News Flash

दोन मूलभूत प्रश्न आहाराचे

आपल्या रोजच्या आहारासंबंधी ज्या दोन मूलभूत प्रश्नांचा उल्लेख केला आहे ते स्वतलाच विचारायचे आहेत.

आजच्या लेखात प्रबोधनाला पूर्णपणे फाटा देऊन आहाराच्या संदर्भातील दोन मूलभूत प्रश्नांचा आढावा घेत आहोत.

छापील आणि दृश्य प्रसारमाध्यमातून सतत होणारा जनजागरण आणि आरोग्यविषयक सल्ल्यांचा मारा हा मुख्यत्वेकरून आहारकेंद्री असतो. सर्वाधिक खपाच्या पुस्तकांमध्ये आहार आणि आरोग्य या विषयांच्या पुस्तकांचे स्थान बरेच वरचे आहे. असे असूनसुद्धा आपल्या आधुनिक खाद्यसंस्कृतीमध्ये संस्कृतीचा अभाव ठळकपणे अधोरेखित होतो. कदाचित सततच्या उपदेशामुळे मुख्य उद्देश देशोधडीला लागला असावा. म्हणूनच आजच्या लेखात प्रबोधनाला पूर्णपणे फाटा देऊन आहाराच्या संदर्भातील दोन मूलभूत प्रश्नांचा आढावा घेत आहोत.

आपल्या रोजच्या आहारासंबंधी ज्या दोन मूलभूत प्रश्नांचा उल्लेख केला आहे ते स्वतलाच विचारायचे आहेत. अर्थात हे प्रश्न विचारताना आपला आहार म्हणजे ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे आपल्याला तत्त्वत: मान्य आहे हे गृहीत धरले आहे.
काहीही खाण्यापूर्वी आणि ‘वदनी कवळ घेता’ म्हणण्यापूर्वी खालील दोन प्रश्न स्वत:ला विचारायचे आणि त्याचे समाधानकारक उत्तर मिळाल्यावरच पुढे जायचे आहे.

पहिला प्रश्न : मी का खातो आहे?
या प्रश्नाचे संभाव्य उत्तर खालीलपकी एक असू शकते –
* भूक लागली.
* जेवणाची वेळ झाली.
* सहज मूड झाला, टाइमपास.
* कोणाच्या आग्रहाखातर.
* आवडीचा पदार्थ समोर आला.
* फुकट खायला मिळते.
* भरलेले पसे वसूल करण्यासाठी.
* अन्न वाया जाईल म्हणून.
* चित्रपटगृहात किंवा पार्कात इतर लोकांचे पाहून.
* कधी कधी आपल्या नकळत काहीतरी खातो असे प्रसंग उदा. आनंदोत्सव, राग, नराश्य, ताणतणाव.

भूक लागली म्हणून जेवणे आणि जेवणाची वेळ झाली म्हणून जेवणे यात पहिला पर्याय जास्त योग्य हे निर्वविाद आहे, परंतु काही जणांना कार्यालयाच्या जेवणाच्या ठरावीक वेळातच जेवावे लागते. त्यामुळे दुसरा पर्याय मान्य करावाच लागतो, पण इतर पर्यायांबद्दलचे उत्तर तुमचे तुम्हालाच द्यायचे आहे.
अन्न वाया जाऊ नये म्हणून पोटात कोंबणे म्हणजे पोटाची कचरापेटी करण्यासारखे आहे हा शरीरावर केलेला अत्याचार आहे. ही गोष्ट विशेषत: उपाहारगृहामध्ये जेवायला गेलेली मंडळी हमखास करतात. चव आवडली म्हणून अथवा पसे वाया जातील या मानसिकतेतून हे नकळत घडते
एखादा लाडू घ्या हो असा आग्रह झाल्यास माझ्या शरीराला याची गरज नाही किंबहुना त्याचा त्रासच होण्याची शक्यता आहे म्हणून मी हा लाडू घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगणे जमेल का?
आज जगभर स्थूल लोकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. शरीराचे प्रमाणापेक्षा जास्त वजन हे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग या असाध्य रोगांना दिलेले आग्रहाचे आमंत्रण आहे यात शंका नाही. याबाबतीत वन्य प्राण्यांची सवय वाखाणण्याजोगी आहे. प्राणी भूक नसेल
तर विनाकारण शिकार करत नाहीत.
आपण मात्र टाइमपास म्हणून भरपूर उष्मांक असलेले वेफर, भजी, वडापाव, शीतपेय खात-पीत असतो.
खाद्यपदार्थातून मिळणारा उष्मांक जास्त आणि शारीरिक श्रमामुळे वापरला गेलेला उष्मांक अशी परिस्थिती शरीरात असेल तर शिल्लक राहिलेले उष्मांक मेदाच्या रूपात साठवले जातील. लठ्ठपणासाठी अनेक कारणे असली तरी सर्वाधिक वेळा गरजेपेक्षा जास्त पुरवठा हे प्रमुख कारण असते.
प्रश्न दुसरा : आपण काय खाणार आहोत आणि ते योग्य आहे का?
आपण खाद्यपदार्थाची निवड करताना काय निकष वापरतो हे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक पदार्थाचे मूल्य चार पद्धतीने व्यक्त करता येते.
* उष्मांकमूल्य म्हणजे या पदार्थाचे सेवन केल्यास शरीराला किती उष्मांक मिळतील.
* आíथकमूल्य म्हणजे या पदार्थासाठी किती पसे खर्च करावे लागतील.
* आहारमूल्य आहारातील कोणते उपयुक्त घटक मिळतात आणि त्याचे प्रमाण.
* अपकारकमूल्य म्हणजे या पदार्थाची शरीराला हानी पोहोचवण्याची क्षमता.
उदाहरणार्थ एक समोसा साधारणत: आकारानुसार १५० ते २०० उष्मांक देतो आणि त्याची किंमत
१० ते १५ रुपये असते. आहारमूल्याच्या बाबतीत मात्र समोसा बराच दरिद्री आहे. त्यात मदा, बटाटा आणि तळणाचे तेल हे मुख्य आहार घटक आहेत. वारंवार उकळलेल्या तेलात हानीकारक ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड मोठय़ा प्रमाणात असते. अशा प्रकारे विश्लेषण आपल्याला प्रत्येक खाद्यपदार्थाचे करता येईल. या पद्धतीने खाद्यपदार्थाचे मूल्यमापन केल्यास हॉटेलमधल्या मेन्यू कार्डावरील बहुतेक पदार्थाच्या किमतीमध्ये आणि त्याच्या आहारमूल्यांमध्ये मोठी तफावत दिसेल. थोडक्यात उच्च आहारमूल्य असलेले पदार्थ आपल्या आहाराचा मुख्य भाग असायला पाहिजेत.

आपल्या आहारात आपण गोड पदार्थाना उच्च दर्जा दिला आहे. सर्व गोड पदार्थाचा आत्मा साखर असतो तेव्हा याबद्दल थोडेसे..
साखर गोड पदार्थ आपल्या संस्कृतीचा पर्यायाने आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य हिस्सा आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी एक सर्वमान्य गोष्ट म्हणजे कुछ मीठा हो जाए.. परीक्षेतील यश असो वा अपत्यप्राप्तीचा आनंद गोड पदार्थ वा मिठाईला पर्याय नाही. एवढेच नाही आपल्या देवाला प्रसाद म्हणून हेच प्रिय आहे, अशी आमची खात्री आहे. आहारशास्त्रात फक्त ‘रिकामे उष्मांक’ देणारा आहार हा मूल्याच्या बाबतीत अगदीच ‘ढ’ आणि अपकारक मूल्य असलेल्या या पदार्थाला आम्ही टाकाऊ म्हणून बाहेर का काढत नाही हे अनाकलनीय आहे. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण या सर्व व्याधींमध्ये साखरेचा सक्रिय सहभाग असतो. साखरेच्या दुष्परिणामाकडे आम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो, कारण आम्हाला साखरेचे व्यसन आहे. साखरेचे व्यसन या संकल्पनेला शास्त्रीय आधार आहे. व्यसनमुक्ती हे अत्यंत कर्मकठीण काम आहे, त्यासाठी प्रचंड मनोनिग्रहाची गरज असते. गोडाच्या मोहजालातून बाहेर काढण्यासाठी जनजागरणाची गरज आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये साखरेवर कर लावण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. जागतिक आरोग्य संस्थेने २०१५ मध्ये सर्वसाधारण लोकांनी दररोज किती साखर खावी या संदर्भात काही नियम सुचवले आहेत. त्यानुसार दररोज दरमाणशी फक्त २५ ग्रॅम साखर खाणे अपेक्षित आहे. २५ ग्रॅम म्हणजे पाच ते सहा छोटे चमचे. जे आरोग्यास अपायकारक त्याबद्दल जनजागरण व्हायलाच पाहिजे. साखर आरोग्यास अपायकारक आहे, अशी धोक्याची सूचना साखरेच्या पाकिटावर असायला काय हरकत आहे.
अर्थात या सर्व प्रश्नांचेही उत्तर तुम्हालाच द्यायचे आहे.

– डॉ. राजेंद्र आगरकर, सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ हायपरटेंशन
अ‍ॅण्ड डायबेटिस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 2:30 am

Web Title: diet and health
टॅग : Diet
Next Stories
1 उदरभरण नोहे. ! उन्हाळ्यातील आहार
2 प्रकृ‘ती’ : गर्भाशयावरील गाठी
3 आयुर्मात्रा : ऋतू वसंत
Just Now!
X