Multani Mitti For Cystic Acne: ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माने अलीकडेच तिच्या मुरुमांशी केलेल्या संघर्षाबद्दल सांगितलं. ‘द ब्रीफ इंडिया’सोबत बोलताना, अभिनेत्रीने सांगितलं की तिने सिस्टिक मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी मुलतानी मातीच्या स्नानावर भर दिला. फक्त चेहऱ्यावर लावण्याऐवजी, ती संपूर्ण शरीरावर मुलतानी माती लावते.
ती म्हणाली, “फक्त मुरूम असलेल्या त्याच जागेवर लावू नका, चेहरा, हात, आणि संपूर्ण शरीरावर लावा.” आणि पुढे सांगितलं, “जर तुम्ही दररोज एक महिना हे केलं, तर तुम्ही खूप वाईट मुरुमंना दूर करू शकाल.”
डॉ. फाल्गुनी शाह (त्वचारोगतज्ज्ञ आणि सौंदर्यतज्ज्ञ रेडियान्स क्लिनिक, मुंबईच्या संस्थापक) यांच्या मते, मुलतानी माती (जिला फुलर्स अर्थ असेही म्हणतात) भारतीय स्किन केअर रुटिनमध्ये खूप वर्षांपासून वापरली जाते. ही माती चेहऱ्यावरील तेल शोषून घेते आणि छिद्र स्वच्छ करते, म्हणून ती उपयोगी मानली जाते.
“मुलतानी माती ही नैसर्गिक माती असल्यामुळे ती तेलकट, जाडसर आणि तरुण त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. अशा त्वचेत तेल ग्रंथी (sebaceous glands) जास्त सक्रिय असतात. त्यामुळे अशा त्वचेसाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा मुलतानी मातीचा फेसपॅक लावल्याने जास्तीचं तेल कमी होतं, त्वचेची छिद्रं मोकळी होतात आणि ब्लॅकहेड्स होण्यापासून बचाव होतो,” असं त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, मुलतानी मातीमध्ये आंबा हळद आणि मध मिसळून ती हलक्या हाताने स्क्रबसारखी वापरू शकतो. यामुळे केवळ त्वचा साफ होत नाही, तर त्वचा उजळते आणि वरचा मळही निघून जातो.
मुलतानी माती वापरण्याचे फायदे (Multani Mati Benefits)
डॉ. अमीषा महाजन (कॉस्मेटिक त्वचारोगतज्ज्ञ आणि ईडन स्किन क्लिनिकच्या संस्थापक) यांनी indianexpress.com ला सांगितले की मुलतानी माती खूप शोषक (absorbent) असते आणि ती त्वचेतील जास्त स्रवलेलं तेल (sebum) काढून टाकते. म्हणून तेलकट आणि मुरुमांची समस्या असलेल्या लोकांसाठी ती खूप फायदेशीर आहे.
“मुलतानी माती लालसरपणा आणि मुरूमाची सूज कमी करण्यात मदत करते,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितलं की, ही माती त्वचेतले मळ आणि घाण साफ करून त्वचा शुद्ध करते आणि त्वचेची छिद्र मोकळी करते. ही हलकी स्क्रबसारखी (exfoliant) असते आणि मृत त्वचा काढून टाकते. याचा नियमित वापर केल्यास, त्वचेची छिद्र घट्ट होण्यासही मदत होते.
मुलतानी माती खूप जास्त मुरुम असलेल्या त्वचेवर उपाय करू शकते का?
“मुलतानी माती त्वचेतील तेल कमी करण्यास मदत करते, पण सिस्टिक मुरुमांसाठी ती जादूई उपाय नाही. सिस्टिक मुरुमं ही आतून होणारी आणि जास्त सूज असलेली समस्या असते,” असं डॉ. शाह म्हणाल्या. त्यांनी सांगितलं की, क्ले मास्क्स वापरल्याने तात्पुरता आराम मिळू शकतो, कारण ते वरचं तेल शोषतात, पण खरी कारणं दूर करत नाहीत.
तसेच, कोरडी किंवा वयस्कर त्वचेवर मुलतानी माती लावल्यास त्रास होऊ शकतो – कारण ती त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून टाकते, ज्यामुळे त्वचा अजून संवेदनशील होते, डाग येऊ शकतात किंवा अकाली वृद्धत्व देखील दिसू लागत.
ज्यांच्या त्वचेवर मुरूम लगेच येतात त्यांनी मुलतानी माती वापरताना काळजी घ्यावी, असं डॉ. शाह म्हणाल्या. त्यांनी सांगितलं की, “मुलतानी माती वापरल्यानंतर नेहमी non-comedogenic मॉइश्चरायझर लावावा.” तसंच त्या म्हणाल्या, “जर मुरुमं सतत होत असतील, दुखत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम. तेच योग्य उपचार देऊ शकतात.”
मुलतानी माती वापरताना लक्षात ठेवाव्यात अशा काही सावधगिरीच्या गोष्टी
डॉ. महाजन यांनी काही महत्वाचे मुद्दे सांगितले:
१. कोरडेपणा येण्याचा धोका: मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते, त्यामुळे त्वचा कोरडी वाटू शकते किंवाअचानक परत खूप तेलकट होऊ शकते.
२.संवेदनशील त्वचेसाठी नाही: ज्यांना रोसेसिया (rosacea), eczema किंवा अतिसंवेदनशील त्वचा आहे, त्यांच्यासाठी ती त्रासदायक ठरू शकते.
३. रोज वापरू नये: आठवड्यातून १–२ वेळा पुरेसे आहे.
४. नेहमी पॅच टेस्ट घ्या: विशेषतः जर त्वचेवर मुरुमं खूप असतील किंवा सूज असेल.
५. जास्त सुकू देऊ नका: माती थोडी ओलसर असतानाच धुवून टाका, नाहीतर त्वचेचं संरक्षण करणारं बाह्य थर (barrier) खराब होऊ शकते.
६. जर मुरुमं कमी करणाऱ्या गोळ्या घेत असाल, तर वापरू नका: कारण अशाने त्वचेचं संरक्षण आणखी कमजोर होऊ शकतं.
एकंदरीत, मुलतानी माती उपयोगी असली तरी ती सर्वांसाठी सारखी उपयुक्त नाही. स्वतःचा त्वचाप्रकार जाणून वापरा, कमी प्रमाणात वापरा आणि मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.