मोबाईल हँडसेट क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी नोकिया आता बाजारपेठेत नव्या रुपात दाखल होणार आहे. ‘नोकिया ३’, ‘नोकिया ५’ आणि ‘नोकिया ६’ हे तीन अँड्रोईड फोन १५ जूनपासून भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतील असे हे फोन असल्याने त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनी नोकियाचे फोन तयार करणार आहे. त्याचबरोबर जगभरात या फोनची विक्री देखील एचएमडी ग्लोबल कंपनी करणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने पुनरागमनाची घोषणा केली होती. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात जगभरात या फोनचं लाँचिंग करण्यात आलं. पण भारतात मात्र मे ते जूनपर्यंत हा फोन लाँच होईल असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नोकियाचा ३३१० हा फोन आठवड्याभरापूर्वीच भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर महिनाभराने म्हणजेच जून महिन्याच्या मध्यावर नोकियाचे अँड्राईड फोन लाँच करण्यात येणार आहे. हे स्मार्टफोन परवडणाऱ्या दरात असणार आहे. त्यापैकी ‘नोकिया ३’ ची किंमत १० हजार, ‘नोकिया ५’ १५००० आणि ‘नोकिया ६’ ची किंमत १८ हजारांच्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे.