Empty Stomach Pills Heart Risk: ‘काँटा लगा’ या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या अचानक निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. अवघ्या ४२ व्या वर्षी २७ जून रोजी अभिनेत्रीनं या जगाचा निरोप घेतला. रिपोर्टनुसार, शेफालीला कार्डियाक अरेस्ट आला आणि त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या शुक्रवारी शेफालीनं उपवास केला होता. शेफालीनं उपवासाच्या दिवशी रिकाम्या पोटी काही अँटी-एजिंग औषधं घेतली होती, ज्यामुळे अचानक तिचा रक्तदाब कमी झाला आणि त्यातून तिला कार्डियाक अरेस्ट आला. या घटनेनंतर सामान्य जनतेमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला. उपाशीपोटी औषध घेणं खरंच इतकं धोकादायक असतं का? आणि अशा चुका आपण नकळत करतो का?
अपोलो हॉस्पिटल्सच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. भव्या स्वर्णकार यांच्यानुसार, जेव्हा आपण उपाशीपोटी औषध घेतो, तेव्हा पोटातील आम्लाचं प्रमाण अधिक असतं. अशा वेळी औषध पचनसंस्थेमध्ये वेगानं शोषलं जातं आणि त्याचा प्रभाव त्वरित दिसतो. पण कधी कधी हा प्रभाव शरीरावर ‘ओव्हर-रिअॅक्टिव्ह’ होतो, ज्याचा परिणाम जीवावर बेतू शकतो.
विशेषतः हृदयाच्या आजारांसाठी घेतली जाणारी औषधं जसे बीटा ब्लॉकर्स, रक्तदाबावर नियंत्रण करणारी औषधं किंवा रक्त पातळ करणारी औषधं उपाशीपोटी घेतल्यास, रक्तदाब अचानक घसरू शकतो, व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते आणि हृदयाची गती थांबण्याचीही शक्यता असते.
डॉ. भव्या यांचं सांगणं आहे की, काही औषधं हृदयाची धडधड नियंत्रित करतात, आणि उपाशीपोटी घेतल्यास ती अतिशय वेगानं प्रभाव दाखवतात, ज्यामुळे हृदयाची गती खूप वाढू शकते किंवा खूपच मंद होऊ शकते.
त्याशिवाय काही NSAIDs (जसे की इबुप्रोफेन, पेन किलर्स) उपाशीपोटी घेतल्यास, पोटातील आतील अस्तरावर परिणाम होतो. त्यामुळे गॅस्ट्रिक ब्लीडिंग, अल्सर आणि तीव्र वेदना निर्माण होऊ शकतात.
काही औषधं पोट रिकामं असतानाच घेतली जातात; जसं की थायरॉइडच्या गोळ्या किंवा विशिष्ट अँटीबायोटिक्स. पण, हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलं गेलं पाहिजे. कारण- पोट रिकामं असताना औषध घेतल्यानं औषधाची कार्यक्षमता वाढते हे जसं खरं, तसेच ते चुकीच्या पद्धतीनं घेतल्यास तीच गोष्ट आरोग्यास घातक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांनाच ठरवू द्या. तुमचं औषध पोट भरल्यानंतर घ्यायचं की उपाशीपोटी.
सर्वसामान्य माणसानं कोणतीही औषधं घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. “औषधं उपाशीपोटी घेणं” ही सवय ठरू शकते प्राणघातक. तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे म्हणून कोणत्याही औषधाची वेळ, प्रमाण आणि अन्नासोबत घेण्याची पद्धत योग्यच ठेवा.