Flaxseeds health benefits: अलीकडच्या काळात जवसाला सुपरफूड म्हणून लोकप्रियता मिळाली आहे आणि ते चांगल्या कारणास्तव आहे. फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला जवस हा पदार्थ कोणत्याही आहारात एक शक्तिशाली घटक म्हणून भर घालतो. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अनेक लोक जवसाचे सेवन करतात; परंतु महिलांच्या एकूण आरोग्यासाठी त्याचे खरोखरच उल्लेखनीय असे फायदे आहेत. लहान आकाराच्या असूनही जवसाच्या बिया महिलांच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम करू शकतात. हार्मोनल संतुलन राखणे आणि जळजळ कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत उपयुक्त असलेल्या जवसाच्या बिया तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केल्यास त्या तुमच्यासाठी गेम-चेंजर ठरू शकतात. अलीकडेच आहारतज्ज्ञ रिचा दोशी यांनी महिलांनी एक चमचा जवसाला त्यांच्या आहाराचा नियमित भाग का बनवावे यावर अंतर्दृष्टी शेअर केली. मग तुम्ही उत्सुक आहात का? तुमच्या दैनंदिन पोषण योजनेत जवसाचे स्थान का असावे हे जाणून घ्यायचे असेल, तर वाचा…
तुमच्या दैनंदिन आहारात जवसाच्या बियांचा समावेश करण्याची ५ कारणे
१. हार्मोनल बॅलन्सला समर्थन देते : हार्मोनल चढउतार हा महिलांच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे, ज्यामुळे अनेकदा पीएमएस, अनियमित मासिक पाळी व मूड स्विंग्स यांसारख्या चिंता उद्भवतात. जवसाच्या बियांमध्ये वनस्पती-आधारित संयुगे, जी शरीरातील इस्ट्रोजेन पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात. जवसाच्या बियांचे नियमित सेवन करणे मासिक पाळीच्या अनियमिततेचा सामना करणाऱ्या महिलांसाठी विशेषतः फायदेशीर ठरते.
२. हृदयाचे आरोग्य वाढवते : निरोगी हृदय हे एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे आणि जवसाच्या बिया हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. वय वाढत असताना, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. आहारतज्ज्ञ स्पष्ट करतात की, जवसाच्या बियांमध्ये फायबर व ओमेगा-३ फॅटी अॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात आणि हे दोन्हीही घटक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. तुमच्या आहारात फक्त एक चमचा जवस समाविष्ट करणे हे निरोगी हृदयाच्या दिशेने एक सोपे, पण प्रभावी पाऊल ठरू शकते.
३. पचन सुधारते : हार्मोनल चढउतारांमुळे विशेषतः मासिक पाळीदरम्यान, महिलांमध्ये पचनाच्या समस्या सामान्य आहेत. परंतु, जवसाच्या बिया आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट बनतात. बद्धकोष्ठता कमी करणे, आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करणे आणि तुमची पचनसंस्था सुरळीत चालू ठेवणे यांसाठी जवसाच्या बिया तुमच्या आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो.
४. जळजळ कमी करण्यास मदत होते : शरीरात जळजळ झाल्यामुळे सांधेदुखी, थकवा आणि इतर त्रास होऊ शकतात. जवसाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, ज्यामुळे जळजळ होण्याच्या त्रासाशी लढण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते. जवसाच्या नियमित सेवनाने स्नायू कडक होणे आणि तीव्र थकवा यांसारखी लक्षणे कमी होऊ शकतात, ज्यामुळे त्या दाहकविरोधी आहारात एक उत्तम भाग बनतात. जवस केसांची मजबुती वाढवते. केस जर सारखे तुटत असतील, तर केसांच्या तुटण्याचा हा त्रास त्यामुळे थांबतो.
५. निरोगी वजन व्यवस्थापनास मदत : वजन वाढणे ही अनेक महिलांसाठी चिंतेची बाब असू शकते, विशेषतः ज्यांना पीसीओएस किंवा चयापचयाच्या समस्या आहेत. जवसाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, त्या तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करतात. अनावश्यक खाण्याचे प्रमाण कमी करतात. तुमच्या आहारात जवसाच्या बियांचा समावेश केल्याने वजन व्यवस्थापनात मदत मिळू शकते, ज्यामुळे फिटनेस ध्येयांवर लक्ष ठेवणे सोपे होते.