Parasitic Worm Infections : जगातील प्रत्येक देशात राहणाऱ्या लोकांची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. काही देशात खात असलेले पदार्थ आपल्याला खूप विचित्र वाटतात. पण आपल्याला जरी ते पदार्थ विचित्र वाटत असले तरी त्या लोकांसाठी ते आवडीचे खाद्य असते. काही देशांमध्ये असे विचित्र पदार्थ खाऊन अनेकजण गंभीर आजारी पडल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक घटना व्हिएतनाममध्ये घडली आहे. जिथे एका महिलेने ताज्या रक्ताने बनवलेला पदार्थ खाल्ला. त्यानंतर तिला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. हा आजार इतका भयंकर आहे की, ज्यामुळे महिलेच्या शरीरात मोठ्या जंतूंचा संसर्ग झाला आहे. हे जंतू महिलेच्या मेंदूपासून पायांच्या बोटांपर्यंत पोहचले आहेत.
व्हिएतनाममधील हमोई शहरात एका ५८ वर्षीय महिलेने ताज्या रक्ताने बनवलेला एक पदार्थ खाल्ला ज्यानंतर ती आजारी पडली आहे. यानंतर महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांच्या टीमने तिची तपासणी केली. यावेळी तिच्या संपूर्ण शरीरात जंतूंचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांचे महिलेवर उपचार सुरू आहेत. या महिलेला संसर्गानंतर तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. जेवण बनवताना अनेकदा ती चक्कर येऊन पडली.
हेही वाचा : सावधान! वॉशरुमध्ये तुम्हीही रोज ‘ही’ गोष्ट वापरत असाल तर आरोग्याचं होऊ शकत नुकसान, जाणून घ्या कसं
‘हा’ पदार्थ खाल्ल्याने पडली आजारी
महिलेने आजारी पडण्यापूर्वी व्हिएतनाममध्ये आवडीने खाल्ला जाणारा ‘टिट कॅन’ हा स्थानिक पदार्थ खाल्ला होता. कच्चे रक्त आणि शिजवलेल्या मांसापासून ‘टिट कॅन’ हा पदार्थ बनवला जातो. या महिलेने ज्यावेळी ‘टिट कॅन खाल्ला तेव्हा त्यात वापरलेल्या रक्तात पॅरासाइट जिवंत असल्याने ते तिच्या पोटात गेले. यानंतर त्यांनी महिलेच्या मेंदूला संक्रमित करण्यास सुरुवात केली. महिलेची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला डांग वॅन न्गु रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी पहिल्यांदाच एवढी विचित्र केस पाहून डॉक्टरही हैराण झाले.
यावेळी डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमध्ये महिलेच्या हातापासून पायाच्या त्वचेत अनेक जंतू फिरताना दिसते. याशिवाय डॉक्टरांच्या टीमला असे आढळले की, या जंतूंनी महिलेच्या मेंदूवरही हल्ला केला आहे.. डॉक्टरांच्या टीमच्या म्हणण्यानुसार, त्यांना आधी महिलेच्या शरीरात दिसणारी लक्षणे स्ट्रोकची असल्याचे जाणवले. पण स्कॅनमध्ये असे आढळून आले की, काही जंतूंनी महिलेच्या संपूर्ण शरीरावर हल्ला केला आहे. सध्या या महिलेला औषध दिल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.