चायनीज म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतं ते देशी चायनीज आणि त्याचे प्रकार. पण, त्यापैकी काही निवडक पदार्थ असे असतात की, जे तुम्ही खाण्यासाठी तुम्ही कधीही तयार असता. कुणाला चायनीज भेळ आवडते, तर कुणाला चिली चिकन. पण एवढ्या सगळ्या देशी चायनीजच्या प्रकारांमधून जर कोणता एक पदार्थ निवडायचा असेल, तर प्रत्येक जण मंचुरियनचं नाव घेतोच. हो ना? भाज्या, चिकनचे गोळे तयार करून, त्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून, नंतर आंबट-तिखट अशा ग्रेव्हीमध्ये सोडलेले मंचुरियन बघून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फक्त मंचुरियन नूडल्ससोबत खाऊ शकता आणि ग्रेव्ही फ्राइड राइससोबत. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, बाहेर बनवतात तसे मंचुरियन्स तुम्ही घरीसुद्धा अगदी सहज बनवू शकता.

तुम्ही शोधायला गेलात, तर हॉटेलप्रमाणे मंचुरियन घरी कसे बनवतात? हे सांगणाऱ्या अनेक रेसिपी सापडतील. पण शेवटी आपण काहीतरी करायचं विसरतो आणि मग मंचुरियन मऊ तरी होतात किंवा कोरडे तरी. तुम्हालादेखील मंचुरियन बनवताना असा त्रास होत असेल, तर आता काळजी करू नका. हॉटेलसारखे कुरकुरीत मंचुरियन घरी बनवण्यासाठी या पाच टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील.

हेही वाचा : भारताच्या खिरींना जगभरात पसंती! पाहा, कोणाला मिळाले कितवे स्थान…

मंचुरियन कुरकुरीत होण्यासाठी काय करावे?

१. भाज्या बारीक चिरून घ्या

स्वयंपाक उत्तम होण्यासाठी भाज्या चिरण्याला किती महत्त्व असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. चिरण्याच्या पद्धतींवरही पदार्थाची चव अवलंबून असते. त्यामुळे मंचुरियन कुरकुरीत होण्यासाठी त्यातल्या भाज्या व इतर गोष्टी व्यवस्थित बारीक चिरून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही क्रिया वेळ खाणारी असते; पण तुम्हाला कुरकुरीत मंचुरियन हवे असतील, तर त्याचा कंटाळा करून चालणार नाही.

२. मंचुरियनच्या पिठात पाण्याचा वापर टाळा

मंचुरियनच्या गोळ्यांसाठी पीठ तयार करताना त्यात पाण्याचा वापर करणं टाळा. कारण- चिरलेल्या पदार्थांना पाणी सुटलेलं असतं. त्यामुळे पिठात पाण्याचा वापर केल्यास ते पीठ पातळ होण्याची शक्यता असते; ज्यामुळे मंचुरियन कुरकुरीत न राहता मऊ पडू शकतात.

३. मंचुरियनच्या पिठात मक्याचे पीठ (कॉर्नफ्लोअर) मिसळा

मंचुरियनच्या गोळ्यांसाठी पीठ बनवताना त्यात थोडा मैदा आणि मक्याचं पीठ मिसळा. हे अन्नघटक आपण वापरणार असलेल्या सर्व पदार्थांना व्यवस्थित एकजीव होण्यास मदत करतात आणि कुरकुरीतपणाही वाढवतात. मैदा व मक्याच्या पिठाला पर्याय म्हणून तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता.

४. मंचुरियन मोठ्या आचेवर तळा

होय! मंचुरियनचा कुरकुरीतपणा हा त्याच्या तळण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो. तुम्ही जर कमी आचेवर मंचुरियन तळलेत, तर ते तेलकट आणि मऊ होऊ शकतात. त्यामुळे मंचुरियन कढईत सोडण्यापूर्वी तेल कडकडीत तापलं आहे ना याची खात्री करा.

५. मंचुरियन झाकून ठेवू नका

तळून काढलेल्या मंचुरियन्सना झाकून ठेवण्याची चूक अजिबात करू नका. असं केल्यानं डब्यातल्या किंवा पातेल्यातल्या वाफेमुळे तुमचे कुरकुरीत झालेले मंचुरियन मऊ पडतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढच्या वेळेस जेव्हा मंचुरियन बनवायचे असतील तेव्हा या पाच महत्त्वाच्या टिप्सनुसार कृती करून अगदी हॉटेलसारखे चविष्ट, कुरकुरीत मंचुरियन घरीच बनवा.