Soha Ali Khan Reveals How To Make PMS Cramp Relief Tea : मासिक पाळीदरम्यान मुली असो की महिला प्रत्येकीला त्रास हा होतोच. काही जणांना पोट दुखणे, पाय दुखणे, सतत चिडचिड होणे, अशा सगळ्या समस्यांना सामोरे जावे लागतेच. मग यादरम्यान कित्येक जण मूड सुधारण्यासाठी चॉकलेट आणि काही वेदना कमी करण्यासाठी पोट, पाय शेकून घेतात. तर या वेदना थोड्या प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास उपाय घेऊन आलो आहोत.

अलीकडेच ४६ वर्षीय सोहा अली खान, जी सध्या पेरिमेनोपॉज (perimenopause)शी झुंजत आहे. त्याचबद्दल तिने अलीकडेच प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस)च्या क्रॅम्प्सवर उपचार करण्यासाठी एक घरगुती उपाय शेअर केला आहे; जो अनेक महिलांसाठी कदाचित फायदेशीर ठरू शकतो. हा घरगुती उपाय म्हणजे पाळीपूर्व वेदना कमी करणारा चहा (पीएमएस क्रॅम्प रिलीफ टी).

साहित्य आणि कृती

हा चहा बनवणे अगदी सोपं आहे. फक्त थोडे ताजे आले किसून घ्या आणि ते उकळत्या पाण्यात घाला, नंतर दालचिनी आणि नैसर्गिक गोडवा मिळवण्यासाठी थोडा मध त्यात घाला. मग तुमचा चहा तयार होतो, असे सोहा अली खानने इन्स्टाग्रामवर सांगितले आहे.

या चहामुळे पाळीच्या दिवसांत वेदना कमी होण्यास, मूड सुधारण्यास व शरीराची काळजी घेण्यास मदत होते. आले, दालचिनी व मध या तिन्हींमध्ये सूज कमी करणारे आणि दालचिनीमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. तर, हा चहा खरेच फायदेशीर आहे का याबद्दल जाणून घेण्यास दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.

आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, पाळी येण्यापूर्वीच्या क्रॅम्पपासून आराम मिळविण्यासाठी हर्बल चहा निवडणे ही एक पारंपरिक पद्धत म्हणून ओळखली जाते. विविध औषधी वनस्पतींचा वापर करून चहा बनवल्याने मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी होतो. काही चहामध्ये असे घटक असतात, जे हलके किंवा स्नायू शिथिल करणारे किंवा सूज कमी करणारे घटक म्हणून काम करतात. त्यामुळे जे मासिक पाळीपूर्वी किंवा मासिक पाळीच्या काळात गर्भाशयात दुखणे, पोट फुगणे, सूज कमी होणे व ताण कमी होण्यास मदत होते.

आल्याचा चहा ही एक बेस्ट निवड आहे. कारण- त्यात जिंजेरॉल असते; जे जळजळ रोखू शकते, पेटके कमी करण्यासही मदत करू शकते. त्याचबरोबर आले, दालचिनी आणि मधाचा चहा पाळीच्या क्रॅम्प्ससाठी एक नैसर्गिक, आरामदायी उपाय म्हणून काम करू शकतो. कारण – या पदार्थांमधील प्रत्येक घटकाचे वेगवेगळे फायदे आहेत.

  • आल्यामध्ये जिंजेरॉल नावाचा घटक असतो; ज्यामध्ये सूज कमी करणारे (anti-inflammatory) आणि स्नायूंचे आकुंचन थांबवणारे गुण असतात; त्यामुळे गर्भाशयाचे स्नायू सैल करून, वेदना कमी करण्यास मदत मिळते. तसेच आल्यामुळे पचन सुधारते, पाळीच्या आधी किंवा पाळी आल्यावर पोट फुगणे कमी होते.
  • दालचिनीमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्याचे सौम्य आरामदायक परिणाम स्नायूवर होतात, असे तज्ज्ञ म्हणाले आहेत.
  • मध केवळ नैसर्गिक गोडवाच देत नाही, तर अँटीऑक्सिडंट्सदेखील प्रदान करतो आणि त्याचा शांत प्रभाव शरीरावर पडतो, जो मूड स्विंग्स व्यवस्थापित करण्यास आणि पीएमएसदरम्यान आराम प्रदान करण्यास मदत करू शकतो.

त्यामुळे या पदार्थांचा एकत्रित चहा पेटके कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि आरामाची भावना प्रदान करण्यास मदत करू शकतात. जरी ते मासिक पाळीच्या वेदनांसाठी वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नसले तरीही. पण, मासिक पाळीदरम्यान स्वतःची काळजी घेण्यासाठी एक सौम्य उपचार असू शकतो.

पण, हा चहा पिणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, काही औषधी वनस्पस्ती आरोग्यासाठी सुरक्षित नसतात. तसेच या चहाचे सेवन करण्याबरोबर पुरेशी विश्रांती घेणे, शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवणे, गरम पाण्याने पोट शेकून घेणे आणि संतुलित आहार घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे.