Is Sweet Smelling Urine Sign Of High Diabetes: आपण आपल्या शरीरामध्ये अन्नाच्या स्वरूपात जे ‘टाकत’ असतो त्याचे परिणाम हे आपलं शरीर टाकाऊ घटकांच्या माध्यमातून ज्या गोष्टी बाहेर टाकत असतं त्यातून दिसून येत असतात. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, अनेकदा लघवी, मल हे तुमच्या आरोग्य स्थितीविषयी महत्त्वाचे संकेत देत असतात.
लघवीचा रंग, वास यातून आपल्या शरीरात काय चाललंय याचा अंदाज घेता येऊ शकतो. आता वास हा शब्द वाचून फक्त थोडा ‘उग्र’ वासच बिघडलेल्या आरोग्याचं लक्षण आहे असं आपल्याला वाटू शकतं पण जर का लघवीचा वास हा थोडा गोडसर वाटत असेल तर ही सुद्धा चिंताजनक बाब असू शकते. गोडसर वास म्हणजे उदाहरणासाठी सांगायचं तर एखादं गोड फळ जेव्हा खराब होतं तेव्हा येणारा वास, किंवा जेव्हा आपण दुधात साखर घालून गरम करतो तेव्हा येणारा वास, जेव्हा कांदा किंवा साखर थोडी करपवली जाते तेव्हा येणारा वास, समजा असा वास एखाद्याच्या लघवीला येत असेल तर त्या व्यक्तीने लक्षात घ्यायच्या संभाव्य शक्यता आपण आज जाणून घेणार आहोत.
मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रणव घोडी यांच्या माहितीनुसार, गोड वास येणारा लघवी हा रक्तातील साखरेच्या उच्च पातळीचे लक्षण असू शकते, विशेषतः ज्या व्यक्तींना मधुमेहाचे निदान झालेले नाही त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. जेव्हा रक्तात जास्त ग्लुकोज जमा होते तेव्हा शरीर ते लघवीद्वारे काढून टाकण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे एक स्पष्ट गोड किंवा फळांसारखा वास येऊ शकतो.
डॉ. घोडी यांच्या माहितीनुसार, हा वास केटोन्समुळे असू शकतो, केटोन्स म्हणजे आपले शरीर जेव्हा ऊर्जेसाठी चरबीचा (फॅट्सचा) वापर करत असते तेव्हा तयार होणारे रसायन; जे मुख्यतः अनियंत्रित मधुमेहामुळे अधिक प्रमाणात निर्माण होतात. काही प्रकरणांमध्ये, हे डायबेटिक केटोअॅसिडोसिस (DKA) चे हे लक्षण असू शकते, जी एक जीवघेणी परिस्थिती आहे व यासाठी त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.
नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या माहितीनुसार, जर एखाद्याला लघवीचा वास हा थोडा खराब झालेल्या फळांसारखा येत असेल आणि त्याचबरोबर खालीलप्रमाणे लक्षणे सुद्धा जाणवत असतील तर विलंब न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
१) जास्त तहान लागणे
२) वारंवार लघवी होणे
३) थकवा येणे
४) अचानक वजन कमी होणे
५) लघवीमध्ये रक्त
६) दुर्गंधीयुक्त लघवी
७) ओटीपोटात किंवा पाठीत दुखणे
८) ताप येणे
९) अंग थरथरणे
१०) मानसिक गोंधळ, अस्पष्टता
तळटीप: हा लेख तज्ज्ञांकडून प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. आपल्याला जर संभ्रम असेल किंवा चाचणी करायची असेल तर तुमच्या आरोग्य परिस्थितीची पूर्ण माहिती असलेल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.