International Yoga Day Heart Benefits: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव हृदय संकटात सापडतो आहे. चुकीच्या सवयी, खराब आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. त्यामुळे योगा करणे गरजेचे आहे. योगामुळे हृदयाच्या ठोक्यांवर सकारात्मक परिणाम होतो. नियमित योग केल्याने रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी होतो आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते. योगामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते, जे हृदयरोग्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच योगामुळे तणाव कमी होतो, जो हृदयविकाराचा मोठा कारणीभूत घटक आहे. योगदिनाच्या निमित्ताने तुम्हीही काही सोप्या पण प्रभावी आसनांनी हृदयाचं आरोग्य सुधारू शकता, या विषयीचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया…
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते, नियमित योगसाधना केवळ मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारत नाही, तर ती हृदयविकारापासून बचाव करण्यातही उपयोगी ठरते. एम्स, नवी दिल्ली येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अंबुज रॉय यांच्या मते, योगामुळे शरीरात ताणतणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं.
भारत आणि यूकेतील हृदयरोगतज्ज्ञांनी २०२० मध्ये २४ केंद्रांमधील सुमारे ४,००० रुग्णांवर एक संशोधन केलं. त्यामध्ये योग आणि पारंपरिक उपचारांमधील परिणामकारकतेचा अभ्यास करण्यात आला. जरी योगाने मोठ्या प्रमाणावर हृदयविकार पुन्हा होण्याचं प्रमाण कमी केल्याचं स्पष्ट दिसून आलं नाही (योग करणाऱ्यांत ६.७ टक्के आणि इतरांमध्ये ७.४ टक्के), तरी योगामुळे रुग्णांची जीवनशैली आणि मानसिक स्थिती अधिक सुधारली, असं स्पष्ट झालं.
डॉ. रॉय म्हणतात, “देशात कार्डियाक रिहॅबची सोय मर्यादित आहे. त्यासाठी महागडी यंत्रसामुग्री आणि प्रशिक्षित कर्मचारी लागतात. अशा वेळी योग हा एक स्वस्त आणि प्रभावी पर्याय ठरतो.” प्रशिक्षण घेतलेल्या योगशिक्षकांच्या देखरेखीखाली हे रुग्ण उपचार केंद्रात योग करू शकतात.”
योगाचं हृदयावर होणारं परिणामकारक कार्य
डॉ. प्रभाकरन म्हणतात की, योग केवळ आसने नसून त्यात प्राणायाम, ध्यान आणि आहार यांचा समावेश असतो. योगामुळे कॉर्टिसोलसारखे तणाव वाढवणारे हार्मोन्स कमी होतात, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर आणि रक्तदाबावर होतो.
हृदयरोग रुग्णांसाठी सुरक्षित प्राणायाम व आसने
योगतज्ज्ञ कामिनी बोंबडे यांच्या मते, भ्रामरी आणि उज्जयी प्राणायाम हृदयासाठी सुरक्षित आहेत. शशांकासन, मक्रासन, नौकासन आणि शवासन ही आसने हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारतात. सूर्यनमस्कार हे पूर्वतयारीसाठी फायदेशीर असले तरी रुग्णांसाठी थेट नको, असेही त्या नमूद करतात