगाचे निदान होण्यासाठी लागणार्या वेळेशी संबंधित आहे.“ महिलांमध्ये रुग्णसंख्या जास्त आणि मृत्युदर कमी असण्यामागचं कारण निदान होण्यासाठी लागणारा वेळ आणि कॅन्सरचे प्रकार हे आहेत. स्तन आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हे एकत्रितपणे ४०% महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांसाठी जबाबदार असतात. सामान्यतः चांगले रोगनिदान, जगण्याची उच्च क्षमता (higher survival) व आधीपासून उपलब्ध असलेले तपासणी कार्यक्रम (screening programmes) असल्यामुळे वेळेत निदान आणि उपचार शक्य होतात.
त्यांच्या मते, “पुरुषांमध्ये मात्र तोंडाचा, फुप्फुसाचा, यकृताचा, पोटाचा व अन्ननलिकेचा कॅन्सर हे प्रमुख प्रकार असून, त्यांचे बहुतेक वेळा उशिरा निदान होते. त्यामुळे मृत्युदर महिलांच्या तुलनेत जास्त आहे.”
डॉ. माथूर पुढे म्हणाले, “आमच्या ताज्या सर्व्हायवल अॅनालिसीसनुसार, तोंडाच्या कॅन्सरमध्येही महिलांचा मृत्युदर पुरुषांच्या तुलनेत थोडा कमी आढळतो.”
तोंडाच्या कर्करोगात वाढ (Oral cancer on the Rise)
देशातील ४३ कॅन्सर नोंदणीपैकी १४ ठिकाणी पुरुषांमध्ये आणि चार ठिकाणी महिलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे आढळले. विशेष म्हणजे पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग हा फुप्फुसाच्या कर्करोगालाही मागे टाकून सर्वाधिक आढळणारा प्रकार ठरला आहे. ही बाब महत्त्वाची मानली जाते. कारण- गेल्या काही वर्षांत तंबाखूचा वापर कमी झाला आहे. ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS) च्या दोन फेऱ्यांनुसार भारतात तंबाखू वापरणार्या प्रौढांचे प्रमाण २००९-१० ते २०१६-१७ दरम्यान ३४.६% वरून २८.६% इतके कमी झाले.
डॉ. माथूर यांनी सांगितले, “कर्करोगावरील अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, तंबाखूसारख्या कर्करोगजनक घटकाच्या पहिल्या संपर्कानंतर साधारणतः २० किंवा त्याहून अधिक वर्षांनी कर्करोग विकसित होतो. हाच दीर्घ विलंबाचा कालावधी (latency period) याचे कारण असू शकतो की, तंबाखूचा वापर घटला असला तरी तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यासह अतिमद्यपान हादेखील तोंडाच्या कर्करोगाचा सिद्ध झालेला जोखमीचा घटक आहे आणि त्यामुळेही हा बोजा वाढतो.”
AIIMS-दिल्लीचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अभिषेक शंकर यांनी सांगितले, “मद्यपान हे किमान सात प्रकारच्या कर्करोगाचे धोकादायक घटक मानले जाते, ज्यात तोंडाचा आणि यकृताचा कर्करोग समाविष्ट आहे. त्याशिवाय पोटाचा (gastric) व मोठ्या आतड्याचा (colorectal) कर्करोग यांसारख्या सामान्य प्रकारच्या कर्करोगाचा धोकादेखील तो वाढवतो. मद्यपान आणि तंबाखूसेवन हे दोन्ही स्वतंत्रपणे कर्करोगाचा धोका वाढवतात; मात्र जेव्हा हे दोन्ही एकत्रितपणे केले जातात, तेव्हा तो धोका अनेक पटींनी वाढतो,” असे डॉ. शंकर यांनी स्पष्ट केले.
महिलांसाठी अधिक तपासणीची गरज (More screening for women)
महिलांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी संशोधकांनी जागरूकता, तपासणी (screening) व लसीकरण यांसारख्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आहे. उदाहरणार्थ- स्तनाचा कर्करोग हा महिलांमधील एकूण कर्करोगांपैकी ३०% आहे आणि तो वेळेवर तपासणी करून शोधता आल्यास बरे होण्याची शक्यता अधिक वाढते.
डॉ. माथूर यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या मुखाचा (cervical) कॅन्सर दर एक लाख लोकसंख्येमागे फक्त दोन नोंदणी केंद्रांमध्येच चारपेक्षा कमी होता. त्यामुळे तपासणी व्यवस्था, HPV लसीकरण व जागरूकता यांना अधिक बळकटी देण्याची आवश्यकता आहे.
ईशान्य भारतात कर्करोगाचा इशारा (Northeast alert)
देशातील ४३ कॅन्सर नोंदणीपैकी सर्वाधिक कॅन्सरचा प्रादुर्भाव आयझॉल (मिझोराम) येथे नोंदवला गेला — पुरुषांमध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे १९८.४, तर महिलांमध्ये १७२.५ इतका आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये जीवनशैली, पर्यावरण व संसर्गजन्य घटकांमुळे कर्करोगाचे प्रमाण अत्याधिक असल्याचे डॉ. माथूर यांनी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ईशान्येकडील पुरुष आणि महिलांमध्ये तंबाखूचे सेवन राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. तंबाखूव्यतिरिक्त, सुपारी खाणे, डुकराची आंबवलेली चरबी (sa-um), धुरी दिलेले आणि मिठात वाळवलेले मांस व मासे, खूप मसालेदार पदार्थ, अत्याधिक गरम पेये, तसेच सोडा अॅडिटिव्ह म्हणून वापरणे बाबीही कर्करोगाचा धोका वाढवतात.
त्याशिवाय हेलिकोबॅक्टर पायलोरी(Helicobacter Pylori), हेपेटायटिस (hepatitis), सॅल्मोनेला टायफी (salmonella typhi), ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) अशा संसर्गांचा प्रादुर्भाव या भागांत अधिक आहे आणि हेही विविध प्रकारच्या कर्करोगांचे कारण ठरू शकते, असे माथूर यांनी नमूद केले.
डॉ. शंकर यांनी, धुरी देऊन मांस साठवणे आणि प्रिझर्व्हेटिव्हचा वापर केल्यामुळे नायट्रोजन संयुगे शरीरात जातात, जी कर्करोगाचा धोका वाढवतात. ईशान्य राज्यांमध्ये धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाणही खूप जास्त आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो. त्याशिवाय घर गरम करण्यासाठी आगीचा वापर केल्याने घरातील प्रदूषणाचे प्रमाणही वाढते,” असे सांगितले.
भौगोलिक पातळीवरील आकडेवारी
- स्तनाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण हैदराबादमध्ये होते (प्रति १,००,००० लोकसंख्येमागे ५४) तर गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण मिझोरमची राजधानी असलेल्या आयझॉलमध्ये (२७.१) होते.
- पुरुषांमध्ये श्रीनगर येथे फुप्फुसाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण नोंदले गेले — ३९.५ प्रति १ लाख लोकसंख्या. महिलांमध्ये हे प्रमाण आयझॉल येथे सर्वाधिक होते — ३३.७ प्रति १ लाख लोकसंख्या.
- दक्षिणेकडील भागात आणि महानगरांमध्ये, ज्यामध्ये विशाखापट्टणम, बंगळुरू, कोल्लम, तिरुवनंतपुरम, मलबार प्रदेश, चेन्नई व दिल्ली यांचा समावेश आहे, फुप्फुसाचा कर्करोग हा सर्वांत जास्त निदान होणारा कर्करोग असल्याचे समोर आले आहे.
- पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण अहमदाबादमध्ये (३३.६) आणि पूर्व खासी टेकड्यांमधील महिलांमध्ये (१३.६) होते.
- काही पश्चिमेकडील (अहमदाबाद शहरी, भोपाळ, नागपूर व वर्धा), मध्यवर्ती (बार्शी ग्रामीण, मुंबई, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी) आणि उत्तरेकडील (प्रयागराज व वाराणसी) प्रदेशांमध्ये तोंडाचा कर्करोग सर्वांत सामान्य असल्याचे आढळून आले.
- श्रीनगरमध्ये (१२.७) पुरुषस्थ ग्रंथींच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण नोंदवले गेले.
तज्ज्ञांच्या मते, भौगोलिक प्रसारामुळे राष्ट्रीय, तसेच राज्यस्तरीय योजना आखण्याची गरज अधोरेखित होते, ज्यामध्ये संबंधित वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधने त्यानुसार वाढवल्या पाहिजेत.