Badishep Benefits in Marathi: स्वयंपाकघरात बडीशेप असणे खूप सामान्य आहे. भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपेला महत्त्व आहे. साधारणत: जेवणानंतर अनेकदा लोक बडीशेप माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. बडीशेपेचा गुणधर्म आणि सुगंध अनेक पदार्थांची चव वाढवतो. जेवणानंतर बडीशेप चघळल्याने पचन सुलभ होतेच, शिवाय ते उत्तम नैसर्गिक माउथ फ्रेशनरदेखील म्हणून काम करते. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन यांसोबतच पोषक घटक असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. बडीशेपचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. बडीशेपचे पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात. बडीशेप थंड असते आणि त्यामुळे उन्हाळ्यात बडीशेपचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. बडीशेप खाण्याचे कोणते फायदे आहेत याविषयीचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ..

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते. बडीशेपमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. बडीशेप खाण्याचे फायदे खाली दिले आहेत, जाणून घ्या…

बडीशेप खाण्याचे फायदे

१. वजन कमी होण्यास मदत

वजन कमी करण्यासाठी बडीशेपकडे एक योग्य पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी बडीशेप अनेक प्रकारे फायदेशीर मानली जाते. जे लोक नियमितपणे बडीशेप चघळतात, त्यांचा चयापचय दर संतुलित असतो. सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे भूक कमी होऊन, पोट भरल्यासारखे वाटू लागते आणि व्यक्ती जेवताना कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करते.

२. पोटदुखी दूर होते

बडीशेपमध्ये सुगंध आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दोन्ही असतात. बडीशेपमध्ये अनेक जीवनसत्त्वांसोबत विविध खनिजेदेखील असतात. पोटभर जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण लगेच पचण्यास मदत होते. बडीशेपमध्ये असणारे एनेथोल, फेन्कोन व एस्ट्रागोल जे अँटिस्पास्मोडिक आणि दाहकविरोधी म्हणून कार्य करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन व पोट फुगणे कमी होते. तसेच बडीशेपेमध्ये फायबरदेखील असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया आणखी सुधारू शकते. उत्कृष्ट पाचक गुणधर्मांमुळे बडीशेप पोटातील गॅस कमी करण्यास मदत करते, असे मानले जाते. ती पचनक्रिया सुधारून, जास्त प्रमाणात गॅस तयार होऊ न देता, आतड्यांमधून सहज मार्ग काढून देते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

बडीशेप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. विरघळणारे फायबर असलेली बडीशेप एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. विरघळणारे फायबर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल शोषण्यापासून रोखते. हे तंतू कोलेस्ट्रॉलपासून बनलेल्या पचनसंस्थेतील पित्त आम्लांशी बांधले जातात आणि त्यांना मलमार्गे शरीरातून बाहेर काढतात.